कुंदन गायकवाड यांचे नगरसेवक पद रद्द

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक कुंदन अंबादास गायकवाड यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले आहे. जातवैधता प्रमाणपत्र अवैध असल्याचा बुलढाणा जात पडताळणी समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी गायकवाड यांचे नगरसेवक पद रद्द केले आहे. आतापर्यंत नगरसेवक म्हणून गायकवाड यांना दिलेले सर्व भत्ते महापालिका प्रशासनाकडून वसूल केले जाणार आहेत.

कुंदन गायकवाड हे कैकाडी जातीचे असून, ते सोलापूर जिल्ह्यातील मूळ रहिवासी आहेत. सोलापूर जिल्ह्यात कैकाडी ही जात विमुक्त जात या प्रवर्गात मोडते. कुंदन गायकवाड यांनी विमुक्त जात या प्रवर्गातून पुण्यात जमीन मिळविली आहे. त्याबाबतचे पुरावे जात पडताळणी समितीसमोर सादर करण्यात आले. त्या आधारे कुंदन गायकवाड यांचे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र बुलढाणा जात पडताळणी प्रमाणपत्र समितीने अवैध ठरविले होते. तसेच गायकवाड यांनी बनावट कागदपत्रे सादर करून जात पडताळणी समितीची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात कारवाई करण्याचे आदेशही दक्षता पथकाच्या पोलिस निरीक्षकांना दिले होते.

या सर्व घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर बुलढाणा जिल्हा जात पडताळणी समितीच्या या निर्णयाविरोधात कुंदन गायकवाड यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले होते. नागपूर खंडपीठाने गायकवाड यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्याच्या निर्णयाला 1 सप्टेंबर 2018 पर्यंत स्थगिती आदेश दिले होते. त्यामुळे नगरसेवक गायकवाड यांना दिलासा मिळाला होता. परंतु, ही मुदत संपताच बुलडाणा जिल्हा जात पडताळणी समितीने 29 सप्टेंबर 2018 रोजी नगरसेवक कुंदन गायकवाड यांचे जात प्रमाणपत्र रद्द केल्याचा अंतिम निकाल दिला आहे. गायकवाड यांचा कैकाडी अनुसूचित जातीचा दावा समितीने अमान्य केला आहे. त्यांना अनुसूचित जातीचे म्हणून दिलेले फायदे तत्काळ काढून घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी गायकवाड यांचे पद रद्द केले आहे.

बुलढाणा जात पडताळणी समितीने नगरसेवक कुंदन गायकवाड यांचे यांचे जात प्रमाणपत्र रद्द रद्द केले आहे. त्याबाबतचा अहवाल शुक्रवारी (दि. 5) महापालिकेला प्राप्त झाला. त्यानंतर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी गायकवाड यांचे पद्द रद्द केले आहे. त्याबाबतचे आदेश पारित केला आहे. या आदेशाची प्रत गायकवाड, नगरविकास विभाग, राज्य निवडणूक आयोग आणि पालिकेच्या नगर सचिव विभागाला पाठविली आहे. गायकवाड यांना दिलेले सर्व भत्ते वसूल केले जाणार आहेत.
– प्रवीण आष्टीकर,
सहाय्यक आयुक्‍त, निवडणूक विभाग, महापालिका.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)