किशोर मासाळ : आक्रमक आणि दणकट नेतृत्व!

राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून आपलं नेतृत्व सिद्ध करणारे किशोर मासाळ हे एक युवा नेतृत्व आहे. राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून या नेतृत्वाची झीज होते आहे हे लक्षात येताच अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात या नेतृत्वाला योग्य ती संधी दिली आणि या दणकट नेतृत्वाच्या कार्यकर्त्याला आणखी उत्साह मिळाला. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर मासाळ यांच्याशी दैनिक प्रभातच्या वर्धापनदिनानिमित्त साधलेला संवाद…

अजितदादांविषयी…
किशोर मासाळ अजितदादांबद्दल भरभरून बोलतात. ते म्हणतात, “”एखाद्या कार्यकर्त्यांत चांगला गुण दिसला की अजितदादा त्याला उचलून घेतात. अजितदादा हे कार्यकर्त्यांना ताकद देणारा नेता आहे. राष्ट्रवादीतल्या अशा अनेक कार्यकर्त्यांना अजितदादांनी ताकद दिली आहे. मी जामखेड जेलमध्ये असताना तू लढ मी तुझ्या पाठीशी आहे, असे ते स्वत: भेटून मला बळ देत होते. तर कधी कार्यकर्त्यांद्वारे मला कायम प्रोत्साहित करीत होते. एकेकाळी त्यांच्या रागाला मी पात्र होतो. तरीही त्यांनी मला जीव लावला. भविष्यात त्यांच्यावरच आमची निष्ठा आहे. महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री होण्यासाठी असणारं खंबीर नेतृत्व दादांमध्ये आहे”, असं मासाळ सांगतात.

किशोर मासाळ आणि निवडणुका
-श्र 2012 ः पंचायत समिती निवडणूक ः जळोची गाव
-श्र 2013 ः नगरपालिका निवडणूक सपत्नीक लढवली
-श्र 2016 ः नगरपालिका निवडणूक सपत्नीक लढवली.
-किशोर मासाळ यांनी आजपर्यंत वरील निवडणुका लढवल्या; पण त्यांच्यासमोर उभं ठाकणं, हे तत्कालिन विरोधकांना अवघड गेलं होतं, हे आवर्जून नमूद करायला हवं.

बॅनरबाजी, वाढदिवसापासून दूर असलेला नेता

वाढदिवसासह कोणतंही निमित्त अलीकडच्या युवा कार्यकर्त्यांना बॅनर लावण्यासाठी पुरतं. पण किशोर मासाळ यांना अशा पद्धतीची कोणतीही बॅनरबाजी पटली नाही. ते कधीही कोणताही बॅनर स्वतः लावत नाहीत किंवा लावूही देत नाहीत. बॅनरबाजीपासून दूर असलेल्या या नेत्याचा आदर्शन तरुण नेतृत्वानं घ्यायला हवा.

महत्त्वाची आंदोलने

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

-2008 ः विद्यार्थ्यांची स्कॉलरशीप देत नसल्याकारणानं समाज कल्याण ऑफिस फोडलं.
-2013 ः अजितदादा पवार यांच्या विरोधात “एफआरपी’साठी शेतकऱ्यांचा अर्धनग्न मोर्चा काढला.
-मधुकर पिचड यांची अंतयात्रा काढली. 25 कार्यकर्त्यांसाठी 1000 पोलीस तैनात करण्यात आले होते.
-2014 ः धनगर आरक्षण आंदोलन. अजितदादांच्या सहयोग निवासस्थानात मेंढरं घुसवली.
-2015 ः अजितदादांच्या सहयोग बंगल्याचं नळकनेक्‍शन तोडलं.
-2018 ः धनगर आरक्षण प्रश्‍नी मुख्यमंत्र्यांना बकरं कापून जेवण घातलं.
-2018 ः मंत्री राम शिंदे यांच्या घरी जनावरे सोडली.
-2018 : चौंडी (जि. नगर) येथील धनगर आरक्षण संदर्भात सभा उधळवली
व जमखेडमध्ये एक महिना जेल.

गाजलेल्या घोषणा

-कोणताही नेता ओळखला जातो, तो त्याच्या घोषणांमुळं. किशोर मासाळ यांच्या आंदोलनातल्या घोषणाही अशा चमत्कृतीपूर्ण असतात. त्यातल्या या गाजलेल्या घोषणा…
-सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है ।
-नगरपालिका कैसी है, पाकिस्तान जैसी है ।

कार्यकर्त्यांच्या पोटाकडेही नेत्यानं लक्ष द्यावं…
प्रत्येक कार्यकर्त्याच्या काही अपेक्षा असतात, त्या प्रत्येकजण पूर्ण करू शकेलच असं नाही. पण नेत्यानं कार्यकर्त्याच्या पोटाकडं लक्ष दिलं पाहिजे. ज्या कार्यकर्त्यानं तळमजला बांधायला मदत केली, त्याला नेत्यानं कधीही विसरू नये, असं सांगत मासाळ यांनी महादेव जानकर यांना टोला लगावला. सत्ता, संपत्ती कायम राहणार नाही, त्यामुळं आपली जिवाभावाची माणसं जपली पाहिजेत, ही गोष्ट मी पाळतो.

