कालव्याच्या कामासाठी विनापरवाना वाळू-मुरमाचा उपसा

ठेकेदारांनी लावला महसूल विभागाला लाखोंचा चुना : कारवाईची मागणी

दहिवडी, दि. 8 (प्रतिनिधी) – माण तालुक्‍यात पोटकालव्याच्या कामासाठी तीन वर्षांपासून कोणतीही रॉयल्टी न भरता ठेकेदारांनी हजारो ब्रास गौणखनिजाचे उत्खनन केले आहे. यामुळे महसूल विभागाला लाखो रुपयांचा चुना लागला असला तरी हा विभाग मात्र, कुंभकर्णी झोपेत आहे. धनदांडग्या ठेकेदारांवर कोणतीही कारवाई न झाल्याचे यामागे नक्की काय गौडबंगाल आहे, याची चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.
किरकसाल ते पिंगळी तलाव येथे पोट कॅनॉलचे काम तीन वर्षे झाले सुरू आहे. याची कोणतीही रॉयल्टी भरली गेली नाही. अनेक ठिकाणी हाजरो ब्रास मुरूम व वाळू उपसा केला आहे. अनेकांना तक्रारी करून देखील याकडे लक्ष दिले जात नसल्याचे नागरिक बोलत आहेत. शेतकरी वर्गाला आमिष दाखवून त्यांच्या क्षेत्रातील मुरूम उचलून विनापरवानगी मुरूम वाहतूक केला जात आहे. माण महसूल विभाग मात्र, याकडे लक्ष्य देण्यासाठी तयार नसल्याने महसूलचे लाखो रुपये बुडवले आहेत.
पोकलेन, डंपरने गौण खनिज दिवसा वाहतूक केले जात आहे. तसेच रात्रीच्या सुमारास पिंगळी तलावामधून हजारो ब्रास वाळू चोरून कॅनॉलच्या बांधकामास वापरली जात आहे. मात्र, संबंधित ठेकेदार व वाळू माफिया यांना कोणाची भीती नाही का? ठेकेदार व वाळू माफियांवर महसूल विभाग गुन्हे दाखल करणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
सामान्य नागरिक व ठेकेदार यांच्यामध्ये महसूल विभाग दुजाभाव करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. याकडे वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष घालण्याची मागणी करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)