काळ्या पाण्याची शिक्षा पाचवीलाच पुजलेली

एम. डी. पाखरे
आळंदी– उभ्या महाराष्ट्राला तीर्थक्षेत्र म्हणून परिचित असणाऱ्या श्रीक्षेत्र अलंकापुरीतील स्थानिक नागरिकांसह भाविक देखिल गेली दहा वर्षांपासून पिण्याच्या शुद्ध पाण्यापासून वंचितच आहे. तर आजवर येथे ब्रिटिश कालिन जलशुद्धीकरण यंत्रणा कार्यान्वित होती. तर गतवर्षी सुमारे 425 कोटी रूपये खर्चुन अत्याधुनिक जलशुद्धीकरण यंत्रणा सुरू करण्यात आली. मात्र, तरीही आळंदीकरांची काळ्या पाण्याची शिक्षा कायमच आहे.
इंद्रायणी नदीतील ज्या कोल्हापुर पद्धतीच्या बंधाऱ्यातील पाणी उपसा करून त्याचे जलशुद्धीकरण करून ते पाणी आळंदीकरांना नळाद्वारे पिण्याचे पाणी म्हणून पुरविले जाते. बंधाऱ्यातील जे पाणी शुद्ध केले जाते मात्र, बंधाऱ्यातील पाण्यात श्रीक्षेत्र देहुपासून तळवडे, चिखली, मोशी व पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील एमआयडीसी भागातून रसायनमिश्रित, मैलामिश्रीत व परिसरातील सांडपाणी थेट इंद्रायणी नदीच्या पात्रात सोडले जाते. तर त्यात आणखी भर म्हणून इंद्रायणीच्या संपूर्ण पात्रावर जलपर्णीने उग्ररूप धारण केले आहे. त्यामुळे बंधाऱ्यात असणारे पाणी जलपर्णीमुळे अतिशय खराब झाले असून ते काळपट झाले असून काहीवेळा तर त्यावर ऑईल तरंगताही स्पष्ट दिसते. याच पाण्यावर जलशुद्धीकरणानंतर आळंदीकरांसह भाविकांना नळाद्वारे पिण्याचे पाणी म्हणून पुरविले जाते. मात्र, या पाण्यावर शुद्धिकरणासाठी लाखो रुपये खर्चुनही या पाण्याची दुर्गंधी जात नसल्याने नागरिक हे पाणी पिण्यासाठी न वापरता केवळ अंधोळ, कपडे धुणे व इतर कारणासाठीच वापर करतात. तर हातावर पोट असणारे, मोल-मजुरी करणारे, गोर- गरीब सर्वसामान्य मात्र, हेच पाणी पिण्यासाठी देखील नाईलाजास्तव वापरतात. तर 90 टक्के नागरिक हे जवळच असणाऱ्या पिंपरी- चिंचवड व पुणे महापालिका हद्दीतून पिण्यासाठी घेऊन येताना गेली. तर उर्वरित नागरिक बाराही महिने विकतचे पाणी पितात. तसेच दरवर्षी 1200 रूपये पाणीपट्टी करही नित्यनियमाने भरत आहेत.
इंद्रायणीतील पाणी अशुद्ध पाणी डी.टी.टी.पावडर व इतर रसायन वापरून शुद्ध केलेले पाणी प्रथम काळेवाडी येथे असणाऱ्या नवीन टाकीत सोडले जाते. तेथुन पुढे गावात असणाऱ्या जुन्या टाक्‍यांमध्ये सोडले जाते. तद्‌नंतर झोननिहाय (विभागवार) आळंदीकरांना नळाद्वारे पुरविले जाते. मात्र, यात बऱ्याचशा भागात काही ठिकाणी येते, तर काही ठिकाणी येतच नाही. काही ठिकाणी करंगळी एवढे तर उताराच्या भागात मुबलक अशा प्रकारे वितरित केले जाते. शहराच्या मध्यवस्तीत जुन्या दोन सुमारे साडेचार लाख लिटर क्षमतेच्या टाक्‍या आहेत. त्यामध्ये पाणी भरले जात असताना त्या कधी “ओव्हर-फ्लो’ होतील सांगता येत नाही कारण त्यांना लेव्हल पट्टीच नाही. त्यामुळे टाकी भरली की रोज हजारो लिटर पाणी रस्त्यावर आलेच म्हणून समजा. त्यामुळे या परिसरात (लक्ष्मीमाता चौकात) बाराही महिने पाणी नाहक वाहत असल्याने या परिसरातील रस्ते हे खड्डेयुक्‍त झाले आहेत. तर या वाहणाऱ्या पाण्यामुळे भाजी विक्रेत्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होते. थोडक्‍यात सांगायचे म्हणजे आळंदीकरांच्या तोंडचे पिण्याचे शुद्ध पाणी केव्हाच पळाले आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

