किंमत जाहीर करा अन्‌ विषय संपवा (अग्रलेख)

राफेल विमाने खरेदी करण्याची प्रक्रिया नेमकी कशा पद्धतीने पार पडली आणि त्या विमानांच्या खरेदीचा निर्णय तातडीने का घ्यावा लागला वगैरे तपशील काल सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केला. राफेलविषयी सध्या जो प्रचलित वाद आहे, त्या वादाविषयी या तपशिलातून काहीच उलगडा होताना दिसला नाही. या विमान खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत आहे आणि लोकांपुढे भलताच तपशील सादर होताना दिसत आहे. मोदी सरकारने प्रत्येकी किती रुपयांमध्ये हे विमान खरेदी केले हा प्रश्‍न सोडून बाकी सारा तपशील सादर होताना दिसत आहे. पण किंमत मात्र काही केल्या जाहीर होताना दिसत नाही. किंमत जाहीर केली की बाकीचा सारा घोळ एका मिनिटात संपुष्टात येईल आणि कोण खरे आणि कोण खोटे यासाठी वेगळी शहानिशा करण्याची गरज उरत नाही.

अगदी सुरुवातीच्या काळात सरकारने संसदेत राफेलच्या किमती जाहीर केल्या होत्या, पण त्यातही तफावत होती. एका मंत्र्याने या विमानाची किंमत 640 कोटी रुपये असल्याचे सांगितले होते आणि दुसऱ्या मंत्र्याने काही दिवसांच्या अवधीनंतर ही किंमत 1400 कोटी रुपये असल्याचे सांगितले होते. त्यानंतर मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव विमानांच्या किमती जाहीर केल्या जाऊ शकत नाही अशी भूमिका घेत मोदी सरकारने या किमती दडवण्यासाठी सतत आटापिटा केला. या वादाला वेगवेगळे फाटे फोडण्याचा प्रयत्न गेल्या काही दिवसांत सातत्याने झाला. मधेच राफेल विमाने किती गुणवत्तापूर्ण आहेत हे लोकांपुढे ठसवण्याचा आटापिटा झाला. त्यासाठी संरक्षण दलातील आजी-माजी अधिकाऱ्यांचा वापर करून त्यांच्या तोंडून राफेलच्या गुणवत्तेचे कौतुक वर्णिले गेले. पण हे सारे होत असताना लोकांचा मूळ प्रश्‍न कायम राहिला, राफेलची किंमत किती? हा प्रश्‍न तरीही अनुत्तरीतच राहिला.

प्रश्‍न किमतीविषयी होता आणि चर्चा गुणवत्तेविषयी केली गेली. या आटापिट्यामुळे लोकांचे शंकानिरसन होण्याऐवजी शंका अधिकच गडद होत जाताना दिसली. या साऱ्या घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर राफेल विमाने तयार करणाऱ्या दसॉल्ट कंपनीचे सीईओ इरिक ट्रॅपियर यांचीही मुलाखत एएनआय या भारतीय वृत्तसंस्थेने घेतली आहे. त्यात त्यांनी ही विमाने नऊ टक्‍के स्वस्तच दिली गेली आहेत असे नमूद केले आहे. आणि ज्या अनिल अंबानींच्या नावाने वादंग उठवले जात आहे त्यांची निवड आम्हीच आमच्या जबाबदारीवर केली आहे असेही त्यांनी या मुलाखतीत म्हटले आहे.

या बाबी त्यांनी अगदी शपथपूर्वक सांगितल्या आहेत. त्यातून ऐन निवडणुकीच्या काळात मोदी सरकारला क्‍लीन चीट देण्याचे काम या मुलाखतीने झाले आहे असे वातावरण निर्माण केले जाईल. पण दसॉल्ट कंपनीच्या सीईओकडूनही किमतीच्या मुद्द्याचा उलगडा होताना दिसत नाही. भारताला ही विमाने नऊ टक्‍के स्वस्त दराने दिली गेली आहेत असे जर त्यांचे जाहीर म्हणणे असेल तर त्यांना या किमती जाहीर करण्यात काय अडचण आहे हेही समजले पाहिजे. फिरून फिरून सारा विषय राफेलची किंमत किती याच एका प्रश्‍नाभोवती केंद्रित होत असल्याने किंमत जाहीर झाल्याशिवाय या प्रकरणाचा खरा उलगडा होणार नाही. राफेल विमानांच्या खरेदीचा वाद सुरू असताना आपल्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोणतीही अधिकृत घोषणा न करता मध्यंतरी फ्रान्सचा दौरा केला. या गुपचूप झालेल्या दौऱ्याचा उद्देश नेमका काय होता आणि त्यांनी राफेल निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या मुख्यालयाला भेट देऊन तेथे नेमकी काय चर्चा केली याचाही खुलासा व्हायला हवा आहे.

भारताचा संरक्षणमंत्री एखाद्या मोठ्या देशात कोणालाच न सांगता जातो असे यापूर्वी घडले नव्हते. त्यामुळे विरोधकांच्या, हातात आणखी एक कोलीत दिले गेले आहे. राफेल खरेदी प्रकरणात विरोधकांकडून होणारे आरोप आणि सरकारकडून केले जाणारे दावे हे एकमेकांशी कधीच जुळलेले दिसले नाही. विरोधक एक मुद्दा उपस्थित करतात आणि सरकार भलतेच उत्तर देते असे सातत्याने होताना दिसते आहे. मुळात राफेल खरेदी ही गुप्तता करारांतर्गत करण्यात आली आहे हे खरे आहे की नाही याविषयीच संभ्रम आहे. फ्रान्सच्या माजी अध्यक्षानेही राफेलविषयी काही धक्‍कादायक विधाने केली होती. या किमती भारताने जाहीर केल्या तर त्याला मज्जाव नाही असे त्यांनी म्हटले आहे. म्हणजे या किमती जाहीर करण्यात फ्रान्सला काही अडचण नसेल तर मोदी सरकारला ती अडचण का यावी? हाही प्रश्‍न आहेच.

दसॉल्ट कंपनीकडून ही विमाने घेणारा भारत हा काही एकमेव देश नाही. जगातील अन्य देशही त्यांच्याकडून ही विमाने खरेदी करतात आणि त्या देशाच्या ताळेबंदात या विमानांच्या किमती जाहीर केल्या जातात. त्यांना या किमती जाहीर करण्यात काही अडचण येत नसेल तर ती भारताला का यावी? या प्रश्‍नात या प्रकरणाचे सारे इंगित दडले आहे. राहुल गांधी यांना साफ उघडे पाडायचे असेल आणि त्यांचे तोंड कायमचे गप्प करायचे असेल तर राफेलची किंमत आता मोदी सरकारने स्वत:हून जाहीर करणे हाच एकमेव मार्ग आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)