कोंदणात ठेवलेला हिरा जसा लपवून ठेवता येत नाही, तो योग्य त्या ठिकाणी योग्य त्यावेळी चकमकतोच, त्याचप्रमाणं किशोर मासाळ हे युवा नेतृत्व सदा चमकणारं असं युवा नेतृत्व आहे. मतदानाचा अधिकार मिळण्याच्याही आधीपासून ते राजकारण आणि समाजकारणात आहेत. त्यातून त्याचं नेतृत्व प्रबळ होत गेलं आणि किशोर मासाळ हेच नाव अनेकांसाठी डोकेदुखी ठरलं. “किशोर मासाळची आंदोलने ही माझ्यासाठी एक डोकेदुखीच असायची.

या मुलानं कित्येकवेळा मला अगदी नाकीनऊ आणलं आहे. हे नेतृत्व आपल्या पक्षात असायला हवं, असं मला दरवेळी वाटायचं.’, अशा शब्दात कौतुकाचा वर्षाव करून राष्ट्रवादी पक्षाची माळ किशोर मासाळ यांच्या गळ्यात अजितदादा पवार यांनी टाकली आणि तेव्हापासून हे युवा नेतृत्व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा तरुण आवाज बनलं आहे. तरुणाईची नेमकी नस ओळखून असणारे किशोर मासाळ राष्ट्रवादीची तरुण कार्यकर्त्यांची फळी भक्‍कम करण्यासाठी संधध्या प्रयत्नशील आहेत.
किशोर मासाळ हे जळोची गावचे. मेंढ्या पाळणं हा त्यांचा मूळचा व्यवसाय.

वडील-आजोबा हे मेंढरंच राखायचे. किशोर मासाळ यांनी मात्र शिक्षणाकडे लक्ष दिलं. सातवीपर्यंत जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेतलं त्यानंतर आरएनएटी या रयत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात शिक्षण घेतलं. शिकत असतानाच त्यांचं नेतृत्व बहरलं. महादेव जानकर यांच्या भाषणानं प्रभावित होत त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचं काम करायला सुरुवात केली. 2006 पासून पक्षाचे तालुकाध्यक्ष म्हणून काम करत महाराष्ट्र पिंजून काढला. संघटना मजबूत केली. 2007 मध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशीपप्रश्‍नी आत्मदहनाचा प्रयत्न केला. मागासवर्गीय विद्यार्थ्यांची फी महाविद्यालयांनी घ्यायची नाही, असा शासननिर्णय असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत होतं.

हा प्रश्‍न किशोर मासाळ यांनी असा लावून धरल्यानं परिसरातल्या महाविद्यालयांची त्रेधातिरपिट उडाली होती. या प्रश्‍नाच्या अनुषंगानं महाविद्यालयांवर त्यांनी केसेसही केल्या होत्या. किशोर मासाळ यांनी केलेलं हे पहिलं आणि महत्त्वाचं आंदोलन! या आंदोलनातून त्यांच्यातल्या नेतृत्वाची चुणूक सगळ्यांनीच अनुभवली. त्यावेळी त्यांचं वय इतकं लहान होतं की त्यांना मतदानाचा अधिकारही मिळाला नव्हता. ज्यावेळी तो मिळाला, त्यावेळी पंचायत समितीची निवडणूक लागली होती. जळोची पंचायत समिती गणातून उभं राहून त्यांनी राष्ट्रवादी पक्षाला आव्हान दिलं.

त्यानंतर त्यांनी धनगर आरक्षण प्रश्‍न लावून धरला. त्यासाठी पाच दिवस आमरण उपोषण केलं. तसंच अजितदादा पवार यांच्या घरात मेंढरं सोडूनही आंदोलन केलं. त्यांच्या सहयोग बंगल्याचं नळ कनेक्‍शन तोडूनही त्यांना आव्हान दिलं. बारामतीत अजितदादांना आव्हान देणारी हीच नजर दादांनी हेरली. एकदा जाहीर व्याख्यानात किशोर सारखा कार्यकर्ता आपल्या पक्षात असायला हवा अशी भूमिकाही मांडली. किशोर मासाळ हे आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात आहेत, एकेकाळी विरोध केलेल्याच पक्षात आपण कसे दाखल झालात, असं विचारल्यावर ते म्हणाले, “”राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून मी खूप सक्रियपणे काम केलं.

“उपेक्षित माणसाला अपेक्षित ठिकाणी घेऊन जायचं’ अशी भूमिका मांडणारे आमच्या पक्षाचे नेते महादेव जानकर यांच्याकडून माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडे दुर्लक्ष होऊ लागलं. मुंबईत गेल्यावरही ते भेटायला तयार नसायचे. त्यांच्यासाठी मी माझ्या अंगावर केसेसही ओढवून घेतल्या होत्या. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सन्मानानं वागणूक मिळाली नाही. त्यांच्याबद्दलची नाराजी मी खाजगीत व्यक्‍त करू लागलो. त्याचवेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षानं माझ्यातल्या कार्यकर्त्याला सन्मान दिला. प्रवेशाआधी “तुला काय हवं आहे’, असं मला अजितदादांनी विचारलं तेव्हा “मला काहीही नको, निष्ठावान कार्यकर्ता म्हणून मला काम करायचं आहे. तुम्हाला योग्य वाटलं तरच मला संधी द्या’, असं मी दादांना सांगितलं. त्यांना माझी ही भूमिका पटली आणि मी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात 16 जानेवारी 2018 रोजी प्रवेश केला.”

