कालवाग्रस्तांना मदत नाहीच!

बाधित हतबल : दोन महिन्यांनंतरही निर्णय होईना

पुणे – खडकवासला कालवा फुटीनंतर दांडेकर पूल वसाहतीमधील सुमारे 806 घरांचे नुकसान झाले. या दुर्घटनेला मंगळवारी (दि.27) रोजी दोन महिने होत आहेत. पण, या बाधितांना महापालिकेची अजून काहीच मदत मिळालेली नाही. विशेष बाब म्हणजे, राज्यशासनाकडून मंजूर मदत मिळण्यास सुरूवात झाली असली तरी, या बाधितांना पैसे द्यायचे, की संसारपयोगी साहित्य याबाबत निर्णय घेण्यास पालिका प्रशासनास वेळ मिळत नसल्याने ही स्थिती उद्‌भवलेली आहे.

-Ads-

दि. 27 सप्टेंबर रोजी जनता वसाहतीतील खडकवासला मुठा (उजवा) कालव्याच्या भिंतीला भगदाड पडले. त्यामुळे दांडेकर पूल वसातहत येथील स. नं 124, 130,131 व 134 मधील घरांमध्ये पाणी शिरले. या बाधितांना राज्य शासनाकडून 3 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. तर महापौरांनी महापालिकेच्या वतीने प्रत्येकी 11 हजारांची मदत जाहीर केली. ती देण्यासाठी महापौर, आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी राज्य शासन आर्थिक मदत देणार असल्याने तसेच महापालिकेस अशा प्रकारे रोख मदत देण्याची तरतूद नसल्याने प्रशासनाने सांगितले. त्यामुळे या बाधितांना घरगुती साहित्य देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, या घटनेला एक महिना होत असतानाच 26 ऑक्‍टोबर रोजी आयुक्तांनी मदतीसाठीची बैठक घेतली. यात पालिकेस रकमेच्या स्वरूपात मोबदला देणे शक्‍य नसल्याचे सांगत, तीन दिवसांच्या आत या बाधितांसाठी संसारोपयोगी साहित्य खरेदी करण्याचे आदेश देत 31 ऑक्‍टोबरपूर्वी हे साहित्य वाटप करण्याचीही घोषणाही महापौरांनी केली. मात्र, त्यांच्या आणि आयुक्तांच्या आदेशाला हरताळ फासत ही मदत देण्याची जबाबदारी असलेल्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने पुन्हा अनुदान देण्याची भूमिका घेतली. त्यामुळे नेमकी काय मदत द्यायची, हेच गेल्या दोन महिन्यांपासून प्रशासनास निश्‍चित करता आलेले नसल्याचे स्पष्ट होत असून राज्यशासनाची मदत पालिकेच्या आधी या बाधितांना मिळाल्याचे वास्तव आहे.

कालवा बाधितांना अनुदान वाटप अथवा साहित्य खरेदी याबाबतचे दोन्ही प्रस्ताव महापालिका आयुक्तांसमोर सोमवारी ठेवण्यात येणार आहेत. त्यांची मान्यता घेऊन मंगळवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत हा मदतीचा प्रस्ताव ठेवला जाईल. तसेच त्यानंतर तातडीने मदत दिली जाईल.
– गणेश सोनुने, विभाग प्रमुख, आपत्ती व्यवस्थापन, मनपा.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)