कुठे करावी गुंतवणूक (भाग-१)

दीर्घकालीन गुंतवणूक करण्याचा मुद्दा जेव्हा येतो तेव्हा अनेकजण रिअल इस्टेटमध्येच गुंतवणूक करण्यात रस दाखवितात; परंतु अनेकांच्या मते, सध्या शेअरबाजारातील गुंतवणूक अधिक लाभदायक ठरत आहे. यासंदर्भात वेगवेगळी मते असू शकतात; परंतु या दोन्ही पर्यायांमधील सर्व पैलूंची माहिती घेऊनच गुंतवणुकीबाबत निर्णय घेणे हितावह ठरते.

रिअल इस्टेटमध्ये, जमीन-जागा-घरे यांमध्ये गुंतवणूक करणे ही केवळ श्रीमंतांचीच मक्तेदारी असण्याचे दिवस आता मागे पडले आहेत. मध्यमवर्गीय लोकांच्या दृष्टीने काही वर्षांपूर्वी घर विकत घेणे म्हणजे डोक्‍यावर छप्पर असणे, एवढाच या गुंतवणुकीचा मर्यादित हेतू होता; परंतु प्रॉपर्टी विकत घेण्यासाठी कर्जाची सुलभ उपलब्धता आणि काही वर्षे प्रॉपर्टीच्या किमतींमध्ये वाढती तेजी पाहायला मिळाल्याने प्रॉपर्टी हे मध्यमवर्गीयांसाठीही गुंतवणुकीचे लोकप्रिय माध्यम बनले. प्रॉपर्टीत गुंतवणूक करून भरपूर कमाई करणाऱ्यांची संख्या कमी नाही; परंतु वित्तीय योजनाबंदीच्या नियमांमुळे प्रॉपर्टीत गुंतवणूक करणे हा प्रत्येक व्यक्तीसाठी योग्य पर्याय ठरेलच, असे मात्र नाही. विशेषतः दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी आपल्याकडे अनेक पर्याय उपलब्ध असतील, तेव्हा प्रॉपर्टीतील गुंतवणूक तितकीशी लाभदायक नसते. त्यामुळेच प्रॉपर्टीत गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या व्यक्तींनी काही खास बाबी जाणून घेणे आवश्‍यक ठरते.

कुठे करावी गुंतवणूक (भाग-२)

-Ads-

प्रॉपर्टीत गुंतवणूक करण्यासाठी सामान्यतः मोठी रक्कम हातात असावी लागते. डाउन पेमेन्ट केल्यानंतर आपण घरखरेदीसाठी कर्ज घेतले तरी महिन्याच्या मर्यादित उत्पन्नातून त्या कर्जाचे हप्ते सुरू होतात. प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्यात काहीही जोखीम नाही, हाही गैरसमज आहे. आपण केलेल्या गुंतवणुकीमधून काही वर्षांनी निश्‍चित लाभ मिळेलच असे मानता येत नाही. काही वर्षांपूर्वीच्या रिअल इस्टेट बाजारपेठेतील घडामोडींवर नजर टाकल्यास असे दिसते की, प्रॉपर्टीत गुंतवणूक केलेल्या अनेकांना आपला पैसा अडकून पडल्याचे आता वाटू लागले आहे. त्याचप्रमाणे प्रॉपर्टी खरेदी करणे जेवढे सोपे आहे, तेवढी त्याची विक्री करणे सोपे नाही. ज्यावेळी आपल्याला पैशांची गरज असेल, नेमक्‍या त्याच वेळी योग्य भाव देणारा ग्राहक आपल्याला भेटेल असेही सांगता येत नाही. सामान्यतः रहिवासी घर खरेदी केल्यानंतर ते भाड्याने दिल्यास वर्षभरात होणारी कमाई गुंतवणुकीच्या रकमेच्या अडीच ते तीन टक्के इतकी असते. त्यापेक्षा अधिक परतावा तर बॅंकेच्या बचत खात्यातूनही मिळू शकतो. बाजारभावापेक्षा खूप कमी दराने प्रॉपर्टी विकत घेतली असेल, तरच भाड्यापोटी मिळणारी रक्कम हा चांगला परतावा ठरू शकतो. त्याचप्रमाणे प्रॉपर्टीच्या देखभालीसाठी वर्षाकाठी काही रक्कम खर्च करावी लागते, हेही ध्यानात घेतले पाहिजे. गेल्या काही वर्षांपासून प्रॉपर्टीतील गुंतवणुकीपासून मिळणारा परतावा कमी झाल्याचे दिसत आहे.

– वनिता कापसे

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)