“शरद पवारसाहेब, सुप्रिया सुळे आणि अजितदादा पवार यांच्या बरोबरीनं बारामतीत व्यासपीठावर भाषण करायला मला संधी दिली, हा मी माझा सर्वोच्च मान समजतो.’ असं किशोर मासाळ अभिमानानं सांगतात. उस्मानाबादच्या कार्यक्रमात मासाळ यांचा पक्षप्रवेश झाला आणि बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्यावतीनं मासाळ यांच्या सत्काराचा कार्यक्रमही ठेवला गेला.

राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतरची कारकीर्द उलगडून दाखवताना किशोर मासाळ म्हणाले, “”13 मार्च ला महाराष्ट्र युवक राष्ट्रवादीचं उपाध्यक्षपद दिलं. त्यानंतर 31 मे रोजी चौंडी इथं धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांची सभा उधळून लावली. त्याला कारणही तसंच घडलं होतं. 2014 ला धनगर समाजाला आरक्षण देतो, असं सरकारनं आश्‍वासन दिलं होतं. पण साडेचार वर्षं पूर्ण झाल्यावरही ते पाळलं गेलं नाही. उलट “सुमित्रा महाजन या लोकसभेच्या सभापती आहेत, महाराष्ट्र सरकार जेव्हा कधी धनगर आरक्षणाची शिफारस पाठवल्यावर लगेचच सुमित्रा महाजन त्यावर सही करून धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करतील’, असा राम शिंदे यांनी सवाल केला.

त्यावर मी फक्‍त “जेव्हा कधी राम शिंदे साहेब’ असा प्रश्‍न विचारला तेव्हा आमची धरपकड करण्यात आली. इतकंच नाही तर आमच्यावर 307 आणि 120 ब ही कलमं लावली गेली. हा विषय अजितदादांनी नागपूरच्या अधिवेशनात तारांकित विषय म्हणून मांडला. त्यानंतर जामखेडच्या जेलमध्ये एक महिना मी होतो. जामीन होऊ नये यासाठीही प्रयत्न केला गेला. खूप छळ करण्यात आला. एक महिन्यानंतर माझी जामिनावर मुक्‍तता झाली.” राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केल्यानंतर चौंडी इथल्या आंदोलनातून किशोर मासाळ यांनी आपली ताकद दाखवून दिली. त्यानंतर अजितदादांनी विश्‍वास दाखवत त्यांना कर्जत-जामखेड मतदार संघाचं निरीक्षकपदाची संधी देत सर्व मतदारसंघ मासाळ यांच्या ताब्यात दिला.

हे विशेषच म्हणावं लागेल. विशेष यासाठी की राष्ट्रवादी पक्षाचे प्रत्येक मतदार संघात जे निरीक्षक आहेत, ते सर्व माजी आमदार आहेत. आमदार नसतानाही निरीक्षक झालेले किशोर मासाळ एकमेव आहेत. दरम्यान, मला सर्वप्रमथम प्रसिद्धि दिली ती पत्रकार स्व. महेंद्र कांबळे यांनी. किशोर मासाळ यांनी त्यांच्या आजपर्यंतच्या राजकीय कारकिर्दीत 112 आंदोलनं केली आहेत. त्यातलं अलीकडचं सगळ्यात गाजलेलं आंदोलन म्हणजे समाजकल्याण मंत्री राम शिंदे यांच्या घरात जनावरे सोडण्याचं आंदोलन.

राम शिंदे यांनी दुष्काळी परिस्थितीत मेंढरं आपल्या सोयऱ्यांच्या घरात सोडावी, असं वादग्रस्त वक्‍तव्य केलं. राम शिंदे हे मासाळ यांच्या दृष्टीनं सोयरे लागतात. त्यामुळं मासाळ यांनी पाच ट्रक मेंढरं त्यांच्या घरी नेऊन बांधली. धनगर समाजाच्या भावना भाजपच्या विरोधात फार तीव्र आहेत. त्याला वाट करून देण्यासाठी किशोर मासाळ सध्या प्रयत्नशील आहेत. मुस्लीम समाज आणि लिंगायत समाजही आत्ता अत्यवस्थ आहेत. इतर समाजांनीही आरक्षणाची मागणी चालू केलेली आहे. याच सगळ्या समाजाची नाळ बांधून राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं त्यांचा आवाज बुलंद करण्याचं काम किशोर मासाळ दणकटपणे करत आहेत. त्याचा फायदा पक्षाला नक्‍कीच होईल, अशी आशा त्यांना आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)