काळेवाडीतील स्मशानभूमीलाच मरणयातना

पिंपरी – महापालिकेच्या दुर्लक्षामुळे कोट्‌यावधी रुपये खर्चून काळेवाडीमध्ये उभारलेली स्मशानभूमी आज मरणयातना सहन करत आहे. विविध सोयी सुविधांच्या अभावामुळे याठिकाणी येणाऱ्या मृतांच्या नातेवाईकांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागतो. मोकाट कुत्र्यांनी याठिकाणी ठिय्या मांडला असून सुरक्षा रक्षक गायब असल्याचे याठिकाणी पहायला मिळाले.

पिंपरी-चिंचवड ही “श्रीमंत’ महापालिका म्हणून ओळखली जाते. मात्र, महापालिकेच्या स्मशानभूमींची अवस्था पाहिली असता महापालिकेच्या उदासिनतेचे दर्शन घडते. काळेवाडी नदीजवळ असलेल्या स्मशानभूमीला कोणीच वाली नसल्याचे दिसून आले. दहन जाळीही मोडकळीस आली आहे. दहन शेडमध्ये एकच दिवा चालू अवस्थेत आहे. तर दुसऱ्या दिव्याची काच फुटलेली असल्यामुळे तो बंद आहे. यामुळे रात्रीच्या अंत्यविधीवेळी नागरिकांना अंधारातच सर्व विधी करावे लागतात. याठिकाणी सुरक्षा रक्षकाची नेमणूक केली आहे. मात्र, तो जाग्यावर नसतो. परिणामी टवाळखोरांनी याठिकाणी उच्छाद मांडला आहे. स्मशानभूूमीमध्येच सावलीखाली चक्क वाहने पार्क केल्याचे दिसून आले. त्यामुळे पालिकेचा कारभार कसा राम भरोसे सुरू आहे, हे तिथल्या परिस्थितीवरून निदर्शनास आले.स्मशानभूमीत मोठ्या प्रमाणात कुत्र्यांचा सुळसुळाट दिसून आला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आवारातच सिमेंटचे ब्लॉक आणि राडारोडा पडलेला आहे. तिच परिस्थिती बाहेर सुद्धा दिसून आली. निवारा शेडमध्ये वेळेवर स्वच्छता होत नसल्याचे निदर्शनास आले. स्मशानभूमीतील कचरा नदी पात्रात फेकला जातो. दहन जाळीतील राखही नदीच्या काठावर फेकली आहे. तसेच फुल आणि इतर पूजेच साहित्य देखील तसेच उघड्यावर फेकले आहे. स्वच्छतागृहाची अवस्था दयनीय झाली आहे. शौचालयामध्ये पाण्याची व्यवस्थाच नाही. बादली आणि नळाच्या तोट्या लंपास करण्यात आल्या आहेत. तसेच पिण्याच्या पाण्यासाठी लावलेल्या नळाच्या तोट्याची तिच अवस्था दिसून आली. त्यामुळे अंत्यविधीसाठी आलेल्यांना ताटकळत उभे रहावे लागत आहे. त्याचबरोबर महिला स्वच्छतागृह कुलूप बंद असल्याचे दिसून आले.

नागरिकांची मागणी
– स्मशानभूमीची डागडुजी करण्यात यावी
– स्मशानभूमी परिसराचे सुशोभिकरण करावे
– प्रवेशव्दारावर फलक बसविण्यात यावा
– राडा-रोडा उचलण्यात यावा
– स्मशानभूमी परिसराची वेळेवर स्वच्छता व्हावी
– मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा
– नवीन दहन जाळी बसविण्यात यावी


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)