कुकडी नदीचे पात्र प्रदूषणाच्या विळख्यात

जुन्नर शहरातील सांडपाणी मिसळते थेट नदीत

लेण्याद्री, दि. 20 (वार्ताहर) -जुन्नर तालुक्‍यातील शेतकरी व नागरिक शेतीसिंचानासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी ज्या कुकडी नदीवर अवलंबून आहेत ती कुकडी नदी सध्या प्रदूषणाच्या विळख्यात अडकली आहे. तिचा श्वास गुदमरत आहे. दुषित पाणी व कुकडी पात्रातील प्रदूषणामुळे आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होण्याची चिन्हे पाहावयास मिळत आहेत.

जुन्नर शहरातील घरांमधून बाहेर पडणारे सांडपाणी कोणतीही प्रकीर्या न करता कुकडी नदी पात्रात सोडले जात आहे. त्यामुळे कुकडी नदी पात्राला गटारीचे स्वरूप प्राप्त झाले असून पाण्यावर विशिष्ट प्रकारचा तेलकट तवंग निर्माण झाला आहे. या पाण्याला दुर्गंधी येत असून या पाण्यामुळे डास व माश्‍यांचे प्रमाण वाढून साथीचे रोग बळावण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. कुकडी नदी पात्रात हॉटेल व इतर व्यावसायिकांनी टाकलेला ओला व सुका कचरा यामुळे पाणी दुषित झाले असून नदी पात्र प्लास्टिकमय झाले आहे. तसेच काहींनी गोळेगाव येथील पात्रात घरकामाचा निघालेला राडारोडा व कचरा कुकडीत आणून टाकला असल्याने नदी पत्राची रुंदी कमी होऊ लागली आहे.

काही ठिकाणी कुकडी नदीपात्रात अतिक्रमणे केली असून नदीपात्र कमी करण्याचा घाटच मांडला आहे. नदीपात्रात राडारोडा टाकून होणारे अतिक्रमण वेळेत नाही थांबविले तर गोळेगाव येथील पुल पावसाळ्यात पाण्याखाली जाऊ शकतो, अशी परिस्थिती निर्माण होईल. कुकडी माईच्या दुषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात असून पशुपक्षी यांचे ही आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. कुकडीचा गुदमरणारा श्वास मोकळा करण्याची व तिला प्रदूषण मुक्‍त करण्यासाठी लवकर उपाययोजना करणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)