कालव्यात कार कोसळून क्रीडा शिक्षकाचा मृत्यू

लोणी काळभोर- फुरसुंगी (ता. हवेली) गावाच्या हद्दीत सॅन्ट्रो कार नवा मुठा उजव्या कालव्यात पडून झालेल्या अपघातात एका उमद्या क्रीडा शिक्षकाचा मृत्यू झाला. ही घटना आज (रविवारी) सकाळी उघडकीस आली.
नितीन निवृत्ती कुंभार (वय 44, रा. सासवड, ता. पुरंदर) असे मृत झालेल्या क्रीडा शिक्षकाचे नाव आहे. फुरसुंगी गावातील काही ग्रामस्थ कालव्याच्याकडेने आज सकाळी साडेसहा वाजता मॉर्निंगवॉक करीत होते. त्यावेळी त्यांना एक सॅन्ट्रो कार नवीन मुठा उजव्या कालव्यात पडलेली दिसली. त्यांनी तातडीने अग्निशामक दलाला पाचारण केले. तसेच स्थानिक क्रेन आणून कार बाहेर काढली. तोपर्यंत अग्निशामक दलाची गाडीही आली होती. त्या गाडीत नितीन कुंभार मयत अवस्थेत आढळून आले.
नितीन कुंभार हे गेली 15 वर्षे कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या एंजल हायस्कूलमध्ये क्रीडाशिक्षक म्हणून काम करीत होते. लहान लहान विद्यार्थ्यांना खेळ शिकवण्याच्या त्यांच्या हातोटीमुळे ते आजी माजी सर्व विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय झाले होते. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी सासवड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आजी-माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे. एक उमदा क्रीडाशिक्षक अकाली गमावल्यामुळे एंजल हायस्कूल परिवारावर शोककळा पसरली आहे.
संबंधित दुर्घटना झालेल्या पुलाचे कठडे बऱ्याच दिवसांपूर्वी तुटलेले आहेत; परंतु पुणे महानगरपालिका, जिल्हा परिषद व जलसंपदा विभाग यांच्या वादात या पुलाची दुरुस्ती होत नाही. यापूर्वीही या पुलावर अपघात झालेले आहेत. परंतु वरील तीनपैकी कुठलाच शासकीय विभाग या संदर्भात गांभीर्याने लक्ष देत नाही. त्यामुळे हे अपघात घडत आहेत. आता तरी हद्दीचा वाद न करता शासनाने हा पूल त्वरित दुरुस्त करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)