कुकडी डाव्या कालव्यावरील पूल धोकादायक

बेल्हे- बोरी बुद्रूक-आळे रस्त्यावर कुकडी डावा कालव्यावर असलेल्या पुलाला कठडे नसल्यामुळे तो धोकादायक बनला आहे. येथे अनेक छोटे-मोठे अपघात होऊनही जलसंपदा विभाग या दुरुस्तीच्या मागणीकडे कानाडोळा करीत असल्याने, जलसंपदा विभागाला येथे किती अपघात अपेक्षित आहे, असा प्रश्न ग्रामस्थांतून उपस्थित होत आहे.
याबाबत सविस्तर माहीती अशी, बोरी बुद्रूक-आळे रस्त्यावरून कुकडी डावा कालवा गेलेला आहे. या कालव्याच्या पुलाला जवळपास तीस वर्षांहून अधिक लोटला आहे. कालव्याला वर्षातून चार वेळा पाणी आवर्तन असल्याने कालव्याला बरेच पाणी असते. या रस्त्यावर वाहनांची नेहमीच मोठ्या प्रमाणात वर्दळ असते.महाविद्यालयीन विद्यार्थीही सायकल वरून ये-जा करीत असतात. शेतकरी शेती मालाला बाजारपेठेत नेण्यासाठी या रस्त्याचा वापर करतात.
या रस्त्यावरून प्रवास करीत असताना कुकडी डाव्या कालव्याच्या पुलाजवळ आल्यास फार सावधानता बाळगावी लागते कारण पूल अरूंद आहे.एका वेळेस एकच वाहन ये-जा करू शकते .पूल उंचावर असल्याने दोन्ही बाजूंची वाहने दिसत नाहीत, ते वाहन पुलाजवळ आल्यावरच दिसते. शिवाय पुलाजवळ आळे गावच्या दिशेला रस्ता वळणाचा आहे, त्यामुळे एखादे जोरात आलेले वाहन पुलाच्या कठड्याला जाऊन आदळते आणि काही वेळा कालव्यातही कोसळते. अशा अपघाताच्या घटना मागच्या काही काळात घडल्या आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची, नागरिकांची, वाहन चालकांची या पूलावरून नेहमीच वर्दळ आहे. जल संपदा विभागाच्या सबंधित खात्याने या पुलाच्या कठड्याची दुरुस्ती करावी, अशा मागणीचे पत्र ग्रामस्थांनी दिली आहेत, तरी देखील संबधित खात्याच्या अभियंत्यांनी कठड्याच्या दुरुस्ती कामाला सुरुवात केलेली नाही.

  • ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा
    कालव्याला वर्षातून चार वेळा पाणी आवर्तन असल्याने कालवा नेहमी भरलेला असतो. या पाण्यात पडून अनेक जण वाहून गेल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. येथे मोठा अपघात अथवा मोठी दुर्घटना घडली तर जबाबदार कोण राहील, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या पुलाच्या कठड्याची दुरूस्ती करावी अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)