कालवाफुटी बाधितांना अखेर आज मिळणार मदत

बॅंक खात्यात पैसे जमा करण्याचा निर्णय

पुणे – मुठा उजवा कालवा फुटी प्रकरणातील बाधितांच्या बॅंक खात्यात अखेर गुरूवारी पैसे जमा करण्यात येणार आहेत. पंचनाम्याचे सर्व तपशील महापालिकेकडे आले असून, ते जमा करण्याची कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

27 सप्टेंबर 2018 ला मुठा उजव्या कालव्याला भगदाड पडून दांडेकर पूलाजवळील झोपडपट्टीत पाणी शिरले. त्यामुळे शेकडो घरे बाधित होऊन, झोपडपट्टीवासियांचे संसार उघड्यावर पडले. बाधितांना मदत देण्याची घोषणा महापालिकेने केली. बाधितांना तात्पुरते स्थलांतर करून, त्यांना जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठाही करण्यात आला. तसेच जागेवर बाधितांचे पंचनामेही करण्यात आले.

पंचनामे होऊन सुमारे 543 जणांची नावे अंतिम करण्यात आली आहेत. त्यांच्या नावांचे बॅंक खातेही उघडण्यात आले असून, त्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी सांगितले. या नावांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अंतिम होऊन आली आहे.

आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अन्य खात्यातून वर्गीकरण करून मदतीची रक्कम उभारण्यात आली आहे. येत्या आर्थिक वर्षांत आपत्ती व्यवस्थापनासाठी पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल, असे निंबाळकर यांनी नमूद केले.

दरम्यान, या कुटुंबांना प्रत्येकी 11 हजार रुपयांची रोख मदत देण्याची घोषणा महापौर मुक्ता टिळक यांनी केली होती. मात्र, अशा पुराच्या घटनेनंतर महापालिकेस केवळ घर बांधणीसाठी पत्रे, वासे तसेच बांबू देता येतात. रोख पैसे देता येत नाहीत. रोख मदत केवळ राज्यशासनाच्या माध्यमातून देण्यात येत असल्याचे प्रशासनाने म्हटले होते.

त्याच परिसरात होणार पुनर्वसन
मुठा उजवा कालवा दुर्घटनेत पूर्णत: बाधित 98 कुटुंबांचे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतंर्गत (एसआरए) त्याच परिसरात ताब्यात असलेल्या सदनिकांमध्ये टप्प्याटप्प्याने पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी पात्र आणि अपात्रची यादी तपासणे, याच परिसरात एसआरएच्या ताब्यात असलेल्या, तसेच येत्या दोन ते तीन महिन्यांच्या काळात ताब्यात देणाऱ्या सदनिकांची माहिती सादर करण्याचे आदेश पालकमंत्री गिरीश बापट यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्रधिकरणाला यापूर्वीच दिले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)