किमान रक्‍कम नसलेल्यांकडून दंड 

वसूल केलेल्या दंडाची रक्‍कम 5 हजार कोटींपर्यंत वाढली 

नवी दिल्ली: सार्वजनिक क्षेत्रातील 21 बॅंका आणि खासगी क्षेत्रातील तीन प्रमुख बॅंकांनी मागील आर्थिक वर्षात 2017-18 मध्ये खात्यात किमान रक्‍कम न ठेवणाऱ्या खातेदारांकडून 5000 कोटी रुपयांची वसुली केली आहे. बॅंकिंग आकडेवारीतून ही बाब समोर आली आहे.

खातेदारांकडून दंड वसूल करण्यात भारतीय स्टेट बॅंक अग्रस्थानी आहे. या बॅंकेने 2,433 कोटी रुपये वसूल केले आहेत. 24 बॅंकांनी एकूण 4,989 कोटी रुपये दंड वसूल केला आहे. उल्लेखनीय म्हणजे, एसबीआयला मागील आर्थिक वर्षात 6,547 कोटी रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे. जर बॅंकेला हे अतिरिक्त उत्पन्न मिळाले नसते, तर बॅंकेचा तोटा अधिक झाला असता.

एचडीएफसी बॅंकेने खातेदारांकडून 590 कोटी रुपये, ऍक्‍सिस बॅंकेने 530 कोटी रुपये आणि आयसीआयसीआय बॅंकेने 317 कोटी रुपये वसूल केले आहेत. एसबीआयने 2012 पर्यंत खात्यात किमान रक्कम न ठेवल्याबद्दल दंड वसूल केला होता. त्यानंतर, ही व्यवस्था 1 ऑक्‍टोबर 2017 पासून पुन्हा सुरू केली. भारतीय रिझर्व्ह बॅंकेच्या नियमानुसार बॅंकांना विविध शुल्क वसूल करण्याचा अधिकार आहे.

बॅंकांचे कर्ज 20 जुलै रोजी संपलेल्या पंधरवड्यात 12.44 टक्‍क्‍यांनी वाढून 86,13,164 कोटी रुपयांवर पोहोचले आहेत. एक वर्षांपूर्वी याच काळात बॅंकांचे कर्ज 76,59,898 कोटी रुपये होते. 6 जुलै रोजी समाप्त पंधरवड्याच्या तुलनेत बॅंकांच्या कर्जाची वाढ किरकोळ होती. कर्ज 12.78 टक्के वाढून 86,60,069 कोटी रुपये होते. याच काळात बॅंकांतील जमा रक्कम 8.15 टक्‍क्‍यांनी वाढून 1,14,38,121 कोटींवर पोहोचल्या. एका वर्षांपूर्वी या ठेवी 1,05,75,615 कोटी रुपये होत्या.

6 जुलै रोजी संपलेल्या पंधरवड्यात बॅंकांच्या ठेवी 8.33 टक्‍क्‍यांनी वाढून 1,14,85,768 कोटी रुपये होत्या. जूनमध्ये कृषी आणि त्यासंबंधीच्या कामासाठीचे कर्ज कमी होऊन 6.5 टक्के झाले. ते जून 2017 मध्ये 7.5 टक्के होते. जूनमध्ये वैयक्तिक कर्जात 19.9 टक्क्‌यांची वाढ झाली आहे. एक वर्षांपूर्वी याच काळात हा दर 14.1 टक्के होता. उद्योगांचे कर्ज 0.9 टक्‍के वाढले असल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)