काल नाही, फक्त आज आणि उद्या

उणिवांची जाणीव

प्रा. शैलेश कुलकर्णी

आपल्या गत आयुष्यात रममाण व्हायला आपल्याला प्रत्येकालाच हवं असतं, ते अधिक प्रियही असतं. आपल्या प्रत्येकाच्याच साठवणीतल्या अनेक आठवणी असतात. “हर्षाच्या-स्पर्शाच्या, घरच्या-दारच्या, प्रीतीच्या-मैत्रीच्या, स्पर्धेच्या-बक्षिसांच्या, शाळेच्या-कॉलेजच्या, बालपणीच्या-तारुण्याच्या; अशा एक नाही तर अनेकविध आठवणीत आपल्या अंतर्मनाला सुखावण्यासाठी अनेकदा त्या आपण स्मरत असतो. ह्यांत काही आठवणी सुखाच्या-दु:खाच्या, रागाच्या-वादाच्या, विरहाच्या-प्रहाराच्या, प्रयासाच्या-त्रासाच्या, मानाच्या-अपमानाच्या अशा मिश्र स्वरूपाच्याही असतात. कोणत्या आठवणी आपल्या अंतर्मनासमोरून कधी तरळून जातील, हे काही ठरलेलं अथवा आपण ठरवलेलं नसतं.

अनेकदा काही घटना आपण कितीही आठवायच्या ठरवल्या तरीही नीट, पूर्णपणे आठवता येतातच असं नाही; तर काही घटना मात्र अनावधानानं, आपोआप आपल्या डोळ्यासमोर पुनःश्‍च यायला लागतात. खरंच, ह्या मनाचं नेमकं काय रसायन आहे, आपल्याला काही कळत नाही. निश्‍चितच सुखावणाऱ्या, आपल्या अंतर्मनाला समाधान देऊ करणाऱ्या अशा सर्वच आठवणींची साठवण आपण केली पाहिजे. एक वेगळीच आनंद निर्मिती आणि तीही आपल्याच अंतर्मनात, अंतरंगात करण्याचं काम ह्या सुखद, आनंददायी आठवणी करत असतात. तसं घडलंच पाहिजे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आपण आणि इतरांनी परिधान केलेले कपडे, वापरलेल्या वस्तू, आपापसांत झालेला संवाद, घडलेल्या गप्पागोष्टी, त्या दरम्यानच्या शारीरिक हालचाली, आपापले हावभाव अशा अनेकविध गोष्टी आठवायला सुरुवात होते. ह्या आठवणींचं आपल्याशी एक जिव्हाळ्याचं नातंच निर्माण झालेलं असतं. आपलं जगण्यापलीकडचं जीवन आनंदायी करण्याचं काम अनेकदा ह्या अशा आठवणीच करत असतात. काही आठवणी तर रात्री झोपेत आपल्याला पडलेल्या स्वप्नांच्या असतात. काही वेळा तर ह्या आठवणीमध्ये आपण इतके रममाण झालेले असतो, की वास्तवातले आणि वर्तमानातले कित्येक क्षण आपलं फक्त मनच प्रचीती घेत असतं, पण शरीराला त्याची अनुभूतीच मिळत नसते.

आठवणी म्हणजे मुंग्यांचं वारूळ
“आठवणी म्हणजे आनंदाचे कंद”, हे एकीकडे आपण अनुभवत असतो, पण त्या आठवणींत आपण स्वत: किती व्यस्त व्हायचं, ह्याचं भान राखणं देखील महत्वाचं ठरतं. जोपर्यंत काही घडतंय तो पर्यंत सर्व ठीक आहे; पण जेव्हा काही बिघडेल तेव्हा मात्र निस्तरणे मुश्‍कील ठरू शकतं. ह्याची जाणीव आपल्याला होणं अधिक महत्त्वाचं आहे. कित्येकदा ह्या आठवणीच आपल्या मनाला उभारी देत असतात. आपला मानसिक एकलेपणा दूर करण्याच्या कामी येतात. आपण शरीरानं एका वेळेला एकाच ठिकाणी जाऊ शकतो, पण गत काळातल्या आठवणी मात्र आपल्याला अनेक ठिकाणांची सफर करवून आणतात. आठवणी ह्या मुंग्यांच्या वारुळाप्रमाणे असतात. वारुळाकडे पाहून आतमध्ये किती मुंग्या असतील याचा अदमास होत नाही, अंदाज येत नाही; पण एका मुंगीनं बाहेरचा रस्ता धरला, की एका मागोमाग एक अशा असंख्य मुंग्या बाहेर पडायला लागतात. आठवणींचंही तसंच आहे. साठवणीतल्या अशा अनेक आठवणी आपल्या मनांत घर करून राहत असतात. आठवणीतला एखादा क्षण जरी आपल्याला आठवला तरी तो संपूर्ण दिवस विलक्षण करत जातो. ह्या आठवणीच आपापल्या परस्परांतील नात्याची वीण घट्ट करत जातात.

