काळवीटाचा मृत्यू

काळवीट काय नी हरिण काय ? मुके प्राणीच ते ! आणि मानवाने त्यांना मारावे ही पध्दत पूर्वीपासूनची.पण मग काल आज मध्ये फरक काय ? सद्य स्थितीत काळवीटाची झालेली शिकार, त्यामुळे सुनावली गेलेली शिक्षा आणि त्यानंतर करण्यात आलेला कांगावा, या साऱ्यांबद्दल तीन-चार आठवड्यापूर्वी वृत्तपत्रांतून सविस्तर हकिकत आल्याच होत्या.

आता ही गोष्ट पूर्वीच्या काळातील हरिण मारल्याची ! असाच एक हरणांचा कळप चालला होता. त्या कळपाचा एक प्रमुख डौलदार हरिण. त्याला मारण्यासाठी त्या एका राजाने हातातील भाला उगारला ! क्षणभर त्या राजाची व हरिणांच्या त्या राजाची नजरानजर झाली. हरिणांच्या राजाला पळून जाता आले असते, पण त्याच्या मागे असलेला 1700 हरणांचा कळप भांबाहून गेला असता, अशा काहीश्‍या विचाराने तो हरिणांचा राजा एका जागीच उभा राहिला. त्याच्या तेजस्वी डोक्‍यात करूणा दाटून आली.

-Ads-

त्या राजाचा भाला पहाता पहाता हरिणाच्या भाल प्रदेशावर घुसला. वार निसटता होता म्हणून दहा-पाच निसटते क्षण हरणाच्या वाट्याला उरू शकले. मरता मरता हरिण जणू काही म्हणत होते, हे राजा मी तुझा काही अपराध केला नव्हता, का मारलेस मला ? त्या तरफडणाऱ्या हरिणाच्या नेत्रांकडे बघत असणारा तो राजा अस्वस्थ होत गेला. त्याचे विचार बदलले. पण हातातून भालाच नव्हे तर वेळही निघून गेली होती. काय करायचे आता ? या प्रश्‍नात तो पडला असतानाच…..

अलख निरंजन, मागून एक आवाज आला. राजाने मागे पाहिले, तर साक्षात गोरखनाथ मागे उभे होते. राजाने हात जोडून विनंती केली हरणाला जिवंत करा, गोरखनाथ म्हणाले राजा मृत्यू हा आपले दान मिळवल्याशिवाय जाणार नाही. तु तुझे राज्य देशील आणि माझ्या बरोबर कायमचा वनात येशील तर हे हरिण जिवंत होईल.

स्वत:चे मन खात असलेल्या राजाला परोपकार बुध्दी आठवली. अपराधाची दुष्ट बुध्दी क्षणात विरागी झाली आणि त्याने राज्यावर पाणी सोडले. वंशपरंपरागत राजा होण्याचे अधिकार सोडले, या घटनेतील हा राजा म्हणजे राजा भर्तृहरि होय ! पिढ्यांन्‌ पिढ्यांना शहाणे करण्याचे काम त्याने आपल्या लेखनात केले. एका काव्यात त्याने म्हटले आहे, जगात चार प्रकारची माणसे असतात. सर्वोच्च प्रकारची माणसे स्वत:चे वाटोळे झाले तरी दुसऱ्याचे भले करतात. दुसऱ्या प्रकारची माणसे आपला स्वार्थ साधला तर दुसऱ्याचे भले करतात.

तिसऱ्या प्रकारची माणसे स्वत:च्या स्वार्थासाठी दुसऱ्याला त्रास देतात आणि चौथ्या प्रकारची माणसे स्वत:चे वाटोळे झाले तरी हरकत नाही, पण दुसऱ्याचे वाटोळे कसे होईल यासाठी खटपट करतात. आपल्या भारतभूमीतील ही हरिण मारण्याची जुन्या काळातील कथा ! सध्याच्या काळातील कथा तुम्ही सारे जाणताच ! हरिणांचे मरणे कायम आहे. पण त्यांच्या मृत्युमुळे बदलण्याचा काळ संपला आहे.

तिसऱ्या, चौथ्या प्रकारातील माणसांची संख्या वाढत आहे. अपराध करून दयेची याचना करणारे व त्यांना पाठिंबा देणारे आहे. अपराध करून दयेची याचना करणारे व त्यांना पाठींबा देणारे मरणाऱ्या प्राण्याच्या डोळ्यातील भाव वाचायला शिकले तर ……? मरणाऱ्या काळवीटांचे मरणे सार्थकी लागेल !

पद्‌माकर पाठकजी 

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)