कासुर्डी टोलनाक्‍यादरम्यान 1 लाख 12 हजारांचे दागिने लंपास

लोणी काळभोर- माहेरी गेलेली महिला एसटीने सासरी परतत असताना पुणे सोलापूर महामार्गावरील पाटस ते कासुर्डी (यवत) टोलनाका दरम्यान अज्ञात चोरट्यांनी तिच्या पिशवीतून 1 लाख 12 हजार रुपये किमतीचे 5 तोळे 6 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना आज (दि. 30) दुपारी साडेतीनच्या सुमारास उघडकीस आली.
या प्रकरणी सीमा नारायण पागळे (वय 34, रा. मोरे वस्ती, दत्त हौसिंग सोसायटी, चिखली, ता. हवेली) यांनी फिर्याद दिली आहे. सीमा पागळे या भाजी विक्रीचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करतात. 27 एप्रिल रोजी त्या आपल्या माहेरी (राशिन, ता. कर्जत) येथे गेल्या होत्या. आज (दि. 30) दुपारी पावणेदोनच्या सुमारास आपल्या दोन मुलांसह घरी येण्यासाठी करमाळा ते मुंबई एसटी (क्र. एमएच 14 बीटी 3248) मध्ये बसल्या. त्यावेळी सोबत आणलेली कपड्यांची पिशवी त्यांनी आपल्या पायाजवळ ठेवली होती. त्यामध्ये सोन्याचे दागिन्यांचा बॉक्‍स होता. दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास एसटी पाटस (ता. दौंड) स्थानकावर थांबली त्यावेळी पाच ते सहा अनोळखी महिला बसमध्ये चढल्या आणि त्या पागळे यांचे आसनाशेजारील मोकळ्या जागेत खाली बसल्या. त्यानंतर त्या सर्व महिला वरवंड बसस्थानकावर उतरल्या.
दुपारी साडेतीनच्या सुमारास एसटी बस कासुर्डी टोलनाका येथे आली त्यावेळी पागळे यांना आपल्या पिशवीची चेन अर्धवट उघडी दिसली. संशय आल्याने त्यांनी पिशवीची पाहणी केली असता त्यांना आत बॉक्‍समध्ये ठेवलेले 1 लाख रुपये किमतीचे 5 तोळे वजनाचे गंठण, 4 हजार रुपये किमतीचे 2 ग्रॅम वजनाची अंगठी व 8 हजार रुपये किमतीचे 4 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र असे एकूण 1 लाख 12 हजार रुपये किमतीचे चोरीला गेल्याचे लक्षात आले. ही बाब त्यांनी बस वाहक व चालक यांना सांगितली. त्यानंतर चालकाने बस लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आणली. तेथे पागळे यांनी यांनी अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दाखल केली

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)