काला वाटू एकमेंका…

– प्रा. डॉ. प्रकाश खांडगे

  • केवळ महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारत देशात श्रीकृष्णाचा जन्म आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशीचा काला याला अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण भगवान श्रीकृष्ण हा लोकसखा आहे तो केवळ गौळणींचा सखा नाही तर गवळ्यांचाही सखा आहे. काला म्हणजे सत्वगुणाचा काला. काला म्हणजे समाजाचा सलोखा. गोकुळात प्रतिवर्षी इंद्राचा उत्सव साजरा व्हायचा. कृष्ण हा लोकाभिमुख लोकनायक असल्याने त्याने इंद्राची पूजा थांबविली आणि गोवर्धन पर्वताचा उत्सव सुरू केला. क्रोधीत झालेल्या इंद्राने गोकुळावर अतिवृष्टी केली कृष्णाने गोवर्धन उचलला व गोकुळवासीयांचे रक्षण केले. दैवतकथा आणि लोककथेचा सुंदर समन्वय असणाऱ्या अनेक कथा जन्माष्टमीच्या कीर्तनात सादर होतात.

गोकुळाष्टमीचा उत्सव भारतभर साजरा होतो. संपूर्ण भारतभर सुरू होईल. कुठल्याही देवतेच्या जन्माची कथा कीर्तनाच्या उत्तररंगात सादर होत असते किंवा प्रत्यक्ष देव जन्माला आला असून तो पाळण्यात विसावला आहे, असे गृहीत धरून त्याचा पाळणा गायला जातो. देवतेचे अवतरण प्रत्यक्ष झाले आहे, असे गृहीत धरून त्या देवतेचे संकीर्तन करणे यात नाट्य असते. देवतेच्या जन्माचे विशिष्ट अभंग असतात. तसेच हा जन्म सादर करण्याच्या विशिष्ट पद्धती असतात. देवतेचा जन्म सादर करणे हा लोकसंस्कृतीचा एक विशेष भाग होय. कृष्ण जन्माच्या कीर्तनात दोन प्रकारचे नाट्यसंकेत आहेत. एक संकेत कृष्ण जन्माचा तर दुसरा गोकुळात कृष्णाने केलेल्या दहीदूध चोरीचा व हंडी फोडण्याचा. कृष्ण जन्म रात्री बारा वाजता होतो आणि त्यानंतर लागलीच गोविंदा पथके गोविंदा काढतात.
बाळकृष्ण नंदा घरी, आनंदल्या नरनारी
गुढीया तोरणे करिती कथा गाती गाणे
अशा प्रकारे कृष्ण जन्माचा अभंग कीर्तनात सादर केला जातो. यानंतर बाळक्रिडेचे अभंग कीर्तनकार सादर करतात त्यात प्रामुख्याने कृष्णाने केलेल्या गोपिकांच्या थट्टा-मस्करींचा अंतर्भाव असतो.

केवळ महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारत देशात श्रीकृष्णाचा जन्म आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशीचा काला याला अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण भगवान श्रीकृष्ण हा लोकसखा आहे तो केवळ गौळणींचा सखा नाही तर गवळ्यांचाही सखा आहे. द्वारका, मथुरा, वृंदावन अशा अनेक तीर्थक्षेत्री भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा होतो. महाराष्ट्रात अबालवृध्द गोविंदा रस्त्यावर येतात अन्‌ दहीहंडी फोडतात. दहीहंडी या सणाची लोकप्रियता एवढी मोठी आहे की हिंदी, मराठी चित्रपटांमधून दहीहंडीची दृश्‍ये हमखास दिसतात कारण कुरुक्षेत्रावर गीता सांगणाऱ्या योगेश्‍वर कृष्णा इतकंच दह्या दुधाची चोरी करणाऱ्या कृष्णाचं रूप लोकमानसात स्थिरावलेलं आहे. किंबहुना गौळणींची थट्‌टा मस्करी करणारा, त्यांची मथुरेची वाट आडविणारा, दह्या दुधाचे माठ फोडणारा कृष्ण जसा संत साहित्यात दिसतो तसाच तो लोकसाहित्यात दिसतो. किंबहुना लोकसखा कृष्ण म्हणजे संत साहित्य आणि लोकसाहित्य यांचा सुंदर अनुबंध ! आज कृष्णाष्टमीच्या कीर्तनापेक्षा दुसऱ्या दिवशीच्या गोंविदाला अधिक महत्त्व प्राप्त झालेले असले तरी कृष्णाचे संत साहित्य आणि लोकसाहित्यातील रूप आजही वंदनीय आहे. कृष्णाष्टमीच्या सण, उत्साहाला आज इव्हेंटचे स्वरूप प्राप्त झालेले असले आणि जागतिकीकरण तसेच मुक्‍त अर्थव्यवस्थेत ते अपरिहार्य असले तरी कृष्णाष्टमीच्या आणि गोंविदाच्या उत्सवाचा आत्मा हरवता कामा नये.

