कुकडीच्या पाण्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन

निघोज  – कुकडी नदीतून हक्काचे पाणी मिळावे व पाणी चोरी करणा-यांवर तातडीने कारवाई करावी, या मागणीसाठी निघोज व परिसरातील शेतक-यांनी गुरुवार (दि. 14) रोजी पुन्हा उपोषणाचे हत्यार उपसले आहे. पाण्यासाठी संघर्ष करूनही पाणी मिळत नसल्याने कुकडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेत सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिल्याने कुकडीचे पाणी पारनेर तालुक्‍यात चांगलेच पेटले आहे. निघोज व परिसरातील गावांना तसेच शिरूर तालुक्‍यातील गावांना कुकडी डावा कालव्याचे हक्काचे पाणी मिळावे, तसेच एसकेएफ 44 मधील अतिक्रमण तातडीने काढून परिसरातील शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या मागणीसाठी पारनेर तालुक्‍यातील निघोज, गाडीलगाव, कुंड तसेच शिरूर तालुक्‍यातील टाकळीहाजी, होणेवाडी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपोषणात सहभागी झाले आहेत.
आज दि. 14 रोजी सकाळी 11 वाजता हे शेतकरी उपोषणाला बसले आहे. आज अधिकाऱ्यांनी अतिक्रमण न काढल्यास शुक्रवार, दि. 15 रोजी हे शेतकरी सामुदायिक आत्मदहन करणार आहेत. गेली पंधरा दिवसांपूर्वी या परिसरातील शेतकऱ्यांनी याच मागणीसाठी कुकडी कार्यालयासमोर 31 तासांचा बैठा सत्याग्रह केला होता. त्या वेळी कुकडीच्या उपकार्यकारी अभियंता सुचिता डुंबरे यांनी 44 एसकेएफवरील पाइप काढून अतिक्रमण काढण्याचे लेखी आश्‍वासन दिले होते. मात्र, यासाठी पारनेर पोलिसांनी बंदोबस्त दिला नाही, ही सबब सांगून अतिक्रमण काढण्यासाठी कुकडीच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांकडे वेळ मागितला. मात्र, कुकडीचे अधिकारी राजकीय दबावाला बळी पडून कारवाई करण्यासाठी विलंब करत आहेत, हा आरोप करून शेतकरी आज उपोषणाला बसले आहेत. कुकडीचे शाखा अभियंता मधुकर दिघे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन लवकर पाइप काढून अतिक्रमण काढण्याचे आश्‍वासन दिले आहे. मात्र, वरिष्ठ अधिकारी जोपर्यंत कारवाई करीत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी (दि. 15) दुपारी कधीही सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा आंदोलक शेतकऱ्यांनी दिला आहे.

कुकडीच्या पाण्याबाबत राजकीय नेत्यांची उदासीनता
पारनेर तालुक्‍यात गेल्या 15 दिवसांपासून कुकडीच्या पाण्यासाठी शेतक-यांचा सातत्याने संघर्ष सुरू असताना व पाटपाण्याचा प्रश्‍न गंभीर बनला असताना लोकप्रतिनिधीसह तालुक्‍यातील राजकीय नेतेमंडळींनी या पाण्याच्या आंदोलनाकडे पाठ फिरविली असल्याने व कुकडीचे वरिष्ठ अधिकारी राजकीय हस्तक्षेपामुळे कारवाई करण्यास धजावत नसल्याने कुकडीच्या पाण्याची कोंडी कधी फुटणार, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)