कुंजीरवाडी येथे बेबी कालव्यातून पाणी गळती

परिसरातील घरांना आणि शाळेला धोका

उरुळीकांचन, (दि. 20) वार्ताहर – कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील बेबी कालव्यातून होणाऱ्या पाणी गळतीमुळे कालव्याच्या परिसरातील घरे व जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला धोका निर्माण झाला आहे. याबाबत कुंजीरवाडी ग्रामस्थांच्या वतीने बेबी कालव्याच्या अस्तरीकरणाची मागणी हवेली तालुका शिवसेना विभागप्रमुख स्वप्नील कुंजीर, सोरतापवाडी येथील प्रशांत चौधरी आणि उरुळी कांचन येथील अमित कांचन, अजय कांचन, रतिकांत यादव यांनी केली आहे.
सोरतापवाडी, कुंजीरवाडी, उरुळी कांचन परिसरात बेबी कालव्यावर उभारण्यात आलेल्या पुलाच्या कमी व्यासाच्या नळ्या व कालव्यामध्ये वाढणारी जलपर्णी यामुळे पाण्याच्या प्रवाहाला अडथळे निर्माण होऊन पाणी झिरपण्याचे प्रमाण वाढत आहे. सुमारे वर्षभरापासून सुरू केलेल्या बेबी कालव्यामुळे कालव्याच्या परिसरातील शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. मात्र, लोकवस्तीच्या ठिकाणी होणाऱ्या पाणी गळतीमुळे पिण्याच्या पाण्याचे स्रोत व पाझरणाऱ्या पाण्यामुळे घरांच्या भिंती, जिल्हा परिषद शाळा पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. याबाबत मागील वर्षीच्या ऑगस्ट महिन्यापासून कुंजीरवाडी ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीचा पाटबंधारे विभागाकडे पाठपुरावा सुरू आहे. मात्र, पाटबंधारे खात्याकडून गळतीच्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाची मलमपट्टी करण्यात येत होती. खासगी बांधकाम अभियंत्याने परिस्थितीची पाहणी करून पाणी गळतीवर योग्य उपाय न केल्यास शाळा, तसेच परिसरातील घरे पडण्याची दाट शक्‍यता वाढली असल्याचे सांगितले. दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधीपर्यंत अशीच परिस्थिती राहिल्यास जीवितहानी व वित्तहानी नाकारता येऊ शकणार नसल्याचा खुलासा त्यांनी केला.
स्वप्नील कुंजीर यांनी उपजिल्हाधिकारी व पाटबंधारे विभागाकडे निवेदनाद्वारे कालव्याच्या अस्तरीकरणाची मागणी केली. यावर निवासी उपजिल्हाधिकारी मुठे यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित पाटबंधारे अधिकाऱ्यांशी संपर्क करून तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले तसेच पाटबंधारे विभागाचे अधीक्षक कपोले यांनी कालव्याच्या अस्तरीकारणासाठी आवश्‍यक निधीची उपलब्धता करून पाणी गळतीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचा आदेश संबधित अभियंते बी. डी. थोरात यांना दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)