किती सुरक्षित आहे तुमचे घर (भाग-१)

अनेकजण आयुष्यभराची कमाई खर्च करून घर बांधतात किंवा विकत घेतात. त्यामुळेच घराची खरेदी करण्यासंबंधीचा अंतिम निर्णय घेण्यापूर्वी सखोल विचार करावा लागतो. कागदपत्रे आणि अन्य सर्व बाबींची पडताळणी करण्याबरोबरच संबंधित घर संरचनात्मक दृष्टीने मजबूत आहे की नाही, याचा विचार केला पाहिजे. घराच्या टिकाऊपणासंबंधी खात्री झाल्यानंतरच व्यवहार करावा.

आयुष्यभराची कमाई खर्ची घालून जर तुम्ही तुमच्या स्वप्नातील घर खरेदी करीत असाल तर अंतिम निर्णय घेण्यापूर्वी सर्व संबंधित बाबींवर पुन्हा एकवार नजर टाका. नव्याने उभारलेल्या इमारती दिसताक्षणी सुंदर दिसतातच; शिवाय त्या टिकाऊ आणि मजबूतही वाटतात. परंतु जे घर आपण खरेदी करीत आहोत, ते ज्या इमारतीत आहे, ती संरचनात्मकदृष्ट्या मजबूत आहे की नाही, याची खरीखुरी माहिती मिळाल्यानंतरच घरखरेदीचे खरे समाधान तुम्हाला मिळू शकते. ज्या इमारतीत फ्लॅट घ्यायचा आहे, ती बांधताना संबंधित विकसकाने सर्व नियमांचे आणि सुरक्षेच्या निकषांचे पालन केले आहे की नाही, हे पाहिल्यास घराचा टिकाऊपणा तुम्हाला कळू शकेल. पै-पै जमवून आपण घर खरेदी करीत असतो. जमविलेली सर्व रक्कम घराच्या खरेदीत एकरकमी खर्च होते. त्यामुळे त्या मोबदल्यात हाती येणाऱ्या घराच्या बळकटीसंबंधी आपण चोखंदळ राहायलाच हवे.

रिअल इस्टेट क्षेत्रातील जाणकार सांगतात की, कोणत्याही घराची वा इमारतीची संरचनात्मक बळकटी ओळखणे हे अवघड काम असते. परंतु तरीही काही टिप्स या बाबतीत देता येतात. या टिप्सच्या साह्याने आपण घराच्या मजबुतीचा जास्तीत जास्त अचूक अंदाज घेऊ शकतो. हा अंदाज एकदा आला आणि खात्री पटली तरच अशा घराच्या खरेदीसाठी गुंतवणूक करावी. कोणत्याही इमारतीच्या उभारणीत मजबुतीची काळजी घेतली आहे की नाही, याचा अंदाज त्या इमारतीचे आर्किटेक्‍चरल डिझाइन, बाह्य आणि अंतर्गत डिझाइन यांची गुणवत्ता, वीजजोडणीसाठी वापरलेली उपकरणे तसेच बाथरूम फिक्‍सचर्सचा दर्जा, ब्रॅंड्‌स तसेच खिडक्‍यांच्या गुणवत्तेवरून बांधता येतो. हा दर्जा ओळखण्यासाठी विभिन्न निकषांचा आधार घ्यावा लागतो.

-Ads-

प्रत्येक विकसकाने बांधलेल्या इमारतींचा दर्जा वेगवेगळा असतो. त्यामुळे बांधकामाच्या दर्जाचा अंदाज बांधण्यासाठी काही निकष वापरता येतात. संभाव्य खरेदीदाराने गुंतवणूक करण्यापूर्वी संबंधित इमारतीचे दोन भागांत वर्गीकरण सुरुवातीला करावे. एक म्हणजे संरचनात्मक ढांचा आणि भिंती. इमारतीचा पाया मजबूत आहे की नाही, हे पाहण्यासाठी मात्र निष्णात इंजिनिअरचीच मदत घ्यावी लागते. जाणकारांच्या म्हणण्यानुसार, इमारतीचे डिझाइन असे असायला हवे, जेणेकरून इमारतीचा भार सर्व बाजूंना समप्रमाणात विभाजित होईल. स्ट्रक्‍चरल इंजिनिअरने या सर्व पैलूंची बांधकाम सुरू असताना तपासणी केलेली असणे आवश्‍यक आहे. मातीचा टणकपणा, सिमेंट आणि वाळूच्या योग्य प्रमाणात केलेल्या मिश्रणाचा वापर, कॉंक्रिटची तपासणी, पाणी वाहून जाण्यासाठी केलेल्या उपाययोजना याबरोबरच इमारतीची भूकंपरोधक शक्ती या बाबी तपासणे गरजेचे असते.

किती सुरक्षित आहे तुमचे घर (भाग-२)

इंजिनिअरच्या साह्याने अशा प्रकारची तपासणी केल्यास तो संपूर्ण इमारतीची पाहणी करून आपल्याला अहवाल देतो आणि त्यामुळे आपल्याला इमारतीच्या मजबुतीबाबत निर्धास्त राहता येते. एखाद्या विकसकाला आपला ब्रॅंड प्रस्थापित करण्याची इच्छा असते, तेव्हा तो प्रत्येक बारीकसारीक बाबींवर स्वतः देखरेख करतो आणि केवळ ठेकेदारावर अवलंबून राहात नाही. गुणवत्ता नियंत्रणाची व्यवस्था तो स्वतंत्रपणे विकसित करतो. गुंतवणूक वाढेल या धास्तीने तो गुणवत्तेत कोणतीही तडजोड करीत नाही. त्याच्या इमारतींच्या गुणवत्तेमुळेच एक चांगला विकसक म्हणून त्याला बाजारपेठेत प्रतिष्ठा प्राप्त होत असते. भविष्यातील योजनांमध्ये त्याला या प्रतिष्ठेचा लाभ मिळत असतो आणि विशेष प्रयत्न न करता मोठा ग्राहकवर्गही त्याला बांधकामातील गुणवत्तेमुळेच लाभत असतो.

– अंकिता कुलकर्णी

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)