काळजी डोळ्यांची (भाग २)

 डॉ. संतोष काळे
आपण आपल्या डोळ्यांच्या आरोग्याच्या बाबतीत प्रचंड निष्काळजी असतो. तासन्‌तास टीव्हीसमोर बसणे, पापणीही न लवता कॉम्प्युटरकडे पाहणे व उन्हात उघड्या डोळ्यांनी फिरणे ही त्या निष्काळजीपणाची लक्षणे आहेत. या निष्काळजीपणामुळे आपण आपल्या डोळ्यांचे नुकसान करीत असतो हे आपल्या ध्यानात येत नाही. 
टीव्ही, कॉम्प्युटरपासून ब्रेक : सतत टीव्ही पाहणे व कॉम्प्युटरसमोर बसणे टाळावे. आपले कामच ते असल्यास दर दहा दहा मिनिटांनी ब्रेक घेऊन काही सेकंद डोळे बंद करून बसून राहावे. सतत कॉम्प्युटरच्या स्क्रीनकडे पाहणे टाळावे. सतत कॉम्प्युटरसमोर बसल्यामुळे डोळे कोरडे पडण्याची शक्‍यता असते. त्यामुळे नोकरदारांनी आपल्यासोबत एक पाण्याची बाटली ठेवावी. दर दहा मिनिटाला थोडे थोडे पाणी पीत जावे. यामुळे डोळ्यांतील पाण्याचा प्रवाह सतत सुरू राहतो.
कॉम्प्युटर स्क्रीनकडे थेट पाहणे टाळावे : कॉम्प्युटरच्या स्क्रीनकडे थेट पाहिल्यामुळे त्यातील किरणांचा डोळ्यांवर वाईट परिणाम होतो. त्याऐवजी स्क्रीन थोडीशी खालच्या दिशेने वळवून ठेवावी. आजकाल लॅपटॉपसारख्या कॉम्प्युटरलाही तशी सोय उपलब्ध आहे. असे केल्यामुळे स्क्रीनचा आपल्या डोळ्यांशी थेट संपर्क येत नाही व परिणामी डोळ्यांचे रक्षण होते.
आहारात बदल : अ जीवनसत्त्वाचे स्त्रोत असलेल्या अन्नपदार्थांचा आपल्या आहारात समावेश करावा. गाजर, मेथी, काकडी इत्यादी खाद्यपदार्थ हे अ जीवनसत्त्वाचे उत्तम स्त्रोत आहेत. या खाद्यपदार्थांचा आहारात समावेश केल्यास डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. काकडीच्या रसाचा आपल्या आहारात समावेश करावा. हा रस चवीलाही उत्तम असतो व पौष्टिकही असतो.
आपले डोळे हे आपल्याला हे सुंदर जग पाहण्यासाठी मिळालेली भेट आहे. या सुंदर जगातील दृष्यांचा विना अडथळा आस्वाद घ्यायचा असेल, तर त्यासाठी आपल्या डोळ्यांची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. डोळे निरोगी राहण्यासाठी या सर्व उपायांव्यतिरिक्त डोळ्याच्या सभोवती बोटांनी हलका मसाज करणे व डोळे खाली-वर, डाव्या-उजव्या दिशेने फिरवणे इत्यादी व्यायामही करता येतात.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)