कालेकर-येरवळेकर रयत संघटनेत पुन्हा रूळले?

सुधीर पाटील
कराड, दि. 2 -कृष्णा कारखाना आणि पंचायत समितीच्या राजकारणावरून उंडाळकरांच्या रयत संघटनेपासून काही काळ दुरावलेल्या सर्जेराव लोकरे, पांडुरंग पाटील आणि डॉ. अजित देसाई या तिघांची रयत संघटनेच्या कार्यक्रमांतील हजेरी वाढू लागली आहे. यावरून हे तिघेही पुन्हा रयत संघटनेत रूळत चालल्याची चर्चा कराड दक्षिणेत सुरू आहे.
कृष्णा कारखान्यात 2010 मध्ये अविनाश मोहिते यांच्या नेतृत्वाखालील संस्थापक पॅनलने ऐतिहासिक सत्तांतर केले. ते सत्तांतर घडवून आणण्यात सर्वाधिक वाटा विलासकाकांच्या रयत पॅनेलचा होता. किंबहुना रयत संघटनेमुळेच संस्थापक पॅनलची निर्मिती झाली होती. त्या निवडणुकीत येरवळेचे सर्जेराव लोकरे आणि कालेचे पांडुरंग पाटील हे संस्थापक पॅनलचे उमेदवार होते. यापैकी सर्जेराव लोकरे त्यावेळी उमेदवारी घेण्याच्या तयारीत नव्हते. मात्र, उंडाळकरांच्या आग्रहापुढे त्यांचे काही चालले नाही. सत्तांतर होऊन कारभार सुरू झाल्यानंतर अडीच-तीन वर्षातच सत्ताधार्‍यांपैकी काही संचालकांचे बिनसले. अविनाश मोहिते आणि उंडाळकरांच्या रयत संघटनेचे पटेनासे झाले. संचालक मंडळातील उंडाळकर समर्थक रयत संघटनेपासून दूर गेले. कृष्णेच्या 2015 च्या निवडणुकीत सर्जेराव लोकरे, पांडुरंग पाटील हे पुन्हा अविनाश मोहितेंच्या पॅनलमधून उमेदवार झाले. मात्र, संस्थापक पॅनलचा निसटता पराभव होऊन भोसले गट सत्तेवर आला. यावेळी उंडाळकरांची रयत संघटना भोसले गटाबरोबर होती. पांडुरंग पाटील, सर्जेराव लोकरे पराभूत झाले. मात्र, डॉ. अजित देसाई यांच्या पत्नी निवडून आल्या.
कालेचे डॉ. अजित देसाई हे 2012 च्या पंचायत समिती निवडणुकीत उंडाळकर गटाचे उमेदवार होते. डॉ. देसाई विरूध्द दयानंद पाटील अशी लढत त्यावेळी झाली होती. त्यात डॉ. देसाई यांचा निसटत्या फरकाने पराभव झाला होता. तसेच त्यांच्या पराभवाबद्दल राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा झाली होती. त्यावरून तेही रयत संघटनेपासून दुरावले होते. तथापि, आता त्यांचीही रयत संघटनेच्या कार्यक्रमांना हजेरी दिसत आहे. त्याचा प्रत्यय दि. 24 ऑगस्ट रोजी ङ्गसमाजकारणातील भगीरथफ, या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात आला. या कार्यक्रमाला तिघेही उपस्थित होते.
विलासकाकांच्या सुरूवातीच्या राजकीय काळात सर्जेराव लोकरे आणि पांडुरंग पाटील यांचे वडील उंडाळकरांचे खंदे समर्थक राहिले होते. येरवळेचे रघुनाथ लोकरे (रघूबाबा) यांना उंडाळकरांनी खरेदी-विक्रीचे काहीकाळ चेअरमनही केले होते. जुन्या कार्यकर्त्यांच्या मदतीची जाण ठेऊन विलासकाकांनीही त्यांच्या मुलांना राजकारणात संधी दिली. हे ऋणानुबंध लोकरे, पाटील, देसाई यांच्यासारखे कार्यकर्ते सहजासहजी विसरू शकणार नाहीत. म्हणूनच काही काळाच्या दुराव्यानंतर बाजार समिती, खरेदी-विक्री संघात त्यांचे येणे-जाणे वाढले आहे. यावरून कालेकर-येरवळेकर पुन्हा रयत संघटनेत रूळू लागल्याची चर्चा कराड दक्षिणेत सुरू आहे. तसेच ङ्गसुबह का भुला अगर शाम को घर आये, तो उसे भुला नही कहतेफ, या म्हणीप्रमाणे त्यांना पुन्हा आपल्यात सामावून घेण्यासाठी रयत संघटनाही सकारात्मक आहे.

What is your reaction?
245 :thumbsup:
11 :heart:
4 :joy:
3 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
4 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)