पुणे – काहीही करा, काम सुरू करू देणार नाही!

भामा-आसखेड प्रकल्पग्रस्त मागण्यांवर ठाम

पुणे – “आम्हाला शासनाकडून मिळणारा भूसंपादानाचा निधी नको.. आता आम्हाला जमिनीच्या बदल्यात जमीनच हवी आहे. अन्यथा कोणत्याही स्थितीत भामा-आसखेड प्रकल्पाचे काम सुरू करू दिले जाणार नाही,’ अशी ठाम भूमिका प्रकल्पग्रस्तांनी जिल्हा प्रशासन तसेच महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमोर मंगळवारी घेतली. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून बंद असलेल्या या प्रकल्पाच्या कामाचा तिढा आणखी वाढला आहे.

भामा-आसखेड प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळावा, या मागणीसाठी महापालिकेचे अधिकारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्‍त कार्यालयात तळ ठोकून आहेत. “बंदोबस्त मिळला तरच काम सुरू करणे शक्‍य आहे,’ असे पालिका प्रशासनाने म्हटले आहे.

भामा-आसखेड प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी महापालिकेने जिल्हा प्रशासन, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांसह ग्रामस्थांनाही साकडे घातले होते. मात्र, कोणाकडूनही प्रतिसाद मिळत नसल्याने विभागीय आयुक्तांनी बैठक घेण्याची विनंती महापालिकेने केली होती. पूर्व पुण्यासाठी भामा-आसखेड धरणातून बंद जलवाहिनीद्वारे पाणी आणण्यासाठी काम सुरू आहे. त्यात वाकी तर्फे वाडा या गावात जॅकवेल बांधण्याचे काम सुरू आहे. यापूर्वी प्रकल्पाग्रस्तांनी हे काम अडविल्याने ते बंद होते. त्याचा परिणाम प्रकल्पाच्या खर्चावर पडत असल्याने तत्कालिन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी या प्रकल्पग्रस्तांची बैठक घेतली. त्यावेळी 1,700 मिमी व्यासाच्या जलवाहिनी तसेच जॅकवेलचे काम सुरू करण्यास प्रकल्पग्रस्तांनी मान्यता दिली होती. त्यानंतर पुन्हा दि. 22 मार्च ते 21 एप्रिलदरम्यान या जॅकवेलचे काम आंदोलकांनी बंद पाडले होते. त्यावर काम बंद पाडल्यास आंदोलकांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याने हे काम सुरू करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर आता मागील महिनाभरापासून काम बंद आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी विभागीय आयुक्तांनी बुधवारी पुन्हा बैठक घेतली.

पिंपरी पोलीस आयुक्तालयात तळ
ग्रामस्थांनी काम सुरूच करू न देण्याची भूमिका घेतल्याने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून तातडीने बंदोबस्त मिळण्याची मागणी महापालिका अतिरिक्त आयुक्तांनी पत्राद्वारे केली आहे. त्यानुसार, हे पत्र घेऊन पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी बुधवारी दिवसभर पिंपरी-चिंचवडमध्ये होते. त्यामुळे आता ग्रामस्थांच्या भूमिकेने प्रकल्प खर्च वाढतच असल्याने महापालिकेनेही पोलीस बळाचा वापर करून प्रकल्पाचे काम मार्गी लावण्याचा निर्णय घेतल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)