कालव्यांची दुरवस्था अन्‌ पाण्याच्या चोरीने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला

संबंधित विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष, कारवाईची मागणी

फलटण, दि. 31 (प्रतिनिधी) – फलटण तालुक्‍यात कालव्याद्वारे वाहणाऱ्या पाण्याच्या चोरीचे प्रमाण गत काही महिन्यांपासून चांगलेच वाढले आहे. शिवाय कालव्यांचीही अनेक ठिकाणी दुरवस्था झाली आहे. तसेच काही धनिकांनी थेट कालव्याचा भराव खोदून पाण्याच्या चोरीचा प्रकार सुरु केल्याने सर्वसामान्य शेतकऱ्यांचा जीव मात्र टांगणीला लागला आहे.

माण-खटाव या तालुक्‍यांप्रमाणेच फलटण तालुक्‍याचा बहुतांशी भाग हा दुष्काळी भाग म्हणूनच संबोधला जातो. मात्र, धोम-बलकवडी आणि नीरा या धरणांमधून कालव्याद्वारी फलटण तालुक्‍यातील अनेक गावांमधील शेतीमध्ये पाणी पोहोचले आहे. कालव्याच्या सहाय्याने येणाऱ्या पाण्यावर तालुक्‍यातील शेतकरी आपल्या जमिनीमध्ये पिकेही घेऊ लागला आहे. मात्र, सध्या तालुक्‍यातील वाहणाऱ्या नीरा उजवा कालव्याची अनेक ठिकाणी दुरवस्था झाली आहे. तसेच काही धनिकांनी पैशाच्या जोरावर संबंधित विभागाच्या अधिकारी, कर्मचारी हाताशी धरुन पाण्याची चोरी सुरु केली आहे. या सर्व गोष्टी एवढ्यावरच थांबलेल्या नाहीत तर काही महाभागांनी थेट कालव्याचे भराव खोदून त्यातून पाण्याची चोरी सुरु केली आहे. दरम्यान, सर्व बाबींकडे संबंधित विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे. दिवसेंदिवस वाढत असलेले पाणीचोरीच्या प्रकारांमुळे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पाण्यावर गदा येऊ लागली आहे. शेतकऱ्यांना होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर याचा परिणाम होऊ लागला आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने तात्काळ या प्रकारांना पायबंद घालून पाण्याची चोरी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहेत.

पाणीचोरीला पाटबंधारे विभागाचा वरदहस्त
फलटण तालुक्‍याला हिरेवगार करणाऱ्या नीरा उजवा कालव्यातील पाण्याची काही महाभागांकडून चोरी सुरु आहे. विशेष म्हणजे काही ठिकाणी कालव्याचा भराव खोदून पाईपलाईनद्वारे पाण्याच्या चोरीचेही प्रकार सुरु आहेत. मात्र या सर्व प्रकारापासून पाटबंधारे विभाग अनभिज्ञ आहे याबाबत साशंकता व्यक्त होत असून पाटबंधार विभागाकडून या सर्व प्रकारांची माहिती असूनही काहीच माहिती नसल्याची भूमिका घेतली जात आहे की काय? असाही सवाल उपस्थित होऊ लागला आहे. दरम्यान, दिवसेंदिवस वाढत असलेल्या पाणी चोरीच्या प्रकारांना पाटबंधारे विभागाचाच वरदहस्त असल्याची उलटसुलट चर्चाही तालुक्‍यात सुरु आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)