काश्‍मीरातील बंदमुळे जनजीवन विस्कळीत

श्रीनगर – घटनेतील कलम 35 ए मध्ये फेरबदल करून जम्मू काश्‍मीरच्या विशेष दर्जात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करून काश्‍मीरातील विघटनवादी संघटनांनी आज तेथे बंद पुकारला होता. या बंदमुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे.

घटनेच्या कलम 35 ए मध्ये जम्मू काश्‍मीरातील निवासी लोकांविषयीची व्याख्या करण्यात आली असून तेथे बाहेरील व्यक्तींना स्थलांतरीत होण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यात बदल करून या राज्याची डेमोग्राफी बदलण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करीत विघटनवादी संघटनांनी हा बंद पुकारला आहे. या बंदला आज मोठा प्रतिसाद मिळाला खोऱ्यातील बहुतांशी व्यवहार आणि दुकाने तसेच हॉटेल व शिक्षण संस्थां पुर्णपणे बंद होत्या. सरकारी परिवहन व्यवस्थाही बंद होती. त्यामुळे लोकांचे मोठे हाल झाले. टॅक्‍सी आणि अन्य प्रवासी वाहनेही आज रस्त्यावर दिसली नाहीत.

पोलिसांनी श्रीनगरच्या काही पोलिस ठाण्यांच्या हद्दीत आज जमावबंदी व अन्य निर्बंध लागू केले होते. जम्मू काश्‍मीर हे मुस्लिम बहुल राज्य आहे तेथे अन्य धर्मियांची लोकसंख्या वाढवण्याचा कट रचला जात आहे असा आरोप हुर्रियत परिषदेच्या नेत्यांनी केला आहे. एका स्वयंसेवी संस्थेने सर्वोच्च न्यायालयात घटनेतील कलम 35 ए च्या विरोधात आव्हान याचिका दाखल केली आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने सरकारकडे नोटीस पाठवून त्यांना त्यांची भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले आहे. त्यावरून हा सारा मामला सुरू झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)