 • दोन तास मोफत पाणी
  “देणाऱ्याने देत जावे… घेणाऱ्याने घेत जावे’ या म्हणीनुसार गेल्या पाच वर्षांपासून येथील श्री ज्ञानेश्‍वर महाराज संस्थान मुख्य मंदिरालगत व गोपाळपुरातील ज्ञानेश्‍वरी बागेबाहेर अशा दोन ठिकाणी आरो प्लॅन्ट बसवुन नियमित सकाळ-संध्याकाळ दोन-दोन तास नागरिकांना मोफत पिण्याचे पाणी देऊन एक पुण्याचे काम करीत असल्याने नागरिक समाधान व्यक्‍त करीत आहेत.
 • मुबलक व वेळेत पाण्याची गॅरेंटी नाही
  पिण्यालायक नसलेले व नळाद्वारे पिण्याचे पाणी म्हणून पुरविले जाणारे पाणी तरी मुबलक व वेळेत मिळेल याची गॅरेंटी नाही. कारण एकीकडे सतत मोटार जळाल्याच्या तक्रारी व दर गुरूवारी भारनियमन असल्याचे कारण पुढे करीत पाणी पुरवठा विभाग प्रमुख व कर्मचारी अंग झटकुन मोकळे होतात. त्यांच्या या अंगवळणी असलेल्या कारणाने नागरिक मात्र चांगलेच भरडले जातात.
 • आळंदी शहरात एकूण 20 ठिकाणी हातपंप (हापसे) मात्र, देखभाल दुरुस्ती अभावी धुळखात पडून सध्या उन्हाळा सुरू होत असल्याने पाण्याची पातळी खालावत जाणार आहे, त्यामुळे शहरात असणाऱ्या सुमारे 20 ठिकाणच्या हातपंपावर देखभाल दुरूस्ती करून ते पुर्ववत सुरू करावेत.
  प्रमिला राहणे, नगरसेविका, प्रभाग क्रमांक 7
 • भामा आसखेड योजनेत अनेक अडथळे निर्माण होत आहेत. ती योजना आळंदी पर्यंत थेट आणण्यासाठी तेथे दोन गुंठे जागेची मागणी करून तेथे कायमस्वरूपी पाणी सोडण्यासाठी पालिकेचे दोन कर्मचारी ठेवावे लागतील ही योजना लवकरात लवकर आळंदीपर्यंत पोहोचवणार आहे.
  – सागर भोसले, उपनगराध्यक्ष, तथा पाणी पुरवठा सभापती
 • लवकरच आळंदीकरांसाठी भामा-आसखेडची स्वतंत्र पाणी योजना कार्यान्वित करत असून त्यासाठी 27 कोटी खर्चाची ही योजना आहे. थेट पाइपलाइन टाकुन ती आळंदीपर्यंत लवकरच येणार आहे. तसेच तीर्थक्षेत्र विकास आराखड्या अंतर्गत शहराच्या विविध भागात तीन ठिकाणी पाण्याच्या नवीन टाक्‍या बांधुन पूर्ण झाल्या असून त्याची पाइपलाइन देखिल जोडण्यात आली आहे. येत्या महिनाभराच्या आतच यात पाणी सोडून नवीन मीटर बसविण्यात येणार आहेत.इंद्रायणीत साचलेल्या प्रचंड प्रमाणातील जलपर्णी काढण्याचे वार्षिक टेंडरही देण्यात आले आहे.
  समीर भुमकर, मुख्याधिकारी, आळंदी

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)