कुक्‍कटपालनातून मिळविले चक्‍क अडीच लाखांचा नफा

शिक्रापुरातील कुणाल वाबळे याचा कडकनाथ कोंबडीचा यशस्वी प्रयोग

शिक्रापूर, दि. 18 (वार्ताहर)- वय वर्षे अवघे 18… शालेय शिक्षण करता करता मात्र, नोकरी न करता कुक्‍कटपालनातून त्याने कमवले चक्‍क अडीच लाख रुपये. शिक्रापूर (ता. शिरूर) येथील कुणाल रमेश वाबळे या तरुणाने कडकनाथ जातीच्या कोंबड्या पाळून उत्पन्न कमाईचा एक वेगळा प्रयोग केला आहे. या कुक्‍कटपालनातून वाबळे यांनी रोजगाराच्या नवीन वाटा निर्माण करून तरूण शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे.
कुणाल रमेश वाबळे या युवकाने शालेय शिक्षण घेत असताना कुक्‍कटपालन व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. अलिकडील काळामध्ये आयुर्वेदिक असलेली कडकनाथ जातीची कोंबडी उदयाला आली आहे. ज्या कोंबडीचे मांस व अंडी शरीराला तेवीस प्रकारच्या आजारावर गुणकारी आहेत. असे समजले. त्यामुळे आपण देखील या परिसरात नवीन प्रयोग करून याच कडकनाथ जातीच्या कोंबड्या पाळायच्या आणि त्यातूनच आपला व्यवसाय उपक्रम सुरु करून युवकांपुढे नवीन आदर्श निर्माण करण्याचा निर्णय त्याने घेतला. त्यानंतर याबाबत सर्व माहिती मिळवत या कोंबड्या आयुर्वेदिक असून त्यांना खाद्य देखील खूप कमी व खर्च देखील कमी असल्याची माहिती मिळताच सुरवातीस पाच महिन्यांपूर्वी कुणाल याने बेंगलोर येथून कडकनाथ जातीच्या कोंबडीची पस्तीस हजार रुपयांची 350 पिल्ले मागविली. घराशेजारी असलेल्या झाडाखाली फक्‍त जाळी लाऊन कोंबड्या पाळण्यास सुरवात केली. आता पाच महिन्याच्या या कोंबड्या झाल्या असून पाच महिन्यांमध्ये या कोंबड्यांना फक्‍त वीस हजार रुपये खर्च झाला आहे. सुरवातीस आणलेल्या 350 पिल्लांपैकी आजमितीस 300 कोंबड्या राहिलेल्या आहेत. तर आज या कोंबड्या प्रत्येकी दीड किलो वजनाच्या झालेल्या असून या कोंबडीला बाजारामध्ये सातशे रुपये किलोचा भाव मिळत आहे. तर आज या कोंबड्यांच्या माध्यमातून बाजारामध्ये तीन लाख पंधरा हजार रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. हा खर्च वजा जाता दोन लाख साठ हजार रुपयांचा निव्वळ नफा कुणाल वाबळे यास शिल्लक राहिला आहे. या कोंबडीचे रंग काळे, रक्‍त काळपट तर मांस देखील काळपट आहेत. तर या कडकनाथ कोंबडीची अंडी देखील आयुर्वेदिक असून या अंड्यांना देखील बाजारामध्ये प्रत्येकी पन्नास रुपये भाव मिळत आहे.
कुणाल याने केलेल्या या प्रयोगामध्ये दोनशे कोंबड्या तर शंभर कोंबडे तयार झाले आहेत तर दररोज सत्तर ते ऐंशी अंडी कोंबड्या देत असून अंड्यांचे दररोज चार हजार रुपये उत्पन्न मिळत आहेत. त्यामुळे अंड्यांच्या माध्यमातूनच महिल्याला या युवकास सव्वा लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार असल्याने या कोंबड्या बाजारामध्ये विक्री न करता अंडी मिळविण्यासाठी जतन करणार असल्याचे कुणाल वाबळे याने सांगितले आहे.

कडकनाथ कोंबडीचे अंडी उबवणी केंद्र सुरु करणार- वाबळे
शिक्रापूर येथे घराशेजारील छोट्याशा जागेमध्ये शिरूर तालुक्‍यातील वेगळा असा कडकनाथ कोंबडी पालनाचा प्रयोग मी केला असून त्यामध्ये मला समाधानकारक यश प्राप्त झालेले आहेत. याबाबत जास्त काहीही माहिती नसताना मी केलेल्या या लहान उपक्रमातून मला आता व्यवसायाची माहिती मिळाली आहे, त्यामुळे आता या अंडी विक्रीतून मिळणाऱ्या नफ्यातून अंडी उबविण्याचे मशीन घेण्याचा माझा हेतू असून या माध्यमातूनच शिक्रापूर येथे कडकनाथ कोंबडीचे अंडी उबवणी केंद्र सुरु करण्याचे माझे ध्येय असल्याचे कुणाल वाबळे याने सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)