काव्य पुष्पांव्दारे वडिलांना अनोखी आदरांजली

प्रकाश रोकडे यांचा उपक्रम ः धार्मिक विधींऐवजी काव्य संग्रहाचे प्रकाशन
पिंपरी, दि. 12 (प्रतिनिधी) – “आयुष्याच्या संचिताला बोलताना पाहिले, मीच माझ्या आसवांना हसताना पाहिले’, अशा समर्पक काव्यपंक्तींनी आपल्या वडिलांप्रति असलेला आदर व आपुलकीचा भाव व्यक्त करत आदरांजली वाहण्याचा एक आगळा-वेगळा कार्यक्रम चिखलीत गुरुवारी (दि. 12) पार पडला. राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश रोकडे यांनी आपल्या वडीलांना अनोखी काव्य पुष्पांजली अर्पण करत समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.
ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश रोकडे यांचे वडील मुरलीधर रोकडे यांचे सोमवारी (दि. 9) निधन झाले. गंगाधर रोकडे यांच्या अध्यक्षतेखाली या शोकसभेचे गुरुवारी (दि. 12) चिखलीतील विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे आयोजन केले होते. यावेळी सर्व धार्मिक विधींना फाटा देत कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रकाश रोकडे यांच्या “बंधुतेची प्रकाशवाट’ या कवितेचे प्रकाशन महेंद्र भारती, प्रकाश जवळकर, शिवाजी शिर्के, प्रकाश गायकवाड, राजेंद्र कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर प्रकाश रोकडे यांनी या कवितेचे नागरिकांच्या उपस्थितीत वाचन करत आपल्या वडीलांप्रति असलेला भाव या काव्यातून व्यक्त केला. अत्यंत भावपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या काव्य वाचनाने अनेकांच्या नेत्रकडा ओलावल्या. त्यानंतर या कवितेच्या प्रतींचे उपस्थितांना वाटप करण्यात आले. यावेळी स्व. मुरलीधर रोकडे यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.
या कार्यक्रमाला आमदार महेश लांडगे, नगरसेवक राहुल जाधव, सिमला ऑफीस कर्मचारी संघटनेचे माजी अध्यक्ष कैलास रोकडे, रमेश सस्ते, अंकुश जाधव, प्रकाश गायकवाड, अरुण भंडारे, विशाल जाधव, अतुल रोकडे, धोंडीबा सावंत, विकास रोकडे, प्रदीप चोपडे, कल्पना शिलवंत, शितल भंडारे, निर्मला गायकवाड, प्रमिला वाघमारे आदी उपस्थित होते.

सामाजिक उपक्रमांवर भर
काही वर्षांपूर्वी प्रकाश रोकडे यांच्या मातोश्री सुभद्राबाई रोकडे यांचर निधन झाले होते. त्यांच्या शोकसभेतही धार्मिक विधींना फाटा देत सामाजिक संस्थेला पाच हजार रुपयांची देणगी दिली होती. तसेच अशा कार्यक्रमांना दुखवटा न आणण्याचे नातेवाईकांना आवाहन केले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. याशिवाय कोणत्याही कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यास संबंधितांना ते पुस्तकांचा संच भेट देतात. अशा प्रकारे रोकडे कुटुंबियांकडून सामाजिक उपक्रमांवर भर दिला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)