काळे साखर कारखान्याकडून कर्जमाफीचे अर्ज भरण्याची मोफत सुविधा

कोपरगाव – सरकारने थकीत कर्ज असणा-या शेतक-यांना कर्जमाफी केली असली तरी या कर्जमाफीचे अर्ज भरताना शेतक-यांना खूप मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यासाठी कर्मवीर शंकरराव काळे साखर कारखान्याने अर्ज भरण्याची मोफत सुविधा उपलब्ध केली असल्याची माहिती अध्यक्ष आशुतोष काळे यांनी दिली.

ऐतिहासिक कर्जमाफीच्या नावाखाली शेतक-यांना मनस्ताप देण्याचे धोरण शासनाने अवलंबिले असून अर्ज भरण्यासाठी त्यांना ताटकळत बसावे लागत आहे. शेतक-यांना खूप मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. कर्जमाफी मिळावी यासाठी शेतक-यांनी विविध आंदोलन, मोर्चे, रस्तारोको केले. शेतक-यांच्या लढाईमुळे आंदोलनाला यश आले. परंतु शासनाने केलेल्या कर्जमाफीचे रोज निकष बदलत होते. त्यामुळे शेतक-यांना कर्जमाफी नेमकी कोणाला, किती माफी मिळणार याबाबत संभ्रम तयार झाला.

अखेर कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सांगितले गेले. परंतु कर्जमाफीचा अर्ज भरणे खूप किचकट स्वरूपाचा आहे. शेतक-यांना अर्ज भरण्यासाठी खासगी केंद्रांमध्ये जावे लागत आहे. वारंवार हेलपाटे मारूनही सहजासहजी अर्ज शासनाच्या संकेत स्थळाशी जोडले जात नाही. अर्ज भरण्यासाठी केंद्र चालकांकडून अव्वाच्या सव्वा शुल्क आकारणी केली जात आहे. त्यामुळे शेतक-यांची कर्जमाफीच्या अगोदरच लुटालूट सुरू झाली आहे.

शेतकऱ्यांनी काळे यांच्याकडे कर्ज माफीचे अर्ज भरताना होत असलेला मनस्ताप व रेंगाळणाऱ्या प्रक्रियेचे गाऱ्हाणे मांडले. कर्जमाफीपासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली. या समस्येची तातडीने दखल घेत शेतक-यांना आर्थिक नुकसानीपासून वाचविण्यासाठी आशुतोष काळे यांनी सोमवारपासून (दि.14) कारखाना कार्यस्थळावर कर्जमाफी साठी पात्र असणा-या शेतक-यांसाठी मोफत अर्ज सुविधा केंद्र सुरू करणार असल्याची माहिती दिली.

कर्जमाफीसाठी पात्र त्या शेतक-यांची अर्ज न भरण्याची मानसिकता झाली आहे. परंतु त्यामुळे शेतक-यांचे खूप मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. ते टाळण्यासाठी मोफत सुविधा उपलब्ध करून दिली असल्याचे काळे यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)