कुंडलिनी शक्‍तीचे उर्ध्वगमन करणारे – सुप्तभद्रासन

हे शयन स्थितीतील आसन आहे. हे दोन प्रकारे करता येते. या आसनामध्ये जप प्राणायाम, ध्यान सहज आणि चांगल्याप्रकारे करता येते. सुप्तगोरक्षासन हे त्याचे दुसरे नाव. पहिल्याप्रकारात आसन करताना आधी शयनस्थिती घ्यावी. उजवा पाय गुडघ्यात वाकवून त्या पायाची टाच जननेंद्रिय व गुदद्‌वाराच्या मध्ये असणाऱ्या शिवणीच्या उजव्या भागात तसेच डावा पाय गुडघ्यात वाकवून त्या पायाची टाच शिवणीच्या डाव्या भागात अशा प्रकारे ठेवावी की दोन्ही चवडे चिकटून रहाते. पाठीवर झोपल्यामुळे दोन्ही पायांच्या टाचा शिवणीच्या भागापासून दूर ठेवल्या जातात. नंतर दोन्ही हातांचे पंजे दोन्ही पायाच्या मांड्यांवर दाबून ठेवावेत. मात्र ते सरळ राहिले पाहिजेत असेच दाबावेत. या आसनाचा कालावधी हळूहळू वाढवता येतो. सुरूवातीला तीस सेकंदापर्यंत करता येते पण नंतर ते पंधरा मिनिटांपर्यंत टिकवता येते.

सुप्तभद्रासनाच्या दुसऱ्या प्रकारामध्ये फक्‍त हातांची बोटे एकमेकात गुंफुन ते बंद करून पायाच्या पंजामध्ये बोटे अडकवावीत. यामध्ये दोन्ही हातांचा ताण हात सरळ असल्यामुळे डाव्या व उजव्या बाजूच्या ओटीपोटावर पडतो. एकमेकात गुंफलेल्या हाताच्या बोटांनी पंजे खेचावेत. ते खेचताना मान, डोकं व खांद्याचा भाग वर उचलावा. दुसऱ्या प्रकारे केलेले सुप्तभद्रासनसुद्धा सरावाने तीन मिनिटांपर्यंत टिकवता येते. या आसनाचे अनेक फायदे आहेत.

मुख्य म्हणजे रक्‍ताभिसरण क्रिया चांगली होते. अंतस्त्रावीग्रंथी चांगले कार्य करू लागतात. हृदय बलवान होते, हृदयाची धडधड अधिक कामाने वाढत नाही. या आसनामुळे शरीरातील प्रत्येक अवयवाची कार्यक्षमता वाढते. मन प्रसन्न करणारे आणि शरीर निरोगी राखणारे असे सुप्तभद्रासन नियमित सरावाने चांगल्याप्रकारे करता येते व तीन मिनिटांपर्यंत टिकवता येते. सुप्तभद्रासन केले असता पद्‌मासन, मत्स्यासन, पद्‌मदोलासन या सर्व आसनांचे फायदे मिळतात. कुंडलिनी शक्‍तीचे उर्ध्वगमन होते आणि कुंडलिनी शक्‍ती जी मुलाधार चक्रामध्ये जी साडेतीन वेटोळ्यामध्ये स्थित आहे ती जागृत होऊन तिचे उर्ध्वगमन होण्यासाठी सुप्तभद्रासन नियमित केले पाहिजे असे काही योग तज्ञांचे मत आहे. एकूणच या आसनामध्ये ध्यानधारणा, जप, प्राणायाम करणे सोपे जाते. हे आसन करणाऱ्या व्यक्‍ती अधिक श्रम करू शकतात. तीन मिनिटे आसन टिकवताना अवयवांचे शिथिलीकरण केले पाहिजे म्हणजे शरीर आणि मनाला विश्रांती मिळून ते ताजेतवाने होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)