किवळेतील महिलांचा महापालिकेसमोर ठिय्या

स्वच्छतागृहांचा प्रश्‍न : अनुदानासाठी मारावे लागतात हेलपाटे
पिंपरी,  (प्रतिनिधी) – समाविष्ट भागातील नागरिकांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृह उपलब्ध करुन देण्याच्या मागणीसाठी किवळे येथील महिलांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेवर गुरूवारी (दि. 18) मोर्चा काढला. सकाळी अकरा ते दुपारी तीनपर्यंत महिलांनी पालिका भवनाच्या समोर ठिय्या मांडून प्रशासनाच्या विरोधात आंदोलन केले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील 20 गावांचा समावेश 1997 रोजी झाला. तेथील नागरिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने स्वतंत्र विकास आराखडा तयार केला. त्याची अमलबजावनी करण्यात आली. मात्र, सार्वजनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात महापालिका प्रशासन कमी पडले आहे. आज रोजी किवळे भागातील नागरिकांसाठी सार्वजनिक शौचालये नाहीत. त्याचबरोबर झोपडपट्टी किंवा गावालगत राहणाऱ्या नागरिकांना घरगुती शौचालये बांधून देण्यासाठी शासनाने अनुदान देण्यात येते. परंतु, लाभधारकांनी अर्ज केला असता कागदपत्रांच्या पुर्ततेअभावी आम्हाला फेऱ्या माराव्या लागतात. यामुळे नागरिकांची हेळसांड होत आहे. अनेकदा तक्रारी करून महापालिकेचे अधिकारी जुमानत नसल्यामुळे संताप व्यक्त करीत महिलांनी महापालिकेवर मोर्चा काढून आंदोलन केले.

किवळे येथील सुमारे शंभर ते दीडशे महिलांनी गुरूवारी सकाळी अकरा ते दुपारी तीनपर्यंत महापालिकेच्या समोर ठिय्या मांडून आंदोलन केले. दरम्यान, काही नागरिकांनी आयुक्त श्रावण हर्डिकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. नागरिकांच्या मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात, अशी मागणी करीत रहिवाशांनी आयुक्तांसोबत चर्चा केली. त्यांना रितसर निवेदनही देण्यात आले आहे. महापालिकेच्या पोलिसांनी आंदोलनकर्त्या महिलांसोबत हुज्जत घातली. शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू असताना आंदोलनकर्त्या महिलांना दमदाटी करून त्यांना प्रवेश द्वारावरच रोखले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)