“काव्य मैफिली’ने जिंकली विद्यार्थ्यांची मने

साहित्यिकांच्या उपस्थितीत युवा स्पंदन साहित्य संमेलन उत्साहात

लोणंद – पाडेगांव, ता. खंडाळा येथे कै. आनंदा सूर्यवंशी चॅरिटेबल ट्रस्ट पुणे, मांगल्य शिक्षण प्रसारक संस्था पुणे व माणगंगा साहित्य परिषद पांगरी यांच्या संयुक्त विद्यमाने कै.आनंदा सूर्यवंशी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित करण्यात आलेले युवा स्पंदन साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी साहित्यावर प्रेम करणारे साहित्य क्षेत्रातील साहित्यिक, कथाकथनकार, लेखक, कवी, कवयित्री आदिनी हजेरी लावली होती. तसेच उपस्थित शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांना साहित्याचा मनमुराद आनंद लुटता आला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कार्यक्रमाचे उद्‌घाटन संमेलनाध्यक्ष अविनाश चव्हाण, स्वागताध्यक्ष पवन सूर्यवंशी, संयोजक ताराचंद्र आवळे, उद्‌घाटक डॉ. जयवंत अवघडे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी चैत्राली सूर्यवंशी, नगरसेवक हनुमंत शेळके, माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मण तात्या शेळके, नगरसेवक योगेश क्षीरसागर, उपनगराध्यक्ष किरण पवार, पाडेगावचे सरपंच हरिश्‍चंद्र माने, उपसरपंच विजयराव धायगुडे, केंद्रप्रमुख डी. बी. धायगुडे, गजेंद्र मुसळे हे आदी मान्यवर उपस्थित होते.

आई समजून घेताना याविषयी प्रा. नितिन नाळे यानी तर कवी हणमंत चांदगुडे यांनी अशी असते कविता यावर परिसंवाद घडवून आणला. युवा साहित्यिक आकाश आढाव आणि बाल कवी सुयश आवळे, विजय भापकर यानी ही आपली परखड मनोगते व्यक्त केली. जनार्दन गार्डे यांचे कथाकथन ही झाले. सुप्रसिद्घ कथा कथनकार रविंद्र कोकरे यांनी मार्गदर्शन केले तर पत्रकार नीलेश सोनवलकर यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये श्रीमती विमल सुर्यवंशी यांनी दिलखुलासपणे शाळा जडणघडण विषयीच्या विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे दिली.

दुपारच्या सत्रात साहित्य व संस्कृती मंडळाचे नवनिर्वाचित सदस्य जगन्नाथ शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. पश्‍चिम महाराष्ट्रातून आलेल्या 41 कवींचे कविसंमेलन अशोकराज दीक्षित यांच्या अध्यक्षतेखाली पाडेगावमध्ये प्रथमच ऐतिहासिक असेच पार पडले. मिशी, मिश्री, या विनोदी कवितासह प्रेम कविता आणि सत्य वास्तववादी कविता सांगणाऱ्या असत्याचा बॅंड, शेतकऱ्यांची व्यथा मांडणाऱ्या कविता सादरीकरणात ऐकायला मिळाल्या. विद्यार्थ्यांनी ही स्वरचित बनविलेल्या कवितांना मान्यवर यांच्याकडून दाद मिळाली. समारोपास साहित्यिक अण्णा धगाटे, पंचायत समिती खंडाळा सदस्य शोभा जाधव आदिनी उपस्थिती दर्शविली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक पवन सूर्यवंशी यांनी तर सूत्रसंचालन ताराचंद्र आवळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष बोंगाळे, डॉ अजित दडस, शिवाजी अवघडे नामदेव बिजले, शेडगे सर, तुकाराम रामपल्ले, विजय गेजगे यांनी विशेष प्रयत्न केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)