कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानमध्येच

केंद्रीय गृह सचिवांची माहिती

मात्र, त्या देशाकडून नापाक अडथळे

नवी दिल्ली -कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानमध्येच आहे. त्याला भारतात परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत, मात्र, या प्रयत्नांमध्ये त्या देशाकडून नापाक अडथळे आणले जात आहेत, अशी माहिती आज केंद्रीय गृह सचिव राजीव महर्षी यांनी दिली.

महर्षी उद्या (गुरूवार) सेवानिवृत्त होत आहेत. यापार्श्‍वभूमीवर, पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी विविध मुद्‌द्‌यांवर भाष्य केले. पाकिस्तानने दाऊदला आश्रय दिला आहे. त्याला परत आणण्यासाठीची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, पाकिस्तान सरकारची कृती आंतरराष्ट्रीय कायद्याशी सुसंगत नाही. भारताच्या हितसंबंधांविरोधात तो देश हालचाली करत आहे. कायदेशीर प्रक्रिया सुरू असून भारत दाऊदला योग्य वेळी ताब्यात घेईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

मुंबईत 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील दाऊद हा मुख्य आरोपी आहे. त्या स्फोटांमध्ये सुमारे 260 जण मृत्युमुखी पडले, तर 700 हून अधिक जखमी झाले. त्या स्फोटांनंतर दाऊदने भारतातून पलायन केले. त्यानंतर त्याने दडण्यासाठी पाकिस्तानची निवड केली. दाऊद पाकिस्तानातच असल्याचे भारताने अनेकवेळा उघडकीस आणले. भारताच्या या दाव्यावर इतर देशांनी आणि आंतरराष्ट्रीय संस्थांनीही शिक्कामोर्तब केले. मात्र, दाऊदला आश्रय दिल्यासंबंधी पाकिस्तानकडून वारंवार नन्नाचा पाढा सुरू आहे.
विभाजनवाद्यांशी चर्चा शक्‍य; पण अटी नकोत

काश्‍मीरमधील विभाजनवाद्यांशी चर्चा शक्‍य आहे. मात्र, चर्चेसाठी कुठल्या पूर्वअटी ठेवल्य जाऊ नयेत, अशी भूमिका महर्षी यांनी मांडली. काश्‍मीरमध्ये दहशतवादी कारवाया घडवण्यासाठी पाकिस्तानकडून पाठिंबा दिला जात असल्याविषयी कुठलीही शंका नाही. काश्‍मीरमध्ये दहशतवाद्यांच्या घुसखोरीची निश्‍चिती त्या देशाकडून केली जाते. दहशतवादी कारवायांसाठी तो देश निधी पुरवतो, अशी परखड भूमिकाही त्यांनी मांडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)