भूतकाळाचं भूत
आपण वर्तमानात आपलं जीवन जगत असताना खरं तर सद्य:स्थितीचा आणि नजीकच्या भविष्यकाळाचा विचार करणं महत्त्वाचं, गरजेचं आणि म्हणूनच आवश्‍यक असतं. आपण वर्तमानातील जीवन जगताना प्राप्त परिस्थितीचा आनंद लुटण्याच्या ऐवजी भूतकाळाचे गोडवे गात बसतो. मी असं केलं होतं, तसं केलं होतं, माझ्यासारखं कोणी काही करूच शकलं नव्हतं, माझ्याकडे एवढा पैसा होता, मी सर्वांत अधिक व्यवसाय केला होता वगैरे वगैरे…. ह्या सर्वच घटना भूतकाळातल्या असतात, त्याचंच आपण सदोदित कौतुक करत राहात असतो. भूतकाळाचं भूतच जणू काही आपल्या मनाचा ताबा घेऊन सर्वत्र टेंभा मिरवत असतं. वर्तमानातल्या “मी” चा त्यामुळेच आपल्याला विसर पडलेला असतो. मागील काळात, गत आयुष्यात, भूतकाळात मी कधी, कसा, कोण, कोठे आणि काय होतो, ह्यापेक्षा सद्य:स्थितीत, वर्तमानकाळात, आज मी कसा, कोण, कोठे आणि काय आहे? आणि ते सुद्धा का? (कोणत्या कारणानं?) ह्याचा प्रकर्षानं आणि प्राधान्यानं, सातत्यानं आणि साकल्यानं अभ्यासपूर्वक विचार करत राहणं गरजेचं असतं. मी कालच्यापेक्षाही आज सरस, प्रगत होणं आवश्‍यक आणि म्हणूनच महत्त्वाचं असतं.

कालची माहिती आपल्या सर्वांनाच
आपल्या आयुष्यात अथवा इतरत्र काय घडलंय, हे आपल्याला माहिती असतंच किंवा ते कालांतरानं माहिती होतंच. कालची, भूतकाळातील माहिती आपल्या सर्वांनाच उपलब्ध होत असते. वर्तमानात राहून भूतकाळातल्या अनुभवांबरोबर सतत राहणं हे नेहमीच उपयोगाचं ठरतं असं नाही. प्राप्त परिस्थितीत काही वेळा उपलब्ध झालेल्या अनेक चांगल्या संधी आपण गमावू शकतो. ह्याचं नुसतं ज्ञान असून चालत नाही तर त्या संधीचं सोनं करण्याचं भान आपल्याला असणं आवश्‍यक असतं. अनेकदा आपल्या गत आयुष्यातील अनेक बाबींची सांगड, बरोबरी, तुलना आपण प्राप्त आणि सद्य:स्थितीशी करत असतो. काहीवेळा नकारात्मक विचार आपल्या अंतर्मनांत थैमान घालायला लागतात आणि भ्रमातले आपण संभ्रमांत जखडून राहतो. चांगलं-वाईट, चूक-बरोबर, खरं-खोटं अशा अनेक समस्या आपल्याला भेडसावत राहतात. अशावेळी, आनंद तर नाहीच पण दु:ख आणि निराशा पदरी येते. मग आपण दोष मात्र आपल्या नशिबाला नाही तर परमेश्‍वरालाच देत राहतो. अनेकदा नकारात्मक विचारच आपलं नुकसान करतात. येणाऱ्या अनेक विचारांमध्ये नकारात्मक विचार आपल्याकडून अनावधानानं आपलेसे केले जातात. ह्या नकारात्मक विचारांचा पगडा आपल्या अंतर्मनावर अधिक बसला तर त्याचे परिणाम विपरीत होत असल्याचं अनुभवायला येऊ लागतं.

आजचा दिवस माझा
कालचा दिवस संपला, तरंच आपल्या आयुष्यातील नवीन दिवसाची पहाट उगवते. नवीन दिवसाच्या उगवत्या सूर्याच्या तेजोमय किरणांनी आपलं नवं आयुष्यच जणू काही सुरू होत असतं. दिवसाची सुरुवातच सकारात्मक विचारांनी झाली, तर पुढील दिवस उजाडेपर्यंत आपण आनंदी, सुखी, समाधानी तर राहू शकतोच; पण शिवाय मन:शांती अधिक प्राप्त होत राहते. हल्ली जगात पैशानं काहीही विकत घेता येतं आणि विकताही येतं. असं जरी असलं, तरीही मन:शांती मात्र आपल्या अंतरंगात प्रसूत व्हावी लागते. आपल्या आतच आपण स्वतः आनंदाची निर्मिती करायची असते. त्याची अनेकदा आपण अपेक्षा इतरांकडून करतो, पर्यायानं निराश होतो. “आजचा दिवस माझा” हेच सत्य आहे आणि म्हणूनच ते सिद्धही केलं पाहिजे. आपल्याला आपण स्वतः प्रसिद्ध होण्याची इर्षा असते आणि ती असलीच पाहिजे पण प्रसिद्ध होण्यासाठी अगोदर स्वतःला सिद्ध करण्याची जरुरी असते हे मात्र आपण विसरतो. केवळ विचारांत, स्वप्नांत, भ्रमांत आणि संभ्रमांत न अडकून पडता कार्यकक्षांच्या मर्यादा ओलांडाव्या लागतात, स्वतःला झोकून देऊन प्रत्यक्ष कार्यकृती करावी लागते, हे मनात आलं पाहिजे, आपण ध्यानांत घेतलं पाहिजे.

