कालवा फुटीची कारणे शोधण्यासाठी समिती

पुणे – दांडेकर पूल येथे मुठा कालवा फुटलेल्या घटनेची कारणे शोधण्यासाठी व अशा घटना पुढे घडून नयेत, यावर उपाययोजना सुचविण्यासाठी राज्य शासनाने पाच सदस्यीय समिती नेमण्याचा निर्णय घेतला आहे. ही समिती 15 डिसेंबर 2018 पर्यंत याविषयीचा अहवाल सादर करणार आहे. दरम्यान, मुठा कालवा उंदीर आणि घुशींमुळे फुटला असल्याचा दावा जलसंपदा विभागाने केला होता. याची कारणेही समिती शोधणार आहे.

सप्टेंबर महिन्यात दांडेकर पूल येथे मुठा कालवा फुटल्याची दुर्घटना घडली होती. यामध्ये अनेक नागरिकांचे संसार वाहून गेले. या घटनेनंतर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी प्रत्यक्ष पाहणी करून कालवा फुटीबाबतची कारणे शोधण्यासाठी समिती स्थापन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जलविद्युत व गुण नियंत्रण विभागाचे मुख्य अभियंता यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. या समितीमध्ये पुणे शहराचे प्रांताधिकारी, पुणे पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधिक्षक अभियंता, पुणे मनपा घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाचे उपायुक्त हे असणार आहेत. तर, कोयना संकल्प चित्र मंडळाचे अधिक्षक अभियंता हे सदस्य सचिव असणार आहेत. या समितीस लागणारी आवश्‍यक ती माहिती पुणे महानगरपालिका आणि जलसंपदा विभागाने उपलब्ध करून द्यावी. तसेच समितीने वेळोवेळी सुनावणीस अथवा माहितीसह बोलविल्यास संबंधितांनी उपस्थित राहावे, अशा सूचनाही शासनाने दिल्या आहेत.

समितीची कार्यकक्षा
– मुठा कालवा फुटण्याच्या घटनेची कारणे शोधणे
– मुठा कालवा फुटीने आलेल्या पुरामुळे नागरी वस्तीत झालेल्या नुकसानीबाबतची कारणे शोधणे
– संभाव्य धोकादायक ठिकाणांची यादी तयार करून त्यावर उपाययोजना सुचविणे
– कालव्याच्या देखभाल दुरुस्तीसंदर्भात मार्गदर्शक सूचना सुचविणे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)