कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी

उरुळी कांचनच्या महिलेची लोणी पोलीस ठाण्यात तिघांविरोधात तक्रार
लोणी काळभोर  -चार महिन्यांपूर्वी एका महिलेने कर्जप्रकरणास जामीन होण्यास नकार दिला. या कारणावरून चिडून जाऊन त्या महिलेच्या ओळखीच्या शिक्षिकेस “तीन लाख रूपये दे, अन्यथा तुझे पती व मुलांना जिवे ठार मारू’ अशी धमकी देणाऱ्या तसेच एक महिन्यापूर्वी दोन लाख रूपये किमतीच्या गृहोपयोगी साहित्याचे नुकसान करणाऱ्या ऊरूळी कांचन येथील एका महिलेसह तिघांविरोधात फिर्याद देण्यात आली आहे. तसेच या तिघांपासून आपल्यासह कुटुंबाला जीवितास धोका असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी मंगल लक्ष्मण वाघमोडे (वय 41, रा. तुपेवस्ती, ऊरूळी कांचन, ता. हवेली) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रेम गोगीया, कैलास गोगीया व रूई (पूर्ण नाव माहित नाही. तिघेही रा. ऊरूळी कांचन) या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंगल वाघमोडे या पुणे महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक 35 बी हडपसर या शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. बॅंक ऑफ इंडिया शाखा ऊरूळी कांचनच्यावर असलेल्या गाळ्यात येशू दरबार ट्रस्ट चालतो. त्या अंतर्गत सर्व जाती धर्माचे आजारी लोकांसाठी प्रार्थना केली जाते. सुमारे 8 वर्षांपासून प्रेम गोगीया व त्यांचा मुलगा कैलास हे त्यांचे कुटुंबीयासह येथे प्रार्थनेसाठी येत होते. 6 ऑगस्ट रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास मंगल वाघमोडे यांच्यासह शोभा सगर, मीनाक्षी खेसे, सुरेश सगर, संजय ननावरे, शोभा वाघमोडे, स्वाती तोडणकर, कौशल्या वाघमोडे, मनिषा मोरे, अश्विनी दिवटे, लक्ष्मण वाघमोडे हे या ठिकाणी ट्रस्टचे काम करत बसले होते. त्यावेळी प्रेम व कैलास गोगीया तेथे आले. मंगल वाघमोडे यांना म्हणाले “आम्ही कर्जप्रकरण केले होते. त्यासाठी शोभा सगर या जामिनदार म्हणून सही करण्यास तयार होत्या; परंतु तुम्ही त्यांना काहीतरी सांगितलेने त्यांनी नकार दिला. यामुळे माझे 10 लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. तुम्ही मला 3 लाख रूपये द्या’ असे म्हणून त्या दोघांनी शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. त्यानंतर कैलास गोगीया याने “पैसे दिले नाहीस तर तुझ्या पतीस बाईच्या खोट्या गुन्ह्यात गुंतवतो’ अशी धमकी दिली. तर प्रेम गोगीया याने अश्‍लील भाषेत शिवीगाळ केली.
यानंतर काही कळायच्या आत कैलास याने त्यांचे तोंडावर थप्पड लगावल्या. त्यावेळी प्रेम याने त्यांचे केस पकडले होते. उपस्थित सर्व महिला व पुरूष मध्ये आले, त्यांनाही धक्काबुक्की करून “पोलीस ठाण्यात गेलात तर जीवे मारून टाकू’ अशी धमकी देण्यात आली. तत्पुर्वी गेल्या महिन्यात शनिवार (दि. 22 जुलै) या दोघांनी विद्युत प्रवाहाची आर्थिंग वायर तोडल्याने प्रार्थना हॉलमधील बल्ब, वातानुकुलीत यंत्र, डिव्हीडी प्लेअर, पंखे आदी दोन लाख रूपये किमतीचे साहीत्य जळून खाक झाले होते. ही वायर तोडताना मीनाक्षी खेसे व शोभा सगर यांनी पाहिले होते. गेले चार महिन्यांपासून हा प्रकार चालू असून 8 ऑगस्ट रोजी सकाळी त्या पुणे येथे निघाल्या असता पुन्हा त्यांना अडवून 3 लाख रूपयांची मागणी करून धमकी देण्यात आली. त्यामुळे मंगल वाघमोडे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात या तिघांविरोधांत फिर्याद दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)