कुणी पाणी, देता का पाणी…?

पिंपरी – नेहरूनगर परिसरात मागील सात दिवसांपासून कमी दाबाने पाणी येत असल्याने नागरिकांना दारोदारी पाणी मागत फिरावे लागते आहे. ऐन पावसाळ्यात नागरिकांना पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागत असल्याने नागरीक संताप व्यक्त करत आहेत.

नेहरुनगर परिसरात दाट नागरीवस्ती आहे. मोठ्या प्रमाणावर बांधकामे होत आहेत. टोलेजंग इमारती उभ्या राहत असताना महापालिका प्रशासनाने पाणी पुरवण्याच्या नियोजनाबाबत उपाययोजना केलेल्या दिसून येत नाहीत. एकीकडे पाण्याची मागणी वाढत असताना दुसरीकडे पाणी पुरवठा जैसे थे आहे. परिणामी अपुऱ्या दाबाने पाणी पुरवठा होत असून कधी-कधी पाणीच येत नाही. भविष्यात ही परिस्थिती अधिक बिकट होण्याची भिती स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केली.

-Ads-

नेहरूनगरमध्ये तीन पाण्याच्या टाक्‍या आहेत. त्या टाक्‍यामधून परिसरातील कासारवाडी, फुलेनगर, वल्लभनगर, संत तुकाराम नगर, महेशनगर, यशवंत नगर, विठ्ठल नगर, उद्यमनगर, खराळवाडी, गांधीनगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, राजीव गांधी वसाहत आदी भागात पाणी पुरवठा केला जातो. परंतु, या भागात चोहोबाजुने बांधकाम वाढले असताना पाण्याच्या बाबतीत नियोजन केले गेले नाही. संबंधित विभागाला याविषयी माहिती विचारल्यास त्यांच्याकडून टोलवा-टोलवीची उत्तरे येत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर कणसे यांनी सांगितले.

सध्या आठवड्यातून तीनच दिवस पाणी येत आहे. त्यातही पाण्याचा दाब कमी असल्याने पिण्यापुरते पाणी ही उपलब्ध होत नाही. त्यामुळे पाण्यासाठी भटकंती करावी लागते आहे. परिसरात मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरु असून त्यांना पाणी मिळते. मात्र, नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याने पाणी नेमके कुठे मुरते, असा प्रश्‍न सामान्यांना पडतो.
किरण पवार, स्थानिक नागरीक.

संध्याकाळी एक तास पाणी येते. पाण्याचा दाब कमी असल्याने पिण्यापुरते देखील पाणी मिळत नाही. काही नागरिक थेट नळाला मोटार जोडून पाण्याचा उपसा करतात. त्यामुळे इतरांना पाणी मिळत नाही. नागरिकांकडून वारंवार तक्रारी केल्या जात असताना महापालिका प्रशासन गांभिर्याने घेत नाही. त्यामुळे नेहरुनगर भागातील पाण्याचा प्रश्‍न गंभीर होत चालला आहे.
– कमलादेवी वर्मा, ज्येष्ठ महिला

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)