काश्‍मीरात पुर्वीही दगडफेक होत होती

काश्‍मीर स्थितीबाबत अमित शहांचे प्रतिपादन
चंदीगड – काश्‍मीरात सध्या सुरक्षा दलांवर तुफान दगडफेक केली जात आहे. पण ही स्थिती काहीं नवीन नाही. यापुर्वीही काश्‍मीरात दगडफेक होतच होती असे मासलेवाईक उत्तर भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी आज येथे पत्रकार परिषदेत काश्‍मीर विषयी विचारण्यात आलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना दिले. काश्‍मीरातील स्थितीवर नियंत्रण आणण्यास राज्यातील आणि केद्रातील भाजप प्रणित सरकारला अपयश आल्याची टीका कॉंग्रेस कडून केली जात आहे त्यावर बोलताना ते म्हणाले की काश्‍मीरातील सध्याच्या स्थितीला कॉंग्रेस पक्षच जबाबदार आहे.
काश्‍मीरात आता शालेय विद्यार्थिही सुरक्षा दलांवर दगफेक करू लागले आहेत त्या विषयी विचारले असता ते म्हणाले की सन 1989 पासून अनेक वेळा काश्‍मीरात अशी स्थिती उद्‌भवली आहे. तेथील गनिमी समस्याही जुनी आहे ती आजच उद्‌भवली आहे असे नव्हे असे त्यांनी नमूद केले. जेव्हा सुरक्षा दलांकडून कडक भुमिका घेतली जाते त्यावेळी अशी स्थिती उद्‌भवते असे नमूद करून ते म्हणाले की काश्‍मीरातील स्थिती लवकरच नियंत्रणात येईल. यावेळी अमित शहा यांनी मोदी सरकारच्या तीन वर्षांच्या कारभाराचे कौतुक केले. ते म्हणाले की मोदींनी नोटबंदीचा निर्णय घेऊन काळ्या पैशाच्या निर्मीतीला प्रभावी आळा घातला असून त्यामुळे आता अर्थव्यवस्था वेगाने विकसित होईल असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. अमित शहा सध्या 110 दिवसांच्या देशव्यापी दौऱ्यावर आहेत. जम्मू काश्‍मीरपासून त्यांचा हा दौरा सुरू झाला आहे.
पंजाबातील अकाली दल भाजप युतीच्या विधानसभेतील पराभवाविषयी बोलताना ते म्हणाले की या पराभवाचेआम्ही आत्मचिंतन करीत आहोत. पंजाबात आमच्याकडे धाकट्या भावाची भूमिका होती पण तरीही आम्ही आमच्या पातळीवर या पराभवाचे विश्‍लेषण करीत आहोत. भाजप अकालीदल यांच्यातील युती कायम राहील असेही त्यांनी एका प्रश्‍नाच्या उत्तरात सांगितले. पंजाबातील आम आदमी पक्षाच्या एकाही आमदाराशी भाजपने संपर्क केलेला नाही असेही त्यांनी यावेळी नमूद केले. कोणी व्यक्तीगत पातळीवर असा संपर्क केला असेल तर त्याची आपल्याला कल्पना नाही असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)