किसन वीर कारखान्यावर कारवाई का नाही?

बिलाच्या प्रतिक्षेत असलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा सवाल
सातारा,
राज्यात सहा साखर कारखान्यांवर साखर आयुक्तालयाने कारवाईचे आदेश दिले आहेत. याबाबत संबंधित विभागातील जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत. कारवाई झालेल्या कारखान्यांमध्ये सोलापूरमधील चार तर उस्मानाबाद आणि सांगली जिल्ह्यातील प्रत्येकी एका कारखान्याचा समावेश आहे. या सर्व साखर कारखान्यांनी ऊस नियंत्रण मधील तरतुदींचे उल्लघन केल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. दरम्यान, नियमांचे उल्लघन केल्याप्रकरणी या कारखान्यांवर कारवाई केली आहे तर मग सातारा जिल्ह्यातील किसन वीर कारखान्याने शेतकऱ्यांची कोट्यवधींचे बिले थकविणे हे साखर आयुक्तालयाच्या कोणत्या नियमात बसेत? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. साखर आयुक्तालयाच्या आदेशनंतरही किसन वीरने बिले दिलेली नसताना कारवाईमध्ये किसन वीर कारखान्याला कोणत्या अधिकारात सूट देण्यात आली आहे, याचा खुलासाही साखर आयुक्तालयाने करावा, अशी भावना किसन वीरच्या ऊस उत्पादक शेतकरी सभासदांमधून व्यक्त होत आहे.
2017-2018 या गळीत हंगामातील कोट्यवधी रुपयांची ऊस बिले किसन वीर सहकारी साखर कारखान्याने थकविली आहेत. डिसेंबर 2017 या महिन्यानंतरही तुटून गेलेल्या ऊसांची बिले न दिल्याने शेतकरी वर्ग पुरता अडचणीत आला आहे. ऊस बिले मिळावीत यासाठी लोकप्रतिनिधींसह साखर आयुक्तांकडे पाठपुरावादेखील केला. मात्र, कारवाईचे कागदी घोडे नाचविण्यापलिकडे साखर आयुक्तालयाकडूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. शेतकऱ्याच्या पाठपुराव्यानंतर साखर आयुक्तांनी किसन वीरच्या मालमत्तेवर टाच आणली. त्यानंतर बिले मिळतील असे शेतकऱ्यांना अपेक्षा होता. मात्र, पुन्हा साखर आयुक्तांची कारवाई दस्तुरखुद्द सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी रद्द केली. त्यामुळे शेतकरीवर्गाच्या बिले मिळण्याच्या अपेक्षा पुरत्या मावळल्या आहेत. बुधवारी साखर आयुक्तालयाने शेतकऱ्यांची बिले थकविणाऱ्या सहा कारखान्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. याबाबत संबंधित विभागातील जिल्हाधिकाऱ्यांनाही आदेश देण्यात आले आहेत. मात्र, या कारवाईतून सातारा जिल्ह्यातील किसन वीर कारखान्याला वगळण्यात आले आहे. या कारवाईमुळे साखर आयुक्तालयाच्या कारभाराबाबतच शंका उपस्थित होऊ लागली आहे.
अध्यक्षांना नाही सोयरसुतक
कोट्यवधीची बिले थकविलेल्या “किसन वीर’चे अध्यक्ष मदन भोसले यांनी बिलाबाबत “ब्र’ शब्दही उच्चारलेला नाही. विरोधकांची टीका, साखर आयुक्तांचे कारवाईचे आदेश, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा या सर्व गोष्टींना सोईस्कर बगल देत अध्यक्षांनी आगामी हंगामासाठी कारखाना सज्ज असल्याचे सांगत संचालकांसह कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत नुकतेच मिल रोलरच्या पुजनाचा कार्यक्रमदेखील उरकून घेतला आहे. यावेळी त्यांना शेतकऱ्यांसह सभासदांना सांघिक प्रयत्नासाठी आवाहनदेखील केले. मात्र, गळीत हंगामील बिले देणार की नाही? याबाबत “ब्र” शब्दही उच्चारलेला नाही. मदन भोसले यांच्या या भूमिकेमुळे त्यांना शेतकऱ्यांच्या थकित बिलांबाबत कसेलेही सोयरसुतक नसल्याचेच प्रकर्षाने स्पष्ट होत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)