किसान सभेचा तहसीलवर मोर्चा ; पंतप्रधान आवास योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप

पंतप्रधान आवास योजनेत भ्रष्टाचार होत असल्याचा आंदोलकांनी केला आरोप

अकोले: तालुक्‍यातील ‘पंतप्रधान आवास घरकुल योजने’त मोठा भ्रष्टाचार होत आहे. त्यामध्ये पंचायत समितीचे अधिकारी व पदाधिकाऱ्यां मोठा सहभाग असल्याचा घणाघाती आरोप किसान सभेच्या वतीने आज तहसील कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चा प्रसंगी करण्यात आला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यापुढे तालुक्‍यातील भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही व अधिकारी-पदाधिकाऱ्यांची मुजोरी मोडून काढण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. या सर्व प्रकरणांची चौकशी करण्याची मागणीही आंदोलकांच्या वतीने करण्यात आली.
8 व 9 जानेवारी रोजी अखिल भारतीय कामगार संपानिमित्ताने अकोलेत शेतकरी-कामगारांच्या मोर्चाचे किसान सभा व सिटू संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयावर आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी हा आरोप करण्यात आला. प्रारंभी मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या येथील वसंत मार्केटमधील कार्यालयापासून मोर्चेकरी अकोले शहरातून तहसील कार्यालयावर विविध घोषणा देत धडकले. यावेळी मोठ्या संख्येने अंगणवाडी कर्मचारी, शेतकरी, कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी पंतप्रधान आवास घरकुल योजनेतील अंमलबजावणी संदर्भात अत्यंत संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. या योजनेची अंमलबजावणी करताना अकोले तालुक्‍यात गंभीर स्वरूपाचे गैरव्यवहार झाले असून, घरकुले नावावर असणाऱ्या लाभार्थ्यांना पुन्हा घरकुल देण्याचा प्रकार तालुक्‍यात घडलेला आहे. यामध्ये वंचित राहिलेल्या लाभार्थ्यांची नावे यादीत समाविष्ट होण्यासाठी पं. स.चे अधिकारी व पदाधिकारी त्यांच्या गावागावांतील हस्तकांमार्फत गरिबांकडून रोख पैशांची मागणी करत असल्याचा गंभीर आरोप शेतकरी करत आहेत, असे आंदोलक म्हणाले.

केवळ यादीच्या सर्वेक्षणासाठी फोटोग्राफर गावोगावी पाठवून प्रतिकुटुंबा मागे 100 रुपये वसूल केल्याच्या तक्रारीही शेतकऱ्यांनी केल्या आहेत. पं. स.च्या अधिकाऱ्यांना वारंवार विनंत्या करूनही विविध प्रश्‍न सोडविण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याबद्दल शेतकरी, कार्यकर्त्यांनी आपला रोष व्यक्त केला.

या मोर्चात शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारींची खातरजमा करून यात तथ्य आढळल्यास किसान सभा संबंधितांची गय करणार नाही. एक महिना संपूर्ण तालुक्‍यात तयारी करून पंचायत समितीवर हल्लाबोल करण्याचे नियोजन करण्यात येईल. तालुक्‍यातील भ्रष्टाचार सहन केला जाणार नाही. मुजोरी मोडून काढली जाईल, अशा प्रकारच्या संतप्त भावना मोर्चेकऱ्यांनी व्यक्त केल्या.

यावेळी किसान सभेचे प्रदेश सचिव डॉ. अजित नवले, सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, गणेश ताजणे, एकनाथ मेंगाळ, साहेबराव गोडे आदींनी संतप्त भावना व्यक्त केल्या.

अकोले तालुक्‍यातील पाच मंडळांतील 116 गावांत शासनाने अलीकडेच दुष्काळ जाहीर केला. मात्र या यादीतून तालुक्‍यातील तीन महसूल मंडळे वंचित राहिली. त्या मंडळांतही दुष्काळ जाहीर करावा, वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी करावी, हरविलेले वनदावे शोधून त्यानुसार शेतकरी कसत असलेल्या जमिनी त्यांच्या नावे कराव्यात, आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी तहसीलदार मुकेश कांबळे व महिला व बाल कल्याण प्रकल्प अधिकारी गांगुर्डे यांना मोर्चेकऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

तहसीलदार मुकेश कांबळे यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारल्यानंतर पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांसमवेत तातडीने बैठक घेण्यासाठी पुढाकार घेऊ. तसेच पुढील आठवड्यात प्रांताधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अकोले येथे बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)