कारेगावच्या सरपंचासह ग्रामसेवकाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश

पुणे – मालमत्ता कराच्या रुपाने मिळणाऱ्या कराची रक्‍कम ग्रामपंचायतीच्या खात्यात न भरता परस्पर दुसऱ्या स्वतंत्र खात्यात भरून1 कोटी 61 लाख रुपयांचा अपहार करणाऱ्या शिरूर तालुक्‍यातील कारेगावच्या माजी सरपंचासह तत्कालीन ग्रामसेवकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा परिषदेने दिले आहेत.

या संदर्भात माजी सरपंच वनिता कोहोकडे आणि तत्कालीन ग्रामसेवक विजय सोनवणे यांच्या विरोधात पोलिसांकडे फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश शिरुर तालुक्‍याच्या गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. या दोघांसह कॅनरा बॅंकेच्या अधिकाऱ्यांविरोधातही तक्रार देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासंदर्भात संदर्भात विद्यमान सरपंच किसन नवले यांनी जिल्हा परिषदेकडे तक्रार केली होती.

शिरुर तालुक्‍यातील कारेगाव ग्रामपंचायतीला 2011 ते 2014 या काळात विविध कंपन्यांसह अन्य घटकांकडून करापोटी 1 कोटी 61 लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले होते. दरवर्षी विविध कंपन्यांकडून कर वसूल केला जात होता. वसूल झालेली रक्कम ग्रामपंचायतीचा ग्रामनिधी म्हणून बॅंकेतील खात्यात जमा करणे अपेक्षित होते. परंतु, या दोघांनी संगनमताने कॅनरा बॅंकेत परस्पर खाते उघडले. त्याबाबतचा ग्रामपंचायतीचा कोणत्याही प्रकारचा ठराव घेतला नाही. त्याबाबत कामकाजाच्या वृत्तांताची त्याची नोंद केली नाही. अनधिकृतपणे खाते उघडून त्यात ही रक्कम जमा केली. तसेच त्यानंतर वेळोवेळी परस्पर दोघांनी ही रक्कम बॅंकेतून काढून त्याचा अपहार केल्याचे निष्पन्न झाल्याचे पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी सांगितले.
या संदर्भात विद्यमान सरपंच नवले यांच्या तक्रारीची दखल घेऊन जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाने संबंधित तालुक्‍याच्या गटविकास अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले होते. चौकशीचा अहवाल प्राप्त झाला. त्यात दरवर्षी विविध कंपन्यांना बोगस पावत्या देऊन रक्कम वसूल केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बॅंकांना 50 हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम रोख स्वरुपात देण्याची परवानगी नाही. तरीही रक्कम देण्यात आली. त्यामुळे सर्व माहिती संशयास्पद आढळली. त्यावरून कारवाई करण्यात आली असल्याचे कोहिनकर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)