महाराष्ट्रभर जन्माष्टमीच्या कीर्तनांमधून कृष्ण जन्माच्या अवताराची कथा सांगितली जाते. “बाळकृष्ण नंदा घरी। आनंदल्या नर नारी।’ अथवा”घेवोनिया चक्रगदा। हाचि धंदा करितो।’ या सारखे अभंग वारकरी कीर्तनात हमखास घेतले जातात. कृष्णाचा जन्म रात्री 12 वाजता. रात्री 12 नंतर गोपाळ दहीहंडी काढतात. कृष्ण जन्म आणि गोपाळ काल्याचे संतांचे अभंग वैशिष्ट्यपूर्ण आहेत ते असे –
गोकुळींच्या सुखा ।। अंतपार नाहीं देखा ।। 1।।
बाळकृष्ण नंदा घरी ।। आनंदल्या नरनारी ।। 2।।
गुढिया तोरणें ।। करिती कथा गाणे ।। 3 ।।
तुका म्हणे छंदे ।। येणें वेधिली गोविंदे ।। 4 ।।
आजि ओस अमरावती ।। काला पहावया येती ।।
देव विसरती देह भाव आपुला ।। 1।।
आनंद नमाये मेदिनी ।। चारा विसरल्या पाणी ।। तटस्थ त्या ध्यानीं ।। गाई झाल्या श्वापदें ।। 2 ।। जे या देवांचें दैवत ।। उभें आहे या रंगांत ।। गोपाळसहित ।। क्रीडा करी कान्होबा ।। 3 ।।
तया सुखाची शिराणी ।। तीच पाउलें मेदिनी ।।
तुका म्हणे मुनी ।। घुंडित नळागती ।। 4 ।।

काल्याच्या कीर्तनात दहीहंडी फोडतानाचा संत तुकारामांचा अभंग असा –

कंठी धरिला कृष्ण मणीं ।।
अवघा जनीं प्रकाश ।। 1।।
काला वाटूं एकमेंकां ।।
वैष्णवां निका संभ्रम ।। 2 ।।
वांकुलिया ब्रहमादिकां ।।
उत्तम लोकां दाखवू ।। 3 ।।
तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीर गाढे ।। 4 ।।
उपजोनियां पुढती येऊं ।।
काला खाऊं दहीं भात ।। 1 ।।
वैकुंठ तों ऐसें नाहीं ।।
कवळ कांहीं काल्याचे ।। 2 ।।
एकमेका देऊं मुखीं ।।
सुखी घालूं हुंबरी ।। 3 ।।
तुका म्हणे वाळवंट ।। बरवें नीट उत्तम ।। 4 ।।

काला म्हणजे सत्वगुणाचा काला. काला म्हणजे समाजाचा सलोखा. गोकुळात प्रतिवर्षी इंद्राचा उत्सव साजरा व्हायचा. कृष्ण हा लोकाभिमुख लोकनायक असल्याने त्याने इंद्राची पूजा थांबविली आणि गोवर्धन पर्वताचा उत्सव सुरू केला. क्रोधीत झालेल्या इंद्राने गोकुळावर अतिवृष्टी केली कृष्णाने गोवर्धन उचलला व गोकुळवासीयांचे रक्षण केले. दैवतकथा आणि लोककथेचा सुंदर समन्वय असणाऱ्या अनेक कथा जन्माष्टमीच्या कीर्तनात सादर होतात. लोकसाहित्यातही कृष्णाच्या गौळणींचे वर्णन आणि सादरीकरण असते. तमाशात ते प्रगट होते ते हाळीची गौळण, तक्रारीची गौळण आणि विनवणीची गौळण या रूपाने- त्यातील हाळीची गौळण अशी.

