किल्ले विसापूरच्या पायथ्याशी वृक्षांवर कुऱ्हाड अन्‌ बेकायदा उत्खनन

किल्ले विसापूर : पायथ्याच्या वनक्षेत्राच्या हद्दीत अनधिकृतपणे वृक्षतोड व उत्खनन केल्याने वनक्षेत्र, वन्यजीव व किल्ल्याला धोका निर्माण झाला.
  • धनदांडग्यांची मुजोरी ः किल्ल्यासह वनक्षेत्र, वन्यजीवांचे अस्तित्त्व धोक्‍यात

वडगाव मावळ (वार्ताहर) – मावळ तालुक्‍यातील विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी वनक्षेत्राच्या हद्दीत अनधिकृतपणे बेसुमार वृक्षतोड करून उत्खनन केले जात आहे. याशिवाय एका जागेत अनधिकृत बांधकाम केले जात असल्याने किल्ल्याबरोबरच वनक्षेत्र व वन्यजीवांचे अस्तित्व धोक्‍यात आले आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या वनक्षेत्रातील वृक्षतोड व उत्खनन बंद करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मावळ ऍडव्हेंचर्स टीम अनुशासन गड किल्ले सुरक्षा दल यांनी केली आहे.

सह्याद्रीच्या डोंगर रांगांतील निसर्गाच्या कुशीत वसलेला विसापूर किल्ला हा 1682 साली प्रकाशझोतात आला. मावळ तालुक्‍यातील इतिहासाची साक्ष देणारा विसापूर किल्ला 4 मार्च 1818 साली जनरल प्रॉथर याने सर्वप्रथम जिंकला होता. आजही किल्ल्याची तटबंदी मजबूत असली तरी या किल्ल्याच्या पायाथ्यालगतच असलेल्या घनदाट वनक्षेत्राच्या हद्दीत काही धनदांडग्यांची मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केले आहे. त्यात घनदाट वनक्षेत्रातील जांभूळ, हिरडा, भेहडा, करवंद, तोरण, मोह, आसन, सायर, आंबा आदी फळ व वनौषधी वृक्षांची तोड केली आहे. तर काही ठिकाणी वणवा लावून झाडे जाळली आहेत. या वनक्षेत्रात भेकर, सांबर, ससे, मोर, खवलेमांजर, कोल्हा, घोरपड, अजगर, माकड, वानर, रानडुक्कर, पिसोरा, तरस, पक्षी आदी वन्यजीवांचे वास्तव्याबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाला आहे.

वनक्षेत्रातील वृक्षतोड केल्याने वन्यजीवांचे अस्तित्व धोक्‍यात आले आहेत. वृक्षतोड केल्याने वन्यजीवांची अन्न शोधण्यासाठी भटकंती होत आहे. विहिरीच्या सुरुंगाच्या स्फोटाच्या आवाजाने वन्यजीव भयभीत होवून सैरावैरा धावत आहेत. हे जीव पुणे-मुंबई द्रूतगती मार्गावर आल्याने वाहनाच्या धडकेत त्यांचा मृत्यू होतो. तर अनेक वन्यजीव सुरुंगाच्या स्फोटामुळे घाबरून मृत्यू झाला आहे. या किल्ल्याच्या पायथ्याशी जागेचे सपाटीकरण करून त्या जागेत विहिर खोदलेली दिसून येत आहे. त्यासाठी सुरुंगाचे स्फोट घेण्यात आले आहेत. यामुळे वनक्षेत्राला तसेच किल्ल्याला धोका निर्माण झाला. तरी याकडे वन विभाग व पुरातत्व विभाग डोळेझाक करत असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.

वृक्षतोड, उत्खननामुळे पावसाळ्यात वनक्षेत्र व किल्ल्याचे मोठे नुकसान होण्याची भिती व्यक्‍त होत आहे.
1951 च्या कायद्यानुसार राष्ट्रीय संरक्षित स्मारक, गड, किल्ले, वन आदींच्या परिसरात बांधकाम, उत्खनन, सुरुंगाचे स्फोट करता येत नाहीत. तरी धनिकांनी राजरोसपणे बांधकाम, उत्खनन, वृक्षतोड होत आहे. सह्याद्रीच्या कुशीतील नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या विसापूर किल्ल्याला दृष्ट लागली आहे. वनक्षेत्राच्या हद्दीत लागणाऱ्या वनव्यांमुळे वृक्षांचे दिवसेंदिवस अतोनात नुकसान होत आहे. असे प्रकार थांबण्याऐवजी वाढतच चालले आहेत.
मावळ तालुक्‍यातील दुर्ग संवर्धन मित्र गड-किल्ल्याची दुरुस्ती करून वृक्षारोपण, संरक्षण व संवर्धनासाठी पुढाकार घेत असताना पुरातत्व व वन विभागाची उदासीनता दिसत आहे.

विद्रुपीकरण करणाऱ्यांवर कारवाई करा
विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या वनक्षेत्रातील वृक्षतोड व उत्खनन बंद करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मावळ ऍडव्हेंचर्स टीम अनुशासन गड किल्ले सुरक्षा दल विश्‍वनाथ जावलीकर, शिवप्रसाद सुतार, विनोद ढोरे, सागर ढोरे, समीर दंडेल, राम ढोरे आदींनी केली आहे.

विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या वनक्षेत्राच्या हद्दीत वृक्षतोड व उत्खनन करून वनक्षेत्र व वन्यजीवांना तसेच किल्ल्याला धोका निर्माण करणाऱ्यांवर महाराष्ट्र वन अधिनियमानुसार घटनास्थळ पंचनामा करून कडक कारवाई करण्यात येईल.
– सोमनाथ ताकवले, वनपरिक्षेत्र अधिकारी, मावळ.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)