कालवा फुटीप्रकरण : त्याच परिसरात बाधितांचे पुनर्वसन

पुणे – मुठा उजवा कालवा दुर्घटनेत पूर्णत: बाधित 98 कुटुंबांचे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतंर्गत (एसआरए) त्याच परिसरात ताब्यात असलेल्या सदनिकांमध्ये टप्प्याटप्प्याने पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी पात्र आणि अपात्रची यादी तपासणे, याच परिसरात एसआरएच्या ताब्यात असलेल्या, तसेच येत्या दोन ते तीन महिन्यांच्या काळात ताब्यात देणाऱ्या सदनिकांची माहिती सादर करण्याचे आदेश पालकमंत्री गिरीश बापट यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्रधिकरणाला दिले आहेत.

दुर्घटनेनंतर महापालिका आणि जिल्हा प्रशासन यांच्या मदतीने विविध कामे हाती घेतली आहेत. त्याचा आढावा आज पालकमंत्र्यांनी घेतला. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला.

बापट म्हणाले, पूर्णत: बाधित कुटुंबांचे एसआरएच्या माध्यमातून पुनर्वसन होणार आहे. राजेंद्रनगर परिसरात 25 सदनिका आहेत. त्या ठिकाणी पहिल्या टप्यात काहींचे पुनर्वसन होणार आहे. त्या परिसरात अन्य काही एसआरएच्या योजना सुरू आहेत. त्यातून किती सदनिका उपलब्ध होणार आहेत. याची माहिती घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. पुनर्वसन करताना पात्र, अपात्रांची यादी तयार करण्याच्या सूचना एसआरएच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तर अंशत: बाधितांना पालिकेच्या ताब्यातील सदनिका भाडेतत्वावर देण्याचा निर्णय झाला आहे.

दुरुस्तीच्या कामानंतर पूर्ण क्षमतेने पाणी सोडणार
भगदाड पडलेल्या ठिकाणी सिमाभिंतीचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. आणखी पाच ते सहा ठिकाणी कालवा धोकादायक झाला आहे. सध्या बंद असल्यामुळे त्या ठिकाणची दुरुस्ती करून घेण्याच्या सूचना पाटबंधारे खात्याला दिल्या आहेत. लष्कर भागाचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी सध्या 60 ते 80 क्‍यूसेकने पाणी कालव्यात सोडण्यात येत आहे. कालव्यात दोन ते अडीच फुटांपर्यंत पाण्याची पातळी आहे. दुरुस्तीचे काम अजून दोन दिवस चालेल, त्यानंतर पूर्ण क्षमतेने कालव्यात पाणी सोडण्यात येईल, असेही बापट यांनी सांगितले.

अधिकाऱ्यांना घेतले फैलावर
बैठकीत पालकमंत्र्यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. “तुमचा उत्साह कमी आहे. तुमच्या चुकीमुळे हे भोगावे लागत आहे.’ अशा शब्दात त्यांनी कामकाजाबद्दल नाराजी व्यक्त केली.

दुरुस्तीनंतर शेतीसाठी पाणी सोडणार
शेतीलाही पाणी आवश्‍यक आहे. सध्या खडकवासला धरणातून लष्कर पाणीपुरवठा केंद्रांपर्यंत 80 क्‍युसेकने पाणी सोडले जात आहे. जर शेतीसाठी पाणी सोडायचे असेल तर ते एक हजार ते अकराशे क्‍युसेकने सोडावे लागते. कालवा दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्याचबरोबर पाणी पातळी कमी असल्यामुळे कालव्यातील गाळही काढला जात आहे. त्यामुळे पाण्याचा वेग वाढेल. दुरुस्ती झाल्यानंतर शेतीसाठी पाणी सोडले जाणार असल्याचे बापट यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)