किस्से असेही

ही घटना आहे 1974 मधील. उत्तर प्रदेशातील आंवला लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार राजवीर सिंह हे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जुन्या मित्रांपैकी एक होते. 1974 मध्ये जनसंघाच उमेदवार शाम बिहारी यांच्या निवडणूक प्रचारासाठी अटलबिहारी वाजपेयी बरेलीला आले होते. त्यावेळी राजवीर सिंह आणि माजी महापौर सुभाष पटेल यांना घेऊन बरेलीहून अलिगंजला जात होते. अचानकपणे त्यांची जीप एका खड्ड्यात अडकली. काही क्षण प्रयत्न करून पाहिले, पण व्यर्थ. लगेचच अटलजी जीपमधून उतरले आणि म्हणाले, राजवीर तू गाडी चालव, आम्ही धक्‍का देतो.’

याबाबत राजवीर सिंह सांगतात, की मझगवा ब्लॉकच्या समोर आमची जीप पोहोचली तेव्हा ती एका मोठ्या खड्डयात अडकली. मी बराच प्रयत्न केला पण काही केल्या जीप त्यातून बाहेर येईना. अखेर मी वाजपेयींना म्हणालो की, तुम्ही स्टिअरिंग सांभाळा मी गाडीला मागून धक्‍का देतो. पण त्यांनी माझे म्हणणे ऐकले नाही. ते म्हणाले, तुम्ही बसा मी गाडी ढकलतो.

अटलजी गाडी ढकलत आहेत हे पाहून तेथे गर्दी जमा झाली आणि लोकांनी खड्ड्यात अडकलेली जीप बाहेर काढून दिली. गाडीत बसल्या बसल्या अटलजी म्हणाले, “पाहिलंस राजवीर, तू गाडी चालवण्यात माहीर आहेस आणि मी अडचणीत सापडलेल्या लोकांना बाहेर काढण्यात !’ यावर आम्ही हसत हसत अलीगंजला जाण्यासाठी पुढे प्रयाण केले. राजवीर सांगतात, यानंतर आमच्यातील गाठीभेटी अखंड सुरू राहिल्या. मी 60 वर्षांचा झालो तेव्हा अटलजींनी मला शुभेच्छा संदेश पाठवला. त्यात माझी खूप प्रशंसा केली होती. ते वाचून मी खूप रडलो. आजच्या राजकारणात खरोखरीच अटलजींसारखे नेते दुर्मिळ झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)