कासुर्डी हत्याकांडातील तिघे जेरबंद

यवत-दौंड तालुक्‍यातील कासुर्डी गावच्या हद्दीत पुणे-सोलापूर महामार्गावरील टोलनाक्‍याजवळ बांधकाम सुरू असलेल्या जगदाळे अपार्टमेंटमध्ये आरोपींनी बुधवारी (दि. 25) रात्रीच्या सुमारास गणेश झुंबर टेमगिरे (वय 19, रा. भरतगाव, ता. दौड) या युवकाच्या डोक्‍यावर लोखंडी रॉड, लाकडी दांडक्‍याने मारहाण करीत डोक्‍यात दगड घालून निर्घृणपणे हत्या केली होती. या घटनेनंतर आरोपी फरारी झाले होते. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. यवत पोलिसांच्या पथकाने 72 तासांच्या आत रविवारी (दि. 29) पहाटे (हडपसर, गाडीतळ, पुणे) येथून तिघांना जेरबंद करीत अटक केली आहे.
याप्रकरणी दत्तात्रय बाबा ठोंबरे (वय 19, रा. कासुर्डी फाटा, ता. दौंड), आकाश तुळशीराम धनवे (वय 21, रा. खामगाव फाटा, ता. दौंड, मूळ रा. गोमळवाडा, ता. कासार शिरोळ, जि. बीड), विक्रम उर्फ बाबू आनंदा सुळसकर (वय 27, रा. भोंडवे वस्ती, कासुर्डी, ता. दौंड, मूळ रा. देवकर मावडी, ता. पुरंदर) असे जेरबंद केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मृत गणेश टेमगिरे याची आरोपीच्या बहिणीवर वाईट नजर होती. त्या कारणास्तव मृत गणेश याने यापूर्वी आरोपीला मारहाण केली होती. तसेच घटनेच्या दिवसीही मृत गणेश हा आरोपीच्या बहिणीबद्दल वाईट बोलू लागल्याचा राग आल्याने गणेश टेमगिरे यास लोखंडी रॉड, लाकडी दांडके व दगड डोक्‍यात घालून निर्घृण खून केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.
संतप्त ग्रामस्थांनी फरारी आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली होती. यवत पोलीस ठाण्याचे निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विलास नाळे, पोलीस नाईक दीपक पालखे, संदीप कदम, गणेश पोटे, रणजित निकम, दशरथ बनसोडे, संपत खबाले या पोलीस पथकाने फरारी आरोपींच्या मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचून तिघा आरोपींना हडपसर, गाडीतळ, पुणे परिसरातून ताब्यात घेत जेरबंद केले. यापूर्वीच आदिनाथ विनायक जगदाळे (वय 28, रा. भरतगाव, ता. दौंड) यांनी फिर्याद दाखल केली आहे. यवत पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)