कीटक प्रतिबंधक विभागालाच “संसर्ग’

57 % पदे रिक्‍त : तोकड्या मनुष्यबळाचा पावसाळी कामांना फटका

प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि.16 – पावसाळ्याच्या तोंडावर पालिकेकडून अपेक्षित तयारी मात्र अपूर्ण असल्याचे दिसत आहे. कीटक प्रतिबंधक विभागाकडून या काळात होणारी कामे करण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे मनुष्यबळच नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे पावसाळी कामे पालिका यंदा करणार, की नाही? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.
पावसाळ्यापूर्वी साधारणत: 15 जूनपर्यंत शहरातील जलस्रोतांची सफाई, पावसाळ्यासाठी कीटक प्रतिबंधक औषधींची खरेदी, कंत्राटी कामगार भरती, जनजागृती अशी बरीच कामे करावी लागणार आहेत. यासाठी साधारण महिनाभर आधीच याची तयारी सुरू होणे गरजेचे आहे. मात्र, पावसाळा तोंडावर असतांनाही अजून 57 टक्के कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. कीटक प्रतिबंधक विभागाकडे सध्या एकूण 513 पदे असून त्यातील जवळपास 222 पदे रिक्त आहेत. या विभागामार्फत पत्रक, स्टीकर, बॅनर्सची छपाई, जनजागृतीपर संदेश पाठविणे, पुस्तिका, सर्व स्थरातील शाळा, कॉलेजांतील शिक्षक व विद्यार्थ्यांसोबत सभा घेणे, पीएमपी बसेसवर पोस्टर्स, स्टीकर्स लावणे, सहकारी सोसायटी रहिवाशांच्या बैठका घेणे, माध्यमांद्वारे जनजागृती करणे, गरीब वस्तीतील बचत गट, अंगणवाडी, गणेश मंडळांसोबत बैठका घेऊन त्यांना माहिती देणे, तसेच वैद्यकीय व्यावसायिकांच्या विविध संघटनांबरोबर बैठका घेणे अशी कामे केली जातात. त्याचप्रमाणे घरोघरी डासोत्पत्ती ठिकाणे शोधणे व ती नष्ट करणे, साप्ताहिक अळीनाशक औषध फवारणी आणि डेंग्यू रुग्ण रहिवासी क्षेत्रात धुरफवारणी करणे, नाल्यांमध्ये अळी नाशक औषध फवारणी करणे, कीटकजन्य आजारसदृश्‍य रुग्णांच्या आणि इतर भागांत डास निर्मूलनाबाबत तक्रारींचे निराकरण करण्याची महत्त्वाची कामेही या विभागाकडून केली जातात.

कर्मचारी कमी आहेत, ही बाब खरी आहे. मात्र पावसाळ्यापूर्वीची तयारी वेळेत सुरू करण्यात येईल. त्याचबरोबर पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील जलस्रोतांतील जलपर्णी निर्मूलन करण्यासाठी कीटक प्रतिबंधक विभागातर्फे संपूर्ण मुळा-मुठा नदी तसेच तलावामधील जलपर्णी बोट, स्पाइडरमॅन, मशीन आणि जेसीबी यंत्राने कर्मचारी दर शनिवारी काढून टाकते. नदीपात्रालगत डबक्‍यांमध्ये डासोत्पत्ती होवू नये म्हणून त्यावर साप्ताहिक स्वरुपात अळीनाशक औषध फवारणी करण्यात येते.
– डॉ. वैशाली जाधव, सहायक आरोग्य प्रमुख, मनपा.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)