किदम्बी श्रीकांतचे आव्हान  उपान्त्यपूर्व फेरीत संपुष्टात 

जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धा 
टोकियो- अव्वल पुरुष खेळाडू किदम्बी श्रीकांतला तीन गेमच्या कडव्या झुंजीनंतर पराभव पत्करावा लागल्यामुळे जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील त्याचे आव्हान संपुष्टात आले. किदम्बी श्रीकांतला पुरुष एकेरीच्या उपान्त्यपूर्व फेरीत दक्षिण कोरियाच्या ली डॉंग केउनविरुद्ध पहिली गेम जिंकल्यानंतर 21-19, 16-21, 18-21 असा पराभव पत्करावा लागला. पुरुष व मिश्र दुहेरीतही भारतीय जोड्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

श्रीकांतच्या या पराभवाबरोबर स्पर्धेतील भारतीय खेळाडूंचे आव्हानही संपुष्टात आले आहे. किदम्बीने तिसऱ्या गेममध्ये पुनरागमनासाठी कसून प्रयत्न केले, परंतु त्याला अखेर अपयश आले. ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या पी.व्ही. सिंधू आणि एच एस प्रणॉय यांच्या पराभवानंतर भारताचे आव्हान टिकवण्याची जबाबदारी श्रीकांतवर होती. त्याने पुरुष एकेरीच्या उपान्त्यपूर्व फेरीच्या सामन्यात जबरदस्त स्मॅश आणि परतीच्या फटक्‍यांचा खेळ करताना पहिली गेम 21-19 अशी जिंकताना आश्‍वासक सुरुवात केली.

मात्र दुसऱ्या गेममध्ये श्रीकांतला केउनकडून 16-21 अश्‍या फरकाने पराभव पत्करावा लागला. या वेळी एका क्षणी सूर गमावल्यामुळे श्रीकांतने केऊनला सलग सात गुण जिंकण्याची संधी दिली. त्यामुळे श्रीकांत 5-12 असा पिछाडीवर पडला. त्यानंतर या गेममध्ये पुनरागमन करणे त्याला शक्‍य झाले नाही. 1-1 अशा बरोबरीनंतर तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये दोन्ही खेळाडूंनी चुरशीचा खेळ केला. किदम्बीने कोरियन खेळाडूला मॅच पॉईंट घेण्यापासून रोखले, परंतु त्याचे प्रयत्न तोकडे पडले. केउनने 12-9 अशी आघाडी घेत तिसरी गेम 21-18 अशी जिंकत उपान्त्य फेरीत प्रवेश केला.

तत्पूर्वी, महिला एकेरीतील उपउपान्त्यपूर्व फेरीत पी. व्ही. सिंधूला चीनच्या फॅंगजी गाओविरुद्ध 18-21, 19-21 असा सरळ सेटमध्ये आणि केवळ 55 मिनिटांमध्ये पराभव पत्करावा लागला. तसेच पुरुष एकेरीत एच.एस. प्रणॉयला इंडोनेशियाच्या अँथनी सिनिसुकाविरुद्ध पराभव पत्करावा लागला. मनू अत्री व सुमीत रेड्डी या भारतीय जोडीने दुसऱ्या फेरीत ऑलिम्पिक रौप्यविजेत्या जौडीवर मात करीत सनसनाटी निकालाची नोंद केली होती. परंतु उपउपान्त्यपूर्व फेरीत त्यांना हे जिटिंग व हे क्‍वियांग या चिनी जोडीविरुद्ध 18-21, 21-16, 12-21 असा संघर्षपूर्ण लढतीनंतर पराभव पत्करावा लागला.

मिश्र दुहेरीत प्रणव चोप्रा व सिक्‍की रेड्डी या भारतीय जोडीचे आव्हान उपउपान्त्यपूर्व फेरीत संपुष्टात आले. चॅंग पेन सून व गोह लियू यिंग या मलेशियाच्या जोडीने भारतीय जोडीचा प्रतिकार 21-16, 21-16 असा 40 मिनिटांत मोडून काढत उपान्त्यपूर्व फेरी गाठली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)