कासारपाटील मंडळाचा “असामान्य लोकमान्य’ देखावा

पिरंगुट-कासारआंबोली (ता. मुळशी) येथील श्रीमंत कासारपाटील मित्र मंडळ ट्रस्टने यावर्षी जिवंत देखावा सादर केला आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त मंडळाने यावर्षी लोकमान्य महोत्सवाचे आयोजन केले आहे. यानिमित्त मंडळाच्या वतीने लोकमान्य टिळकांवर आधारित असामान्य लोकमान्य यावर आधारित जिवंत देखावा सादर केला आहे. मंडळाचे कार्यकर्ते या देखाव्यात सहभागी झालेले आहेत. या नाट्याचे लेखन व दिग्दर्शन मानकरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक युवराज ओव्हाळ यांनी केले आहे. सहायक दिग्दर्शक म्हणून आकाश डोंगरे यांनी मदत केली आहे. नाटकातील लोकमान्यांची प्रमुख भूमिका मंडळाचे सचिव योगेश मरळ यांनी साकारली आहे. सागर कांबळे, तुकाराम भोसले, प्रकाश मरळ आदींनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. मंडळाने सादर केलेला हा जिवंत देखावा प्रेक्षकाचे आकर्षण ठरत असून देखावा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. या जिवंत देखाव्याचा प्रारंभ जिल्हा परिषद सदस्या अंजली कांबळे, माजी सरपंच राजेंद्र मारणे, माऊली कांबळे, विजय मारणे, हिरामण भिलारे आदींच्या उपस्थित झाला. मंडळाचे अध्यक्ष ज्ञानोबा मळेकर, उपाध्यक्ष बापूराव पाटील, कार्याध्यक्ष राहुल पाटील आदींनी संयोजन केले आहे. मंडळाने यावर्षी इकोफ्रेंडली गणेशोत्सव साजरा केला असून मातीची मूर्ती बसवली आहे. तसेच वेशभूषा स्पर्धा, निबंध स्पर्धा, व्याख्यानमाला आदी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)