उद्याचं मात्र येणारा काळ ठरवतो
जसं भूतकाळाचं भूत आपल्या मानगुटीवर बसलेलं असतं, तसंच काहीसं भविष्यातील विचाररूपी राक्षसदेखील आपल्या हात धुवून मागे लागलेला असतो. अनेकदा भूतकाळातल्या आठवणी आपल्याला स्वस्थ बसू देत नाहीत, तर काही वेळा भविष्याची चिंता, काळजी आपल्याला काही सुचू देत नाही. कितीही ठरवलं आणि काहीही केलं, तरीही आपण मात्र ह्याच दुष्ट्‌चक्रांत अडकतो. गेलेला काल आपल्याला विसरणेच संयुक्तिक ठरतं आणि येणाऱ्या उद्याच्या चिंतेत व्यथित न होता आजचा वर्तमानातला दिवस आनंदात व्यतीत करणं अधिक महत्त्वाचं, आवश्‍यक, जरुरीचं आणि गरजेचं असतं. गेलेला काल आपल्या हातातून निसटून गेलेला असतो आणि उद्याची प्रत्येक घडोमोड ही येणारा काळ ठरवतो. अर्थात, उद्याचा येणारा प्रत्येक क्षण विलक्षण कसा करता येईल, त्याची सुरुवातच सकारात्मक विचार, वर्तन आणि व्यवहारानं कशी होईल, हे आपण अभ्यासपूर्ण वैचारिक मंथनातून ठरवू शकतो आणि त्यानुरूप कार्यकृती करू शकतो. ह्याठिकाणी “आकर्षणाचा सिद्धांत” (लॉ ऑफ ऍट्रॅक्‍शन) ह्या शास्त्रीयदृष्ट्या प्रयोगाअंती सिद्ध आणि स्पष्ट झालेल्या शास्त्रीय प्रयोगाचा वापर उपयुक्त ठरू शकतो. थोडक्‍यात, आपल्या आंतरिक इच्छाशक्तीच्या जोरावर आपण आपली कार्यसिद्धी करू शकतो, त्यांत भरघोस यशही संपादन करू शकतो, अशा दृष्टिकोनातून “आकर्षणाचा सिद्धांत” आपल्या सुखी, आनंदी आणि मन:शांती देऊ करणाऱ्या उद्यासाठी आपण आजपासून रोजच वापरू शकतो. आपल्या भविष्यातील योग हे नशिबावर नाही तर आपल्या विचार, वर्तन आणि व्यवहार यांवर अवलंबून, आधारलेले असतात.

कालच्या उणिवा, आजच्या जाणिवा आणि उद्याच्या नेणिवा
आपल्यापैकी प्रत्येकात काही ना काही उणिवा असतातच, उणिवा नसणारी व्यक्ती सापडणे सद्य:स्थितीत विरळाच; त्याचा शोधही न घेतलेला बरा. कारण व्यक्ती तितक्‍या प्रकृती, त्यांत काहींमध्ये संकृतीचं तर काहींमध्ये काही विकृतीचं दर्शन आपल्याला घडत असतं. अर्थातच कोणत्याही विकृतीची स्वीकृती आपण सहसा करत नाही, पण आपल्या संकृतीला आणि आपापल्या प्रकृतीला साजेशी एखादी कलाकृती ठरेल अशी कृती करण्याची आपल्याला जाणीव काहीवेळा का होत नाही? कालच्या काही उणिवा कुरवाळत बसण्यात आपण धन्यता मानतो, सतत उणिवांचीच, समस्यांचीच, दु:खाचीच सर्वत्र आणि सातत्यानं का चर्चा करत राहतो? आजच्या आपल्या आणि इतरांच्या जाणिवा जपण्याच्या दृष्टिकोनातून आपण खरंच गांभीर्यानं विचार करतो का? आपल्या बुद्धिवादी जीवाला कालच्या उणिवा दूर करून, आजच्या जाणिवा जपून त्यांना नेणिवेपर्यंत नेण्याची आज खरी गरज आहे. ह्यासाठी आपल्या प्रत्येकाचेच विचार, वर्तन आणि व्यवहार हे स्वतःपुरते मर्यादित न ठेवता इतरांच्या उणिवा दूर करून, त्यांच्या जाणिवा जपून त्यांना नेणिवेपर्यंत नेण्याच्या कामी यायला हवेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)