दिवस उगवुनी किती वर आला
बाजार पुढे सारा झरझर गेला ।। धृ0।।
गवळी गावा गेला महिना झाला
दीर धाकटा बाई घरात निजला
तसाच भुकेला पाळण्यात टाकिला
मी बाई मथुरेला घोडा हाकिला।।
तक्रारीची गौळण
तु गं ऐक नंदाच्या नारी.. गं तु गं.
ऐक नंदाच्या नारी…
गं काल दुपारी यमुनेच्या तीरी
धुण बाई धुतं होत्या गवळयाच्या नारी
कान्हा वाजवितो बासरी
तुझा श्रीहरी वस्त्र आमची सारी
घेऊन बाई गेला हा कळंबावरी
पठ्‌ठेबापुराव कवी करी कलगी डफावरी
डंका वाजे दारी।
विनवणीची गौळण
सोड जाऊ दे मला मथुरेला का अडविसी गवळणींना
लहान सहान पोरी सगळ्या छळसी का मजला
काय म्हणावे ह्याच्या खोडीला व्याकुळ जीव झाला ।
संत प्रतिभा आणि लोकप्रतिभा यांचा सुंदर समन्वय श्रीकृष्ण आणि गौळणींच्या संदर्भात संत नामदेवांच्या गौळणीत घडलेला आहे ती गौळण अशीः
गौळणी ठकविल्या । गौळणी ठकविल्या ।
एक एक संगतीने । मराठी कानडीया ।
एक मुसलमानी । कोंकणी गुजरणी ।
अशा पांचीजणीं गौळणी ठकविल्या ।। धृ0।।
गौळणी सुंदरी । गौळणी सुंदरी ।
गेल्या यमुनेतीरी । वस्त्रें फेडुनिया स्नान करिती नारी।
गोविंदानें वस्त्रे । नेलीं कळंबावरी ।
स्नान करोनियां । त्या आल्या बाहेरी ।। 1 ।।
लडोबा गोविंदा । लडोबा गोविंदा ।
निरवाणी आज । आडचल्लों पडचल्लो ।
शिर फोडया न कोडो । मारी कन्हया ।
पानी खेळया न खेळो ।। 2।।
देखरे कन्हया देखरे कन्हया ।
मैं इज्यतकी बडी ।
कदम पकडूंगी । मैयां कूटोजुडी ।
मेरी चुनरी दे । मेरी ले दुल्लडी ।। 3।।
देवकी नंदना । देवकी नंदना ।
तूं एक श्रीपती । उघडी हिंवाची ।
तुज विनवुं किती ।
पायां पडत्यें बा । मी येत्यें काकुळती ।
मांझी साडी दे । घे नाकाचें मोतीं ।। 4 ।।
पावगा दातारा । पावगा दातारा ।
तूं नंदाचा झिलो ।
माकां फडको दी । मी हिवान मेलों ।
घे माझे कोयतो । देवा पाया पडलों ।। 5 ।।
ज्योरे माधवजी ज्योरे माधवजी । में शरण थई ।
तनका काकैपी । बाप दयाळ तूंही ।
मारी साडी अपो । हातणी ले कंकणी ।। 6।।
इतुकें ऐकोनी । इतुकें एकोनी ।
देव बोले हांसोनी ।
सूर्या दंडवत करा कर जोडोनी ।
नामा विनवितो ।
म्हणे शारंगपाणी । गौळ्या ऐक तूं ।
धन्य तुझी करणी ।। 7 ।।

ही गौळण कीर्तनात, भजनात, भारूडात, खंडोबाच्या जागरणात, देवीच्या गोंधळात म्हटली जाते. सत्व, रज, तम अशा त्रिगुणाच्या थरावर उभा असलेला गोविंदा हा सामाजिक सलोख्याचा काला वाटणारा असावा थर कमी झाले तरी संस्कृती आणि परंपरेचे स्तर अबाधित राहायला हवेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)