कालव्यातून पाणी… बारामती “बारमाही’साठी

  • पाटबंधारे खात्यावर दबाव? : भाटघर, निरादेवघर धरणांतून वीरमध्ये आलेले पाणीही कालव्यातून सोडले

नीरा – भोर तालुक्‍यातील निरादेवघर 100 व भाटघर धरणांत 100 टक्के पाणीसाठा असताना या धरणांतून वीर धरणात पाणी सोडण्यात येत असले तरी नीरा डावा व उजव्या कालव्याद्वारे हे पाणी पुरंदर ऐवजी बारामतीत वाहत आहे. नीरा डावा कालव्यातून 500 तर उजव्या कालव्यातून 800 क्‍युसेक पाणी सोडण्यात आले असल्याने भोरमध्ये खडखडाट, पुरंदर कोरडा तर बारामतीत धरण नसतानाही पाणीच पाणी अशी स्थिती आहे. या धरण लाभ क्षेत्रातील गावांना शेतीला पाणी आवश्‍यक असले तरी पिण्याकरिता प्राधान्य क्रमाने पाणी साठविणे गरजेचे असताना केवळ बारामती बारमाही ठेवण्यासाठी पाटबंधारे खात्यावर दबाव येतो का? असाही सवाल यातून पुढे येत आहे.
भोर तालुक्‍यातील भाटघर आणि नीरादेवघर धरणं यावर्षी 100 टक्के भरून वाहत आहेत. या पाण्याचा लाभ भोरसह पुरंदरमधील गावांना मिळणे गरजेचे असताना केवळ भरले धरण की सोड पाणी.., अशा कारभारामुळे या पाण्याचा लाभ बारामतीला बारमाही होत आहे. विशेष, म्हणजे नीरा नदीच्या माध्यमातून याचा लाभ इंदापुरलाही होत आहे. भाटघर आणि निरादेवघरचे पाणी वीर मध्ये आल्यानंतर याचा लाभ पुरंदर तालुक्‍यातील जेऊर, मांडकी, पिंपरे बु., नीरा, निंबुत, सोमेश्वर नगर, वडगाव निंबाळकर अशा काही गावांना होतो. परंतु, यातील बहुतांशी पाणी हे बारामती आणि तेथून पुढे इंदापूर सोलापूरमार्गे कर्नाटकात वाहून जात आहे. अन्य, राज्यात वाहून जाणारे पाणी अडविल्यास पुरंदरलाही याचा मोठा लाभ होवू शकतो. याकरिता गुळुंचे येथून कऱ्हानदीत कालव्याद्वारे पाणी नेता येवू शकते. मात्र, हा प्रस्ताव केवळ कागदोपत्रीच असून यावर कुठल्याही पातळीवर चर्चा झालेली नसल्याने दोन्ही धरणातील पाणी वाहून जात आहे.
यावर्षीही बारामती तालुक्‍यात दुष्काळीस्थिती असताना वीर धरणांत आलेले पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे बारामतीत पाऊस नसतानाही बहुतांशी भाग ओलाताखाली आहे. अगदी फलटण पर्यंत हे पाणी जात असताना पुरंदर मधील मांडकी, जेऊर, पिंपर या सारख्या गावांना मात्र पुढील काही महिन्यांत या पाण्याचा लाभ होणार नाही. नीरा नदी खोऱ्यामध्ये यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने धरणांतील पाण्याचे नियोजन होणे गरजेचे आहे. निरादेवघर व भाटघर धरणांतून पाणी सोडण्यात येत असल्याने अगदी डिसेंबर, जानेवारी पर्यंत वीर धरणात केवळ 10 टक्के पाणीसाठा शिल्लक राहतो. यामुळे नीरा खोऱ्यांतर्गत गावांपुढे पाणी टंचाईचे संकट हे ठरलेलेच असते.
नीरा नदी खोऱ्यांमधील धरणं ही मान्सुनच्या पावसाने भरत असतात. कालव्यातून सोडलेल्या पाण्याचा वापर शेती व उद्योगांसाठी मोठ्या प्रमाणात होत असल्यानेही पुरंदरमधील नीरा खोऱ्यातील गावांना पाणी टंचाईची झळ बसत असते. त्यामुळे वरील धरणांतून येणाऱ्या पाण्याचे नियोजन हाच पाणी टंचाईवरचा उपाय आहे.

नियोजनानुसारच पाणी सोडले जाते. पाण्याचा अपव्य होऊ नये यावरही लक्ष असते. परवानाधारक शेतकऱ्यांना आवश्‍यक तेवढेच पाणी दिले जाते. पाणी चोरीसारख्या प्रकारांनाही आळा घालण्यासाठी भरारी पथके आहेत.
– विजय नलवडे, कार्यकारी अभियंता, नीरा शाखा


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)