पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या जाहीर कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी छापल्या जाणाऱ्या निमंत्रण पत्रिका यापुढील काळात न छापण्याचा निर्णय स्थायी समितीच्या साप्ताहिक बैठकीत बुधवारी (दि. 16) घेण्यात आला आहे. तसेच पाहुण्यांच्या सत्कारातून स्मृतीचिन्ह देखील वगळण्यात आली आहे. खर्चात बचत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ऐनवेळी हा विषय मांडण्यात आला होता.
ममता गायकवाड या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होत्या. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सर्व राष्ट्रीय सण, महापुरुषांच्या जयंत्या, क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच भूमिपुजन व जाहीर कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या सर्व कायक्रमांच्या निमंत्रण पत्रिका जनसंपर्क विभागाकडून छापल्या व वितरित केल्या जातात. अनेकदा हे कार्यक्रम अचानक ठरवले जात असल्याने, छापून आलेल्या पत्रिका सन्माननीयांपर्यंत पोचविण्याच्या कामाला पुरेसा अवधी मिळत नाही. त्यामुळे बऱ्याचशा निमंत्रण पत्रिका पडून राहतात. यामुळे केलेला खर्च वाया जातो.
ही बाब लक्षात आल्यानंतर स्थायी समितीच्या वतीने वर्षभरातील जाहीर कार्यक्रमांच्या पत्रिका छापण्यावर केल्या जाणाऱ्या खर्चाची माहिती मागविण्यात आली. त्याअंतर्गत क्रीडा विबागाच्या वतीने छापलेल्या आठ हजार200 निमंत्रण पत्रिकांसाठी 80 हजार 770 रुपये तर जनसंपर्क विभागाच्या वतीने 34 हजार 800 पत्रिकांसाठी सात लाख, 96 हजार, 435 रुपये खर्च आला. तसेच 1156 स्मृती चिन्हांकरिता आठ लाख, 36 हजार, 930 रुपये असा एकूण 17 लाख, 11 हजार, 135 रुपये खर्च झाला.
अपवादात्मक परिस्थितीत छापणार पत्रिका
या खर्चात बचत करण्यासाठी महापालिकेच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या जाहीर कार्यक्रमांची सर्व सन्माननियांना या कार्यक्रम पत्रिकांची कॉम्प्युटर प्रिंट दिली जाणार आहे. मात्र, केंद्र अथवा राज्य सरकारमधील सन्माननीय मंत्री महोदयांच्या उपस्थितीत जाहीर कार्यक्रम आयोजित केला असल्यास, या कार्यक्रमांच्या राजशिष्टाचाराचे पालन केले जाणार आहे. अशा कार्यक्रमांच्या रंगीत पत्रिका छापल्या जाणार आहेत, अशी माहिती स्थायी सदस्य विलास मडिगेरी यांनी दिली.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा