कुडाळचे श्रद्धास्थान श्री हनुमान मंदिर

सचिन वारागडे, कुडाळ

सातारा जिल्ह्यातील शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जावळी खोऱ्यातील कसबे कुडाळ या गावात एक मध्यम आकाराचे हनुमान मंदिर होते. हे मंदिर पुरातण काळातील सर्वात जुने मंदिर म्हणून परिचित आहे. संपुर्ण दगडी बांधकामातील हे मंदिर आजतागायत गावगाड्यातील घडामोडींचे साक्षीदार म्हणूनही प्रचलित आहे. हे मंदिर तब्ब्ल 150 वर्षाहून अधिक काळापूर्वीचे असल्याने मंदिराची पुनर्बांधणी करण्याचा ध्यास कुडाळ गावच्या ग्रामस्थांनी गतवर्षीच्या पाडव्याच्या ग्रामसभेत घेतला आणि एका वर्षाच्या आतच या भव्य दिव्य नुतन मारूती मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा संपन्न होत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नव्याने साकारलेल्या मंदिराची रचना ही अत्यंत शोभिवंत असून त्यामध्ये जवळजवळ सहा फूट उंच व तीन फूट रुंद अशी हनुमानाची सुंदर दगडी मूर्तीची प्रतिष्ठापणा होत आहे. पूर्वी हे मंदिर अत्यंत साधे होते. मात्र त्यामध्ये बदल घडत गेले. मंदिर गावाच्या मधोमध असल्याने गावकऱ्यांना मंदिरात जाण्यासाठी फारसे चालावे लागत नाही. येथे दर शनिवारी नारळ फोडण्यासाठी मोठ्या संख्येने भक्त येतात. या मंदिरात दरवर्षी हनुमान जयंतीला मोठा सोहळाही साजरा होत असतो. मूर्तीचे तोंड कोणत्या दिशेकडे आहे याचाही मूर्तीचे वर्णन करताना बऱ्याचदा उल्लेख केला जातो. जसे की पूर्वाभिमुख, उत्तराभिमुख, दक्षिणमुखी. पंचमुखी, वगैरे. कुडाळचा मारूती हा “दक्षिणमुखी मारुती’ म्हणून प्रसिद्द आहे.

कुडाळसह पंचक्रोशीतील सर्व रहिवाशांनी यथोचित दान देऊन आज मंदिराचे उत्तम दर्जाचे बांधकाम, रंग रंगोटी सहित शोभिवंत काम पूर्ण झाले आहे. मंदिर बांधकामास देणगी देणाऱ्या प्रत्येक सहकार्याचे खूप मोलाचे सहकार्य लाभले आहे. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार हे सागवानी लाकडात भव्य चौकट उभारून करण्यात आले असून मंदिराच्या डाव्या बाजूस शनी महाराजांची सुबक मुर्तीही बसवण्यात आली आहे. हे एवढं मोठं शुभकार्य पार पडण्यामागे कुडाळ व परिसरातील सर्व सहकारी, भाविक, ग्रामस्थ आहेत.

दिडशे वर्षांपेक्षा अधिक कालखंडातील स्वातंत्रपूर्व काळापासूनच्या मारूती मंदिराचा आज मोठ्या उत्साहात व भक्तीभावाने जिर्णोध्दार, मूर्तीप्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा पार पडत आहे. नव्याने उभारण्यात आलेल्या मंदिरांच्या कलाकुसरीने सजवून उभे राहिलेले हे मारूती मंदिर गावाच्या वैभवात भरच टाकत आहे. मारूतीचे मंदिर तसे कोणत्याही गावाला नवीन नाही मात्र कुडाळच्या याच मारूती मंदिरात गावच्या जत्रा, उत्सवांचे नियोजन, बैठका पुर्वपरंपरागत चालत आल्या आहेत. या नुतन मारूती मंदिराच्या सोहळ्यानिमित्त गावात उत्साहाचे आनंदाचे व चैतन्याचे वातावरण असून गावाच्या वैभवात हे मंदिर नक्कीच भर टाकत आहे. श्री मारूतीच्या कृपेने कुडाळ गावास उत्तरोत्तर वैभव प्राप्त होवो हिच श्री मारूतीरायाच्या चरणी प्रार्थना…

मंदिराचा आज कलशारोहण सोहळा

बुधवार, 2 जानेवारी 2019 रोजी सकाळी 7 वाजता अग्निस्थापना, सकाळी 8 ते 10,30 यावेळेत गावातील माहेरवाशिणींच्या हस्ते कलशपूजन, सकाळी 9 वाजता होमहवन व पुण्यवाचन, सकाळी 10.45 ते 11.45 या वेळेत परमपूज्य नंदगिरी महाराज (सोळशी) यांच्या हस्ते मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना, सत्यंद्रनाथ महाराज कौसांतक पिठ (महाहिमालय) यांचे हस्ते कलशारोहन, त्यानंतर दुपारी 1 ते सायं 6 वाजेपर्यंत महाप्रसाद, रात्री 9 ते 11 यावेळेत ह. भ. प. हणमंत महाराज रणवरे (निंभोरे, फलटण) यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे तरी कुडाळ व पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ, देणगीदार, भक्तांनी या धार्मिक सोहळयाचा तसेच महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन मारुती मंदिर जीर्णोद्धार समिती तसेच ग्रामस्थ मंडळ कुडाळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)