कालवा फुटीप्रकरण : पालिका-पाटबंधारे विभागांत हमरीतुमरी

आम्हालाही पोलिसात जावे लागेल : आयुक्त

पुणे : खडकवासला कालवा फुटल्यानंतर निर्माण झालेल्या स्थितीमुळे महापालिका अधिकारी आणि जलसंपदा विभागाचे अधिकारी हमरी तुमरीवर आले आहेत. दुरूस्त केलेल्या कालव्यातून जादा पाणी सोडल्याचा आरोप करत जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंते पांडूरंग शेलार यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केल्याने संतापलेल्या महापालिका आयुक्तांनी पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची कानउघडणी करत आम्हालाही पोलिसात जावे लागेल, असा सज्जड दम भरला आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने नमते घेत कालव्यात पाणी सोडण्यास मान्यता दिली आहे. दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून पालिका आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये शीतयुध्द सुरू असून दोघांकडून एकमेकांना कालवा फुटी प्रकरणी जबाबदार धरले जात आहे.

खडकवासला कालवा फुटल्यानंतर त्याची तातडीने दुरुस्ती करण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, यात लष्कर जलकेंद्रास होणारा पाणीपुरवठा विस्कळीत झाला असल्याने वडगावशेरी, चंदननगर तसेच खराडी भागांत गेल्या चार दिवसांपासून पाणी नाही. त्यामुळे नागरिकांचे आतोनात हाल सुरू असून त्यांच्या रोषास महापालिकेस सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे तात्पुरती डागडुजी झाल्यानंतर पाणी सोडावे, अशी पालिकेची भूमिका होती. शनिवारी दुपारी पाणीही सोडण्यात आले होते.

मात्र, अचानक पाण्याला फुगवटा आल्याने हे पाणी बांधलेल्या भिंतीवरून वर आले, त्यामुळे कालव्याची भिंत पुन्हा तीन फुटांनी वाढविण्यात आली. त्यामुळे रविवारी सायंकाळपासून पालिकेने पर्वती जलकेंद्रातून कालव्यात 75 क्‍यूसेक पाणी सोडण्यात आले. मात्र, या पाण्यामुळे नव्याने बांधलेल्या भिंतीला हादरे बसत असून हे पाणी बंद करण्याच्या सूचना शेलार यांनी महापालिकेचे अधिकारी व्ही.जी. कुलकर्णी यांना दिल्या.

मात्र, त्यावरून पालिकेचे कर्मचारी आणि शेलार यांच्यात वाद झाला, त्यामुळे शेलार यांनी रात्री थेट पोलिसांमध्येच पालिके विरोधात तक्रार करून पाणी बंद केले. त्यामुळे सोमवारी सकाळी पुन्हा नगररस्ता परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिक तसेच लोकप्रतिनिधींनी प्रशासनास चांगलेच धारेवर धरले. ही बाब कुलकर्णी यांनी थेट महापालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून देत पाणी न सोडल्यास स्थिती हाताबाहेर जाण्याची भीती व्यक्त केली. त्यावेळी आयुक्तांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत थेट अधिक्षक अभियंता एस.डी. चोपडे यांना फोन लावत, या प्रकाराची माहिती घेतली. तसेच पाटबंधारे विभागाकडून अशा प्रकारे अडवणूक तसेच अधिकाऱ्यांशी वर्तन केले जात असेल तर, आम्हालाही पोलिसात जावे लागेल असा दमच भरला. त्यानंतर पुन्हा या दोन्ही अधिकाऱ्यांमध्ये चर्चा होऊन दुपारनंतर पाणी सोडण्यात आल्याची माहिती प्रशासकीय सुत्रांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)